You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गेल्या वर्षभरात देशातील बँकांमध्ये 71 हजार कोटींचा घोटाळा : #5मोठ्याबातम्या
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा घेऊया.
1. गेल्या वर्षभरात देशातील बँकांमध्ये 71 हजार कोटींचा घोटाळा
देशभरातील बँकांची थकित कर्जाची रक्कम वाढत असतानाच आर्थिक घोटाळ्यांचीही संख्या वाढली आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षात विविध बँकांमध्ये आर्थिक घोटाळ्यांच्या सहा हजार ८०० प्रकरणांची नोंद झाली असून या घोटाळ्यांचा आकडा ७१ हजार ५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
रिझर्व्ह बँकेने माहिती अधिकारांतर्गत ही आकडेवारी दिली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी प्रसिद्ध आहे.
व्यावसायिक बँका आणि निवडक वित्तीय संस्थांमध्ये मिळून गेल्या आर्थिक वर्षात ७१ हजार ५४२.९३ कोटी रुपयांचे आर्थिक घोटाळे झाले आहेत. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यावर्षी घोटाळ्यांत ७३ टक्क्यांनी वाढ झाली, असं रिझर्व्ह बँकेनं सांगितलं आहे.
2. राष्ट्रवादीचे 10 आमदार संपर्कात - आंबेडकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे दहा आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. अकोल्यामध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. एबीपी माझानं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.
विधानसभेला काँग्रेससोबत युती होईल की नाही याबद्दल आताच काही सांगता येणार नाही, असंही आंबेडकर यांनी म्हटलं.
लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चांगली मतं मिळाली असली, तरी औरंगाबादचा अपवाद वगळता त्यांचा उमेदवार निवडून आला नाही. त्याबद्दल बोलताना आंबेडकरांनी म्हटलं, की औरंगाबाद सोडलं तर अन्य ठिकाणी मुस्लिम मतदार सोबत न आल्यानं वंचित बहुजन आघाडीचा पराभव झाला.
3. विधानसभेआधी शेतकऱ्यांना मोफत वीज?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांसाठी मोफत वीजेची घोषणा करण्याचा सरकारचा विचार आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.
आर्थिक सवलत देऊन शेतकऱ्यांसाठी पुन्हा कृषी संजीवनी योजना देता येईल का याची चाचपणी सुरू आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णयही लवकरच घेतला जाईल, असं बावनकुळे यांनी म्हटलं. लोकसत्तानं यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
महावितरणची वीजबिल थकबाकी मार्च २०१९ अखेरपर्यंत ४७ हजार ५५८ कोटी रुपयांवर गेली असून कृषीबिल थकबाकी २९ हजार १२३ कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. दुष्काळामुळे गेल्या दोन महिन्यांत ती आणखी वाढली आहे.
4. अर्थसंकल्पीय अधिवेशनातही EVM वर चर्चा?
लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरही विरोधक आपला EVM चा मुद्दा सोडायला तयार नाहीत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महत्त्वाच्या विरोधी पक्षांची दिल्लीमध्ये बैठक होणार आहे. हिंदुस्तान टाइम्सनं या बैठकी संबंधीची बातमी प्रसिद्ध केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत याविषयी चर्चा केल्याचं वृत्त आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानंही त्यांच्या अंतर्गत बैठकीत EVM च्या विषयावर चर्चा केली.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात EVM सोबतच शेतकऱ्यांचे प्रश्न, संस्थांची स्वायत्तता हे मुद्देही विरोधकांकडून मांडले जाण्याची शक्यता आहे.
5. जम्मू-काश्मिरमधील निवडणुका अमरनाथ यात्रेनंतर
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेनंतर जम्मू-काश्मिरमध्ये विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर होईल असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
दरम्यान, आपण राज्यातील परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवू आणि सुरक्षा यंत्रणांकडून वेळोवेळी आवश्यक ती माहिती मागवत राहू, असं आयोगानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. द क्विंटनं हे वृत्त दिलं आहे.
अमरनाथ यात्रेला 2 जुलैपासून सुरूवात होणार असून 15 ऑगस्टला यात्रेचा समारोप होईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)