भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप 2019 : दोन्ही देशांमधल्या सामन्याला का चढतो युद्धाचा रंग?

फोटो स्रोत, Twitter/BCCI
भारत-पाकिस्तानची मॅच ही कधीच सामान्य मॅच नसते. त्यात सर्व स्तरातील लोकांची भावनिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर असते. आपलं पद, प्रतिष्ठा विसरून हिरीरीने लोक या युद्धजन्य मॅचचा आनंद घेतात.
काही चाहत्यांचा आवेश हा भारत-पाकिस्तानची मॅच जणू जीवन मरणाचा प्रश्न आहे अशा प्रकारचा असतो. मात्र खेळाडूंवर त्याचं दडपण येतं. रविवारी वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मॅचच्या आधी आणि नंतरही अशाच भावनांना पूर आला होता.

फोटो स्रोत, Video Grab
रविवारी झालेल्या मॅचला पुलवामा हल्ला आणि बालाकोट सर्जिकल स्ट्राईकची पार्श्वभूमी होती. त्यामुळं आधीपासूनच एक वातावरण निर्मिती झाली होती. काही दिवसांपूर्वी पाकिस्तानने एक जाहिरात केली होती.
या जाहिरातीत बालाकोट स्ट्राईकच्या वेळी चर्चेत आलेले विंग कमांडर अभिनंदन यांच्या सारखीच दिसणारी एक व्यक्ती चहा पिताना दिसत आहे. ही जाहिरात म्हणजे त्या व्हीडिओचं नाट्य रुपांतर आहे जो अभिनंदन यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतल्यानंतर समोर आला होता. ही जाहिरात गेल्या काही दिवसात सोशल मीडियावर चर्चेचा विषय होता.
त्याला प्रत्युत्तर म्हणून भारत पाकिस्तानचा बाप आहे अशा आशयाची एक जाहिरात आली. त्यातच 16 जून म्हणजेच मॅचच्या दिवशी 'फादर्स डे' होता. त्यामुळे या दिवसाचं निमित्त साधल्यामुळे ही जाहिरात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत होती.
पुन्हा एकदा स्ट्राईक
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही कालच्या सामन्यानंतर भारताने पाकिस्तानवर पुन्हा एकदा स्ट्राईक केला आहे आणि त्यात भारत नेहमीप्रमाणे जिंकला असं ट्वीट करत या चर्चेत शड्डू ठोकला. त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. आपण आता गृहमंत्री आहात त्यामुळे खेळाला राजकारणाचं रूप देऊ नका असं ट्वीट काही युजर्सने केलं आहे.

फोटो स्रोत, Twitter
माजी क्रिकेटपटू आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारत-पाक सामन्याच्या पार्श्वभूमीवर ट्वीट्स केले आहेत. पहिल्या ट्वीटमध्ये त्यांनी क्रिकेटमध्ये मनोबलाला अधिक महत्त्व असल्याचे लिहिले आहे.

फोटो स्रोत, Twitter
आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात, जेव्हा मी क्रिकेट खेळायला सुरूवात केली तेव्हा 70 टक्के महत्त्व उपजत कौशल्याला होतं आणि 30 टक्के महत्त्व मनोबलाला होतं. मी जेव्हा क्रिकेट थांबवलं तेव्हा त्याचं प्रमाण 50-50 झालं होतं. पण आता ते 60 आणि 40 टक्के झाल्याच्या गावस्कर यांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. मनोबलाला आता 60 टक्के महत्त्व आलं आहे.
खेळाडूंचं काय मत आहे?
बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचे माजी कर्णधार इंझमाम उल हक म्हणाले, "हे बघा क्रिकेट फक्त एक खेळ आहे. कुणीतरी जिंकणार आणि कुणीतरी हारणार हे निश्चित आहे. हे युद्ध नाही. या खेळामुळे हे दोन देश एकमेकांशी जोडले जातात आणि त्याकडे फक्त खेळासारखं पाहायला हवं. खेळाडूंमध्ये कोणत्याही प्रकारचं वैर नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी या खेळाचा निखळ आनंद घ्यावा."
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
तसंच पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीबरोबर माझे चांगले संबंध असल्याचं सांगितलं. तो म्हणाला, "माझे आणि विराटचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत. विराट एक अतिशय चांगला माणूस आहे. तो क्रिकेटमध्ये त्याच्या देशाचं प्रतिनिधित्व करतो. जसं तो प्रतिनिधित्व करतो तसंच मीही करतो. तो माझ्याशी कायमच आदरपूर्वक वागला असून त्याने माझ्या फाऊंडेशनसाठी सही केलेली टीशर्टही दिली आहे."
"मला वाटतं की व्यक्ती दोन लोकांमध्ये जसं नातं निर्माण होतं त्याचप्रमाणे दोन देशांतही व्हायला हवं. पाकिस्ताननंतर मला सगळ्यात जास्त आदर भारत आणि ऑस्ट्रेलियात मिळाला आहे." आफ्रिदी पुढे सांगतो.
तसंच भारताचा कर्णधार विराट कोहलीने मॅचच्या आदल्या दिवशी सांगितलं की मॅचची जितकी वातावरण निर्मिती झाली आहे आम्ही त्यापासून स्वत:ला दूर सारण्याचा प्रयत्न करत आहोत. भारत पाकिस्तानचा सामना इतर सामन्यांसारखाच खेळणार आहोत असंही तो म्हणाला होता.
तसंच भारताचे माजी खेळाडू चंदू बोर्डे यांच्या मते भारत पाकिस्तान मॅच संदर्भात सध्याचं वातावरण हे अभूतपूर्व आहे. दोन्ही देशावर इतकं दडपण असतं की त्याचा अप्रत्यक्षपणे दबाव येत असल्याचंही ते म्हणाले.
...तेव्हा खेळाचा पराभव होतो
प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी यांचंही एक ट्वीट काल व्हायरल झालं होतं. "कोणत्याही खेळात त्या सामन्यापेक्षा देश जास्त महत्त्वाचे होतात. तेव्हा प्रत्यक्ष मॅच होण्यापूर्वीच खेळाचा पराभव होतो." अशा आशयाचं ते ट्वीट होतं.

फोटो स्रोत, Twitter
शेवटी भारत पाकिस्तान ही इतर मॅचेससारखी आहे, असं कितीही सांगितलं तरी भारतीयांच्या भावना उचंबळतातच. ही गोष्ट काल प्रत्यक्ष आणि सोशल मीडियावरही पहायला मिळालं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








