विजय शंकर: वर्ल्ड कप पदार्पण भारत-पाकिस्तान मॅचमधून करणारा '3डी प्लेयर'

फोटो स्रोत, Getty Images
रविवारच्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत विजय शंकर वर्ल्ड कप पदार्पण करत आहे. कोण आहे विजय शंकर?
शिखर धवनच्या बोटाला दुखापत झाली असल्याने टीम इंडियाने विजय शंकरला संघात समाविष्ट केलं. वर्ल्ड कपसाठी संघनिवड झाली त्यावेळी सर्वाधिक चर्चा चौथ्या क्रमांकावर कोण खेळणार, याची होती.
एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवडसमितीने चौथ्या क्रमांकासाठी विजय शंकरच्या नावाला पसंती दिली. उत्तम बॅटिंग तंत्रकौशल्य, उपयुक्त बॉलर आणि चांगली फील्डिंग करत असल्याने प्रसाद यांनी विजय शंकर हा 'थ्री डायमेन्शनल प्लेयर' असल्याचं म्हटलं होतं.
यावर वर्ल्ड कप संघात स्थान मिळू न शकलेल्या अंबाती रायुडूने "आता मॅच पाहायला थ्रीडी गॉगल घेऊन येतो," असं ट्वीट केलं होतं.
विजय शंकरकडे फक्त 9 वनडेंचा अनुभव आहे. इतक्या कमी अनुभवाच्या बळावर त्याला वर्ल्ड कप संघात स्थान देण्यात आलं.
फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तामिळनाडूतर्फे खेळताना विजय शंकरने 47.50च्या अव्हरेजने 2099 धावा केल्या आहेत. IPL स्पर्धेत विजय चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळला आहे.
'कॉफी विथ करन' कार्यक्रमात वादग्रस्त उद्गारांप्रकरणी हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांच्यावर बंदीची कारवाई झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात विजय शंकरला भारतीय संघात समाविष्ट करण्यात आलं होतं. विजयने मधल्या फळीत फलंदाजी करताना गोलंदाजीतही चमक दाखवली होती.
यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर आलेला असताना, नागपूर वनडेत ऑस्ट्रेलियाला जिंकण्यासाठी 11 रन्सची आवश्यकता होती. विजयने या ओव्हरमध्ये मार्कस स्टोनिअस आणि अडम झंपा यांना बाद करत भारताच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
दिनेश कार्तिकच्या प्रदीर्घ अनुभवाच्या तुलनेत विजय शंकरच्या ऑल राऊंड खेळाला टीम इंडियाने पसंती दिली. पण त्याला चौथ्या क्रमांकावर पाठवतात का, यावर शेवटपर्यंत पडदा होताच.
मात्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या रोहित शर्माची विकेट गेली आणि चौथ्या क्रमांकावर आला हार्दिक पांड्या. त्यामुळे विजय शंकरला नंतर यावं लागेल, असं दिसतंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








