नरेंद्र मोदींचा बिश्केक दौरा : मोदी जिथे गेले आहेत, तिथला राजमा अख्खा भारत खातो

    • Author, फुमॉक स्टॅब्डन
    • Role, भारताचे माजी राजदूत

पंतप्रधान नरेंद्र मोदी शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी किर्गिस्तानची राजधानी बिश्केकला गेले आहेत.

पण मोदींची ही पहिली बिश्केक यात्रा नाही. याआधी 2015मध्ये त्यांनी एकदा बिश्केक दौरा केला होता.

दिल्लीहून बिश्केकला विमानाने जायला तीन तास लागतात आणि या शहरासोबत भारताचं एक खास नातं आहे.

प्राचीन सिल्क रूटच्या मार्गामध्ये अला-टू पर्वतरांगाच्या पायथ्याशी वसलेल्या या देशातून अनेकवर्षांपासून भारत सैन्यासाठीची सामग्री तर विकत घेतोच पण राजमाही विकत घेतो.

यासोबतच ऐतिहासिक दृष्ट्या हा देश आणि भारतामध्ये घनिष्ट संबंध आहेत.

बिश्केकचं ऐतिहासिक महत्त्व

एकेकाळी या शहराचं नाव होतं - पिश्पेक. एका किल्ल्याच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आलं होतं.

हा किल्ला प्राचीन किर्गिस्तानातील कोकंड साम्राज्याचा राजा 'खानाते' ने बांधला होता. ताश्कंद आणि इसिक-कुल तलावाच्या मधला मार्ग संरक्षित करणं हे यामागचं उद्दिष्टं होतं.

यानंतर 1860मध्ये बोल्शेविक राजवटीने पिश्पेकचा विध्वंस करत आपली नवी वसाहत केली.

1885मध्ये सोव्हिएत नेता मिखाईल फ्रूंज यांचा जन्म या शहरात झाला होता. म्हणूनच 1926मध्ये हे शहर फ्रूंज नावाने ओळखलं जाऊ लागलं.

पण 1991मध्ये सोव्हिएत संघाचं विघटन झाल्यानंतर या शहराला पुन्हा एकदा बिश्केक म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

बिश्केकच्या संस्कृतीमध्ये दुधाचं एक विशेष स्थान आहे. ज्या लाकडी कालथ्याने घोडीचं आंबवलेलं दूध ढवळून - कुमीस नावाचा पदार्थ केला जातो, त्याला बिश्केक म्हणतात.

सोव्हिएत संघाचं स्वित्झर्लंड

बिश्केकच्या भौगोलिक वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर हे एक अतिशय प्राचीन शहर आहे. पण हे शहर समृद्ध आहे, असं मात्र म्हणता येणार नाही.

इथल्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमुळे एकेकाळी या शहराला सोव्हिएत संघाचं स्वित्झर्लंड म्हटलं जायचं.

आपल्या या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बर्फाच्छादित अला-अरछा डोंगररांगांमधील स्टेट कॉटेजमध्ये राहणार आहेत.

हे शहर पाहिल्याबरोबर आपल्याला सोव्हिएत स्थापत्यशैली आठवते.

हे शहर ग्रिड पॅटर्ननुसार वसवण्यात आलंय. इथे मोठमोठ्या बागा आहेत आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडं आहेत.

या शहरावर आजही सोव्हिएत युगाची छाप आहे. पण काळानुसार आता बिश्केकमध्ये आधुनिक इमारतीही दिसू लागल्या आहेत.

या शहरात 80 देशांतून आलेले लोक राहतात. यात कोरियन, जर्मक, उझ्बेक, तझाकिस्तानी, रशियन, उईघूर, तुंगन, अर्मेनियन, अझारी, चेचेन्या, दागिस्तानी आणि युक्रेनच्या लोकांचा समावेश आहे.

स्टॅलिनच्या काळात या सगळ्या लोकांना जबरदस्तीने या शहरात ठेवून घेण्यात आलं होतं.

या शहरात आजही रशियन भाषा बोलली जाते. पण आता हळहळू इंग्रजीही रुळायला लागली आहे.

शहराच्या मधोमध व्हाईट हाऊस नावाची इमारत आहे, जिच्या समोर पौराणिक राजा मानसचं शिल्प आहे.

वेगवेगळ्या प्रकारचं जेवण मिळणारी अनेक रेस्टॉरंट्स बिश्केकमध्ये आहेत. यात भारतीय, युरोपीयन, चिनी आणि रशियन पद्धतीचे पदार्थ मिळतात.

हत्यारांचं केंद्र

या शहराच्या औद्योगिकीकरणासाठी सोव्हिएत संघाने दुसऱ्या महायुद्धादरम्यान प्रयत्न केले.

1940मध्ये रशियामध्ये काम करणाऱ्या अनेक कंपन्यांची स्थापना इथे करण्यात आली.

यातल्या अनेक कंपन्या आजही सुरू आहेत. यामध्ये लेनिन वर्क्सचाही समावेश आहे.

ही कंपनी सगळ्या प्रकारच्या बंदुकांसाठीच्या गोळ्या बनवते. या गोळ्या विकत घेणाऱ्यांमध्ये भारताचाही समावेश आहे.

भारतीय वायुसेनेचं प्रशिक्षण

1941मध्ये ओडेसा मिलिटरी एव्हिएशन पायलट्स स्कूलची फ्रूंजमध्ये पुन्हा स्थापना करण्यात आली.

यानंतर या संस्थेचं नाव 'फ्रूंज मिलिटरी स्कूल फॉर युएसएसआर एअरफोर्स पायलट' ठेवण्यात आलं.

शीतयुद्धाच्या काळामध्ये याच संस्थने काही प्रसिद्ध पायलट्स घडवले होते.

भारतीय वायुसेनेतील अनेक अधिकाऱ्यांनीही याच संस्थेतून प्रशिक्षण घेतलेलं आहे. यामध्ये एअर चीफ मार्शल दिलबाग सिंह यांचाही समावेश आहे.

याशिवाय सिरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष हफज-अल-असद, इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष होस्नी मुबारक, मोझाम्बिकचे माजी वायुसेना कमांडर अहमद हुसैन हे देखील याच संस्थेचे विद्यार्थी आहेत.

या संस्थेला आता 'मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ द आर्म्ड फोर्सेस ऑफ द किरगीझ रिपब्लिक' म्हणून ओळखलं जातं.

या शहरातल्या फ्रूंज एअरपोर्टचं नाव बदलून आता मानस एअरपोर्ट करण्यात आलंय.

2003मध्ये अमेरिकेने त्यांच्या अफगाणिस्तानमधील सैनिकी कारवाईसाठी याच ठिकाणी आपला हवाई तळ बनवला होता.

दुसरीकडे बिश्केकपासून 20 किलोमीटरवर असणाऱ्या 'कांत'मध्ये रशियाने आपला हवाई तळ बनवलेला आहे.

बिश्केक हे इतर प्रकारची हत्यारं बनवणारं केंद्रंही आहे. इथे असणारी दास्तान ही कंपनी इलेक्ट्रिक टॉर्पोडीसाठीचे सुटे भाग बनवते. 1997 पासून भारतीय नौदलाचे दास्तानसोबत चांगले व्यापारी संबंध आहेत. ही कंपनी अत्याधुनिक ऑक्सिजन टॉर्पिडो 53-65KE आणि इलेक्ट्रिक टॉर्पिडो SET-92HK बनवते.

बिश्केकमध्ये याशिवाय कपडे, बूट आणि इंजिनिअरिंगसाठीच्या अवजड सामानाची निर्मितीही होते.

राजमा आणि भारत

कझाकिस्तान आणि उझबेकिस्तानकडे तेलसाठे आहेत, पण किर्गीस्तान मात्र इतका श्रीमंत नाही. परिणामी अर्थव्यवस्था कठीण परिस्थीत आहे. याआधी हा देश इतर देशांना हायड्रो-पॉवर पुरवत होता.

पण या देशाचं कृषी उत्पादन आणि पशुउत्पादन चांगलं आहे. च्युय खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भात, फळं आणि भाज्यांची शेती केली जाते.

याशिवाय तुर्की कंपन्या इथे मोठ्या प्रमाणावर राजमाची शेती करतात. हा राजमा नंतर भारताला निर्यात केला जातो. यासोबतच इथे मोठ्या प्रमाणावर कांद्याचीही शेती होते.

तलास हे शहर बटाट्याच्या उत्पादनासाठी ओळखलं जातं. याच शहरात भारताने बटाट्याचे वेर्फस बनवणारी एक कंपनी स्थापन केली आहे.

चीनी प्रभाव

खाण उद्योगाचा विकासही इथे होतोय. पण या क्षेत्रात सध्या चीनचा वरचस्मा आहे. चीनी सीमारेषेजवळच्या शिनजियांग प्रांतातून अनेक चीनी वस्तू इथे येतात. डोरडॉय बाजार हा बिश्केकमधला सगळ्यांत मोठा घाऊक बाजार आहे.

इथून अनेक चीनी वस्तूंची दुसऱ्या देशांमध्ये पुनर्नियात केली जाते.

निळंशार पाणी आणि निळ्या आकाशाचा संगम असलेला प्रसिद्ध इस्सेक-कुल तलाव बिश्केकपासून जवळपास 220 किलोमीटरवर आहे.

बर्फाच्छादित तिआन-शान डोंगररांगांच्या मधोमध वसलेला हा तलाव जगातला दुसऱ्या क्रमांकाचा मोठा खाऱ्या पाण्याचा तलाव आहे.

हा शांत तलाव हे सोव्हिएत संघातल्या उच्चभ्रूंचं आवडतं ठिकाण होतं. इथे येणाऱ्या पॉलिट ब्यूरोचे सदस्य, शास्त्रज्ञ, विद्वानांसाठी आजारपणातून उठल्यानंतर आराम करण्यासाठीची विश्रामगृहं होती.

या तलावाच्या जवळ नव्यानेच उभ्या राहिलेल्या रिसॉर्ट्समध्ये थर्मल बाथ, सनबाथ घेता येतो. युर्टमध्ये रात्र घालवणं हा उत्तम अनुभव आहे आणि इथून सगळीकडे हायकिंगसाठी जाता येतं आणि वॉटर स्पोर्ट्सचा आनंदही घेता येतो.

या तळ्याच्या उत्तरेला काराकोल नावाची जागा आहे. तिथे उलान टॉर्पिडो रेंज आहे. सोव्हिएत निर्मित या जागी नौसेनेसाठीची आयुधं आणि पाणबुड्यांची चाचणी करण्यात येते.

युद्धात वापरण्यासाठीच्या कोणत्याही शस्त्राची चाचणी इथे करता येऊ शकते आणि भारतीय नौसेना 1997पासून इथे आपल्या प्रोटोटाईप टॉर्पिडोची चाचणी करते.

दरवर्षी भारत इथे सरासरी 20 चाचण्या करतो.

बिश्केकची राजकीय ओळखही आहे. आधी सोव्हिएत अंमलाखाली असणाऱ्या या शहराने फार लवकर प्रजासत्ताक अवलंबलं. इथले पहिले राष्ट्रपती अस्कर आकेव यांनी 1991मध्ये इथे प्रजासत्ताकाची बीजं रोवली.

इंदिरा नावाचा परिणाम

या जागेने दोन आंदोलनंही पाहिली. यामध्ये 2010मध्ये झालेल्या ट्युलिप क्रांतिचाही समावेश आहे.

सोव्हिएत संघ काळापासून भारताचे बिश्केकशी संबंध आहेत. आणि अनेकजणांनी मला सांगितलं की जेव्हा इंदिरा गांधींनी 1950च्या दशकात फ्रूंजचा दौरा केला तेव्हा त्यांनतर इथे जन्मलेल्या मुलींची नावं इंदिरा ठेवण्यात आली होती. बिश्केकमध्ये आजही हे नाव लोकप्रिय आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधींनी सोनिया गांधींसोबत 1985मध्ये बिश्केकचा दौरा केला होता. आणि बिश्केकच्या मुख्य चौकात एक रोपंही लावलं होतं.

त्यानंतर दोन्ही देशांचे संबंध अधिक घट्ट झाले.

मार्च 1992मध्ये बिश्केकमध्ये आपला राष्ट्रीय झेंडा फडकावणाऱ्या सुरुवातीच्या काही देशांपैकी एक भारत होता. भारतीय मिशनची सुरुवात इथे त्यावेळी करण्यात आली होती.

1995मध्ये पंतप्रधान नरसिंह राव यांनी किर्गिझ संसदेच्या दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे संबोधित केलं होतं.

ऐतिहासिक दृष्ट्या बिश्केकमध्ये एकेकाळी सकस (सिथियन) राज्यं होतं. जे नंतर ख्रिस्तपूर्व काळात दुसऱ्या शतकातल्या कुशान राजवटीमध्ये उत्तर भारतापर्यंत पोहोचलं होतं.

उत्तर भारतातले कोहली हे किर्गीस्तानातून स्थलांतरित झाले असल्याचं म्हटलं जातं.

नंतर भारतीय व्यापारी आणि समरकंदचे सोगडीयन लोक, सिल्क रूटमार्गे इथे बौद्ध धर्म घेऊन आले.

काश्मिरच्या बौद्ध केंद्रांशी संबंध

ग्रेको-बौद्ध, गांधार आणि काश्मिरी बौद्ध धर्माचे पुरातन अवशेष सिल्क रूटवर असणाऱ्या च्युय खोऱ्यामध्ये अनेकदा मिळतात.

सुयब आणि नवकेतमध्ये मिळालेले पुरातन बौद्ध परिसर हे अनेक भारतीय आणि चीनी पर्यटकांना आकर्षित करतात.

याचप्रकारे, तोकमकमध्ये असणारं बौद्धं केंद्र (अक-बेशिम, क्रास्नाया रेका, नोवोपाकोवका आणि नोवोपावलोव्का) यांचा संबंधही काश्मीरमधल्या बौद्ध केंद्रांशी होता.

सूफी कनेक्शन

भारत आणि किर्गीस्तानमधील आणखी एक दुवा म्हणजे प्रसिद्ध सूफी संत कुतुबुद्दीन बख्तिया काकी. 12व्या शतकातील या सुफी संताने दिल्लीमध्ये चिश्ती पंथाची स्थापना केली होती.

दिल्लीतल्या महरौलीमध्ये असणाऱ्या त्यांच्या दर्ग्यावर दरवर्षी त्यांच्या स्मरणार्थ ऊर्स भरतो.

यासोबतच मानस आणि महाभारतामध्ये काही समानता असल्याचं इतिहासकारांचं म्हणणं आहे. म्हणूनच भारतामध्ये दिल्लीतल्या चाणक्यपुरीमध्ये एका रस्त्याला 'मानस' असं नाव देण्यात आलं आहे.

किर्गीस्तानी लोकांना त्यांचे प्रसिद्ध साहित्यिक चिंगीज एतमातोव यांचाही अनुभव आहे. भारताने एतमातोव यांचा नेहरू पुरस्काराने सन्मान केला होता.

बिश्केकमधील शैक्षणिक संस्थाही नावाजलेल्या आहेत. अमेरिका, रशिया, चीन आणि तुर्कस्थानने बिश्केकमध्ये आपल्या विद्यापीठांची स्थापना तिथं केलेली आहे.

पण भारताने इथे विद्यापीठ स्थापन करण्याचं दिलेलं वचन मात्र अजूनही अपूर्ण आहे.

किर्गिस्तानातल्या विविध वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये 1000 पेक्षा जास्त भारतीय विद्यार्थी शिकत आहेत. शिवाय काही व्यावसायिक किर्गीस्तानात व्यापार आणि इतर सेवा देत आहेत.

चहा आणि फार्मास्युटिक्लसचा व्यापार इथे जास्त होतो. इथे अशीही काही भारतीय रेस्टॉरंट्स आहेत जी परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या आवडीची आहेत.

किर्गिस्तानासोबतचे भारताचे संबंध हे बहुतांशी घट्ट राहिले आहेत.

नुकतंच काही दिवसांपूर्वी 30 मे 2019रोजी किर्गीस्तानचे राष्ट्रपती सोरोनबाय शारीपोविच यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावली होती.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)