निवडणुकांच्या निकालांमुळे ‘या’ दिग्गजांच्या घराणेशाहीवर पूर्णविराम?

    • Author, कीर्ति दुबे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

या लोकसभा निवडणुकीत भाजपला 2014 पेक्षाही मोठा विजय मिळाला. भाजपला स्वबळावर 303 जागा मिळाल्या तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएला 350 जागा मिळाल्या.

2014 साली भाजपनं 282 तर एनडीएनं 336 जागांवर विजय मिळवला होता. मोदींवर विश्वास दाखवताना मतदारांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये आघाडीला नाकारलं. काँग्रेसची न्याय योजनाही फारशी परिणामकारक ठरली नाही.

यंदाच्या निवडणुकीचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे मतदारांनी घराणेशाहीला सपशेल नाकारलं. 2014 च्या मोदी लाटेत आपले मतदारसंघ टिकवून ठेवणाऱ्या दिग्गज परिवारांनाही यावेळी पराभवाचा सामना करावा लागला.

आपल्या मतदारसंघात कदाचित पहिल्यांदाच पराभव पत्करावे लागलेली ही मातब्बर घराणी नेमकी कोणती आहेत?

अमेठी: परंपरागत मतदारसंघात राहुल गांधींचा पराभव

गेल्या गुरूवारपर्यंत अमेठी आणि रायबरेली या दोन जागा काँग्रेससाठी सर्वांत सुरक्षित मानल्या जात होत्या. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसला आपल्याच बालेकिल्ल्यात मोठा झटका लागला. अमेठीमध्ये भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा 55 हजार मतांनी पराभव केला.

देशभरात काँग्रेसचा जो दारूण पराभव झाला, त्यापेक्षाही हा धक्का या पक्षांसाठी सर्वांत मोठा होता. 2014 साली काँग्रेसनं 44 जागांवर विजय मिळवला होता आणि त्यावेळीही राहुल गांधींनी स्मृती इराणींना एक लाखांहून अधिक मतांनी पराभूत केलं होतं.

यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या आठ जागा वाढल्या असल्या, तरी गांधी घराण्याला त्यांचा बालेकिल्ला मात्र गमवावा लागला.

अमेठी आणि गांधी परिवाराचं नातं जुनं आहे. 1980 साली संजय गांधींनी अमेठीतून निवडणूक जिंकली. त्यांच्या मृत्यूनंतर 1981 साली झालेल्या पोटनिवडणुकीत अमेठीनं राजीव गांधींच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. त्यानंतर राजीव गांधींनी 1984, 1989 आणि 1991 साली अमेठीमधून विजय मिळवला.

राजीव गांधींच्या निधनानंतर 1991 साली तसंच 1996 साली गांधी परिवाराच्या अत्यंत जवळचे समजल्या जाणाऱ्या कॅप्टन सतीश शर्मा अमेठीतून निवडून आले.

1998 साली मात्र भाजप उमेदवार संजय सिंह यांनी अमेठीतून विजय मिळवला. मात्र त्यावेळी अटलबिहारी वाजपेयींचं सरकार अवघ्या 13 दिवसांत कोसळलं. त्यानंतर 1999 साली इथं पुन्हा निवडणूक झाली.

1999 साली सोनिया गांधींची राजकारणात एन्ट्री झाली आणि अमेठीची जागा काँग्रेसच्या पदरात पडली. 2004 पासून राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवत आहेत. तीन वेळा राहुल अमेठीतून खासदार झाले आहेत. या निवडणुकीत राहुल गांधींचा स्मृती इराणींनी पराभव केला. राहुल गांधींच्या राजकीय कारकीर्दीतला हा पहिला पराभव आहे.

राहुल गांधींनी यावेळेस केरळच्या वायनाडमधूनही निवडणूक लढवली होती. इथून राहुल गांधी 4 लाखांहून अधिक मतांनी निवडून आले आहेत. त्यामुळे खासदार म्हणून ते लोकसभेत दिसतील, मात्र त्यांचा मतदारसंघ बदललेला असेल.

सिंधिया परिवारः वाजपेयींना हरविणारे मोदी लाटेत वाहून गेले

सिंधिया हे एकेकाळी ग्वालेहरचे संस्थानिक होते. याच परिवारातील ज्योतिरादित्य सिंधिया गुणा मतदारसंघातून 1 लाख 25 हजार मतांनी पराभूत झाले. भाजपचे उमेदवार कृष्णपाल सिंह यांनी सिंधियांचा पराभव केला.

त्यांचे वडील माधवराव सिंधिया यांच्या निधनानंतर 2002 साली झालेल्या पोटनिवडणुकीतून ज्योतिरादित्य यांनी राजकारणात पाऊल ठेवलं. गुणा मतदारसंघातून ते पाचव्यांदा निवडणूक लढवत होते.

सिंधिया घराणं गेल्या दोन पिढ्यांपासून याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. यावेळी मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

1984 साली काँग्रेसनं गुणा मतदारसंघातून माधवराव सिंधियांना उमेदवारी दिली. त्या निवडणुकीत माधवरावांनी भाजपचे दिग्गज नेते अटलबिहारी वाजपेयींचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला होता.

गुणा मतदारसंघातून सिंधिया कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतात, या गोष्टीनं काहीच फरक पडत नाही. गुणामध्ये झालेल्या एकूण 20 निवडणुकांपैकी 14 निवडणुकांमध्ये सिंधिया कुटुंबातील सदस्यानेच विजय मिळवलेला होता.

ज्योतिरादित्य सिंधियांच्या आजी विजयाराजे सिंधिया यांनी काँग्रेस, स्वतंत्र पक्ष आणि भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. वडील माधवराव सिंधियांनी सुरूवातीला जनसंघ आणि नंतर काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली.

2001 साली राजकारणात प्रवेश केलेल्या ज्योतिरादित्य सिंधियांनी गुणामधून नेहमीच काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे. ज्योतिरादित्य सिंधियांच्या राजकीय कारकिर्दीतला हा पहिलाच पराभव आहे.

लोहियांचा मतदारसंघ असलेल्या कनौजमधून डिंपल पराभूत

मुलायम सिंह यादव यांची सून डिंपल यादव समाजवादी पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ कनौज राखू शकल्या नाहीत. भाजपचे उमेदवार सुव्रत पाठक यांनी डिंपल यांचा 12 हजारहून अधिक मतांनी पराभव केला.

कनौज हा समाजवादी राजकारणाचा चेहरा मानल्या जाणाऱ्या राम मनोहर लोहियांचा मतदारसंघ. या मतदारसंघातून लोहियांनी 1967 साली निवडणूक लढवली होती आणि ते विजयी झाले होते. मुलायमसिंह यादव 1999 साली याच मतदारसंघातून निवडून आले होते.

यानंतर 2000 पासून 2012 पर्यंत तीन वेळा अखिलेश यादव कनौजमधून खासदार म्हणून निवडून आले. 2012 साली उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदासाठी त्यांनी ही जागा सोडली. अखिलेश यांनी ही जागा सोडल्यानंतर इथे पोटनिवडणूक झाली.

विशेष म्हणजे या पोटनिवडणुकीत बसपा, काँग्रेस आणि भाजपनं आपले उमेदवारच उभे केले नव्हते. या निवडणुकीत अखिलेश यांच्या पत्नी डिंपल यादव कनौजमधून निवडून आल्या.

2014 सालीही डिंपल यादव कनौजमधून निवडून आल्या. मात्र 2019 मध्ये मोदी लाट एवढ्या मोठ्या प्रमाणात होती, की समाजवादी पक्षाची सर्वांत सुरक्षित समजली जाणारी कनौजची जागा डिंपल यादव राखू शकल्या नाहीत.

लालू प्रसाद यादवांची कन्या मीसा भारतीही पराभूत

लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती पाटलीपुत्रमधून पराजित झाल्या. भाजपच्या उमेदवार रामकृपाल यादव यांनी 39 हजार मतांनी मीसा भारती पराभूत झाल्या.

पाटलीपुत्र मतदारसंघाचा इतिहास काही फार जुना नाहीये. 2008 साली अस्तित्त्वात आलेल्या या जागेवर पहिली निवडणूक 2009 साली झाली. तेव्हा राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी इथून निवडणूक लढवली होती. मात्र संयुक्त जनता दलाचे (जेडीयु) रंजन प्रसाद यादव यांनी लालूंचा पराभव केला.

2014 साली मीसा भारतींना इथून उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यानं आरजेडीचे नेते राम कृपाल यादव यांनी भाजपच्या तिकिटावरून निवडणूक लढवली. त्यांनी मीसा भारतींचा 40 हजार मतांनी पराभव केला.

यावेळीही राम कृपाल यादव यांनी मीसा भारतींचा जवळपास तेवढ्याच मताधिक्यानं हरवलं.

चौधरींची परंपरा राखण्यात अजित सिंह अपयशी

राष्ट्रीय लोकदलचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांना भाजपचे उमेदवार संजय बालियान यांनी मुजफ्फरनगर मतदारसंघातून अवघ्या साडेसहा हजार मतांच्या फरकांनी हरवलं.

पश्चिम उत्तर प्रदेशच्या राजकारणातील महत्त्वाचा चेहरा मानले जाणारे अजित सिंह आपला मतदारसंघ राखू शकले नाहीत.

अजित सिंह हे देशाचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचे पुत्र आहेत. जाट समुदायावर त्यांचा चांगलाच प्रभाव आहे. अजित सिंह अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये कृषी मंत्री तर मनमोहन सिंह सरकारमध्ये नागरी उड्डाण मंत्री होते.

केवळ अजित सिंहच नाही तर त्यांचे पुत्र जयंत चौधरीही बागपतमधून निवडणूक हरले आहेत. भाजपच्या सत्यपाल सिंह यांनी त्यांना जवळपास 23 हजार मतांनी पराभूत केलं. जयंत चौधरी 2009 साली मथुरामधून निवडणूक लढवून खासदार बनले होते.

पण बागपत हा चौधरी कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ होता. याच जागेवरून चौधरी चरण सिंह हे तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर अजित सिंह बागपतमधून सहा वेळा निवडणूक जिंकले होते. मात्र 2014 साली भाजपच्या सत्यपाल सिंह यांनी अजित सिंहांना पराभूत केलं.

हरियाणामध्ये चौटाला परिवाराच्या राजकीय अस्तित्वावर प्रश्नचिन्ह

देशातील सर्वांत तरूण खासदार ठरलेल्या दुष्यंत चौटाला यांना या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. हरियाणातील हिस्सारमधून भाजपच्या बृजेंद्र सिंह यांनी दुष्यंत चौटालांना तीन लाखांहून अधिक मतांनी हरवलं.

हरियाणातील सर्व 10 जागांवर भाजपनं विजय मिळवला. हरियाणात कधीकाळी काँग्रेस आणि भाजपला कडवं आव्हान देणारा चौटाला परिवार आता मात्र इथून गायब होताना दिसतोय.

कधीकाळी हरियाणात एकच नारा दिला जायचा- हरियाणा तेरे तीन लाल, बंसीलाल, देवीलाल, भजनलाल.

देवीलाल चौटाला यांना भारताच्या राजकारणात 'किंगमेकर' समजलं जायचं. देवीलाल चौटाला दोन वेळा मुख्यमंत्री झाले होते. चंद्रशेखर सरकारमध्ये ते उप-पंतप्रधान होते. त्यांचे पुत्र ओमप्रकाश चौटालाही हरियाणाचे मुख्यमंत्री होते.

मात्र चौटाला कुटुंबात 2018 साली कलह सुरू झाला आणि इंडियन नॅशनल लोकदल या पक्षात फूट पडली. त्यानंतर जननायक जनता पार्टी अर्थात जेजेपीची स्थापना झाली. ओमप्रकाश चौटालांनी आपला मुलगा अजय चौटाला याला पक्षातून काढून टाकलं आणि जेजेपी अस्तित्वात आली.

2014 साली इंडियन नॅशनल लोकदलाच्या तिकिटावर विजय मिळवलेल्या दुष्यंत यांना यावेळी मात्र स्वबळावर पक्षाला यश मिळवून देता आलं नाही. हरियाणात जेजेपी आणि आम आदमी पक्षानं हातमिळवणी केली. मात्र चौटाला परिवाराला त्याचाही फायदा झाला नाही.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)