You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहार: दगावणारी बालकं, पालकांचा आक्रोश आणि अनुत्तरित प्रश्न
- Author, प्रियंका दुबे
- Role, बीबीसी हिंदी प्रतिनिधी
सडलेला कचरा, फिनाईल, मृतदेह यांच्यात बुडालेल्या मुजफ्फरपूरमध्ये रात्रीचे आठ वाजले होते. पहिल्या मजल्यावर असलेल्या आयसीयूच्या बाहेर असलेल्या चपला-जोडांच्या ढिगाऱ्यात मी उभे होते. काचेच्या दरवाज्याआडून मी पाहत होते.
त्या दिवशीचं तापमान 45 डिग्री होतं. रात्री आठ वाजताही वातावरणात उष्मा जाणवत होता. दर दहा मिनिटांनी जाणारी वीज आणि गोंधळात मला अचानक किंचाळण्याचा आवाज आला.
दरवाज्याआडून पाहिलं एक महिला मला दिसली. तिने पलंगाला घट्ट पकडलं होतं. तिचं नाव सुधा आणि वय साधारण 27 वर्षं.
दुसऱ्याच क्षणी रडत रडत सुधा मटकन खाली बसली. पलंगावर निपचित पडलेल्या रोहितची मृत्यूशी झुंज नुकतीच संपली होती.
तेवढ्यात आपल्या निर्जीव मुलाचा पाय पकडून सुधा जोरात किंचाळली. एक क्षण मला असं वाटलं की तिचा आवाज रुग्णालयाच्या चार भिंतीपल्याड संपूर्ण शहरात घुमतो आहे. डॉक्टरांच्या आदेशानंतर तिला वॉर्डच्या बाहेर नेण्यात आलं.
एका आईचं आपल्या मुलासाठीचं दु:ख किती गहिरं आणि खोल असू शकतं हे गेल्या पंधरवाड्यात आयसीयूच्या वॉर्डात मला कळलं आहे.
इथे लागोपाठ मरत असलेल्या मुलांच्या आयांच्या दु:खाची सीमा नाही. वॉर्डच्या एका कोपऱ्यात उभं राहून त्यांचं रडणं मी ऐकत असते.
चमकी तापाने (एन्सिफिलायटिस) आतापर्यंत 121 मुलांनी आपला जीव गमावला आहे. लहान मुलांच्या मृत्यूंचं तांडव थांबायचं नावच घेत नाहीये.
वॉर्डच्या बाहेर उभे असलेले अनिल सहानी शुद्ध गमावत चाललेल्या त्यांच्या पत्नीला धीर देण्याचा प्रयत्न करत आहे. वॉर्डच्या आत रोहितची आजी तिच्या नातवाच्या पायांवर आपलं डोकं टेकवून रडत होती.
घामाने ओथंबलेले अनिल सांगतात की त्यांचा मुलगा रात्री ठीक होता.
"आधी एक तास त्याला मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केलं होतं. डॉक्टर सांगतात की आधी तो ब्रेन डेड झाला आणि आता तो मरण पावला."
अनिल असं बोलत होताच तेवढ्यात वॉर्डमधली वीज गेली. मोबाईल फोनच्या उजेडात त्यांच्या डोळ्यातले अश्रू आणि घामाच्या धारा स्पष्टपणे दिसत होत्या.
रुग्णालयात मी थोडी पुढे गेले तेव्हा मला लघवी, घाम, कचरा आणि फिनाईलचा दुर्गंध आला. मोकळ्या जागेत दोन्ही बाजूंना रुग्ण होते. त्यांचे आप्तस्वकीय पाणी, वीज, हात पंखे यांची व्यवस्था होतेय का ते चाचपण्यात मग्न होते.
पिण्याचं पाणी, स्वच्छतागृहं, पंखे आणि खाटांसारख्या मूलभूत सुविधांसाठी आसुसलेल्या मुजफ्फरपूरमधलं हे मेडिकल कॉलेज एक सरकारी हॉस्पिटलऐवजी एक ओसाड रखरखीत प्रदेशच आहे की काय असं क्षणभर वाटतं.
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन या सगळ्या मंडळींनी मुजफ्फरपूरचा दौरा केला आहे. मात्र जनतेला आश्वासनांशिवाय काहीही मिळालं नाही.
चमकी तापासारख्या गंभीर आजाराचं थैमान असताना तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही. या मुद्यावर आम्ही जेव्हा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना विचारणा केली. तेव्हा ते म्हणाले, "हे छोटे छोटे मुद्दे रुग्णालयाची जबाबदारी आहे."
पोकळ आश्वासनं
तिथे रुग्णालयात असलेल्या सोयी-सुविधांच्या बाबतीत विचारल्यावर तिथले अधीक्षक सुनील शाही सरळ उत्तर देत नाहीत. ते मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि हर्षवर्धन यांच्या दौऱ्याचीच माहिती देत बसतात.
"मुख्यमंत्र्यांनी मुजफ्फरपूरमध्ये टप्प्याटप्प्याने 1500 खाटांचं एक नवीन रुग्णालय उभारण्याची घोषणा केली आहे. त्यातच भारत सरकारने PICU (पेडिआट्रिक इंटेसिव्ह केअर युनिट) तयार करण्याची घोषणा केली आहे. इतकंच नाही तर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी हे रुग्णालय एप्रिलच्या आधी तयार होणार असल्याचं आश्वासन घेतलं आहे," ते सांगतात.
मात्र प्रशासनाच्या या घोषणा, आश्वासनं, रोहितचे आईवडील, आजी यांचं दु:ख कमी करू शकत नाही.
सगळं ठीक होतं अचानक...
रोहितच्या मृत्यूनंतर आम्ही त्याच्या कुटुंबीयांना भेटायला राजापुनास गावात पोहोचलो. 1500 घरं असलेल्या या गावातल्या एका भागात अनिल, दोन खोल्यांच्या झोपडीत राहतात. त्यांच्या चार मुलांपैकी रोहित सगळ्यांत लहान होता.
मुलाची आठवण करताना अनिल सांगतात, "ज्या दिवशी तो आजारी पडला त्याच्या आदल्या दिवशी गावात जेवणाचा कार्यक्रम होता. तो तिथे जेवायला वगैरे गेला. रात्री झोपला तर थरथरायला लागला. सारखं पाणी मागत होता. मग म्हणाला की कपडे काढून टाका. त्याला उकडत असावं असं त्याच्या आईला वाटलं. म्हणून आम्ही त्याचे कपडे काढले. मग तो नीट झोपला. सकाळी उठल्यावर म्हणाला की भूक लागली आहे. एक दोन चमचे खाल्ले आणि त्याचं पोट बिघडलं."
मुलांचे कपडे आवरता आवरता सुधा म्हणाली, "आधी शेजारच्या डॉक्टरकडे नेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आज तपासणार नाही कारण आज त्यांचा संप आहे. पुढे दोन डॉक्टरांनी तेच म्हटलं. आम्ही त्याला घेऊन या रुग्णालयात पोहोचलो. इथे डॉक्टरांनी सलाईन लावलं आणि इंजेक्शन दिलं. ते दिल्याबरोबर त्याचा ताप वाढला."
"तो एकदम थरथर कापायला लागला. आम्ही त्याला पकडलं होतं तरी तो पूर्ण शरीर उचलून आपटत होता. हातपाय झाडत होता," रोहितचे वडील सांगतात.
"डॉक्टरांनी तीन वेळा वॉर्ड आणि सलाईन बदललं. मात्र त्याची तब्येत बिघडत गेली. मग सहा तासानंतर त्याला मेडिकल कॉलजमध्ये न्यायला सांगितलं. एक तासातच त्याने श्वास सोडला."
मृत्यूचं कारण
मुजफ्फरपूर येथील ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ अरुण शाह यांच्या मते गरीबी आणि कुपोषण ही मुलांच्या मृत्यूची खरी कारणं आहेत.
बीबीसीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते म्हणाले, "2014-15 या काळात मी, डॉ. मुकूल दास, डॉ.अमोध आणि डॉ. जेकब यांनी एकत्र मिळून या आजारावर संशोधन केलं. आम्हाला लक्षात आलं की मुलांचे मृत्यू कोणत्याही व्हायरस किंवा बॅक्टेरियामुळे झालेले नाही."
चयापचय हे या आजाराचं मुख्य कारण आहे. म्हणून आम्ही त्याला Accute Hypoglycemic Encephlopathy म्हणतो. ताप, बेशुद्धी, शरीरात कंपनं ही या आजाराची मुख्य लक्षणं आहेत.
या आजाराला बळी पडणारा मोठा वर्ग हा गरीब गटातला आहे असं ते पुढे सांगतात. ते म्हणतात, "बऱ्याच काळापर्यंत कुपोषित असणाऱ्या या मुलांमध्ये रिझर्व्ह ग्लायकोजिनचं प्रमाण अतिशय कमी होतं. त्यासाठी लिचीत असलेल्या मिथाईल प्रोपाईड ग्लाईसीन नामक न्युरोटॉक्सिन्स मुलांच्या शरीरात अॅक्टिव्ह होतं. तेव्हा त्यांच्या शरीरात एक प्रकारची अनएरॉबिक प्रक्रिया सुरू होते. त्याला क्रेब सायकल असं संबोधलं जातं. त्यामुळे ग्लुकोज मुलांच्या मेंदूपर्यंत पोहोचत नाही आणि ब्रेन डेड होण्याचा धोका निर्माण होतो."
मात्र अरुण शाह यांच्यामते लिची या मुलांच्या मृत्यूसाठी जबाबदार नाही तर कुपोषण या मागचं महत्त्वाचं कारण असल्याचं ते सांगतात. "2015 मध्ये हे मृत्यू रोखण्यासाठी आम्ही एक योजना बिहार सरकारला दिली होती. त्यात एका स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेजरचा उल्लेख होता.
"त्या कार्यपद्धतीत आम्ही सांगितलं की आशा कार्यकर्ता त्यांच्या गावात जाऊन जनजागृती करतील. त्या लोकांना सांगतील उन्हाळाच्या दिवसात लिची खाऊ नये, त्यांना पोषित आहार द्या आणि रिकाम्या पोटी झोपू देऊ नका. अशा सूचना आम्ही दिल्या होत्या," असं डॉक्टर सांगतात.
प्राथमिक केंद्रांची स्थिती
मुलांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राची महत्त्वाची भूमिका असते. त्याकडे लक्ष वेधताना डॉक्टर शाह म्हणतात, "प्रत्येक केंद्रात एक ग्लुकोमीटर हवं अशीही शिफारस आम्ही केली होती. जेणेकरून मुलांच्या शरीरातलं प्रमाण मोजता येईल, ती कमी झाल्यास मोजता येईल. असं केलं तर त्यांना उपचार मिळण्याची शक्यता वाढते. मात्र बिहार सरकार लागू करण्यात अयशस्वी ठरलं."
राजपुनास नावाच्या ज्या जिल्ह्यात रोहित मोठा झाला तिथे प्राथमिक आरोग्य केंद्र गेल्या 15 वर्षांपासून बंद आहे. गावकऱ्यांनी सांगितलं की ग्लुकोमीटर वगैरे दूर आजपर्यंत तिथे सामान्य माणसांसाठी रुग्णालय सुद्धा नाही.
तिथे रोहितच्या गावापासून एक तासाच्या अंतरावर असलेल्या खिवाईपट्टी गावात 5 वर्षीय अर्चनाला तर रुग्णालयात पोहोचायलाही वेळ मिळाला नाही. रात्री काही न खाता पिता ती झोपली. सकाळी तिला कापरं भरलं आणि तिचा मृत्यू झाला.
अर्चनाची आई तिचा फोटो हातात धरून रडत आहे. तिच्या बाजूला असलेली सरस्वती देवी सांगतात, "सकाळी उठली तेव्हा ती घामाने भिजली होती. तिची आई अंघोळ करून आली आणि तिला उठवायला लागली. मग कळलं की तिची दातखीळ बसली आहे."
"आम्ही दातखीळ सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र दात पुन्हा कडक होऊन एकमेकांत अडकायचे. तिला प्रचंड कापरं भरलं. असं होत होत पंधरा मिनिटांत तिने प्राण सोडला."
मुजफ्फरपूरमध्ये उष्णतेचा प्रकोप रात्रीही कमी झाला नव्हता. मृतांचा आकडा मात्र वाढतच होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)