You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रियंका गांधींचा करिश्मा निवडणुकीत का चालला नाही?
- Author, अपर्णा द्विवेदी
- Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी
नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये प्रियंका गांधी यांची जादू पाहायला मिळाली नाही. असं का झालं?
वर्ष होतं 2014. महिना- मे, ठिकाण- 24, अकबर रोड, काँग्रेस मुख्यालय.
लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते. काँग्रेस चारीमुंड्या चीत झाली होती. काँग्रेस देशभरात 44 जागांपुरता मर्यादित झाला होता. काँग्रेस समर्थक सोनिया गांधी यांच्यापेक्षा उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर नाराज होते.
त्यावेळी प्रियंका लाओ, काँग्रेस बचाओ अशा घोषणा दिल्या जात होत्या. त्यावेळी काँग्रेसजनांना प्रियंका तारणहार वाटत होती.
मात्र त्यावर काँग्रेस अध्यक्ष काही बोलल्या नाहीत की ज्येष्ठ नेते. अळीमिळी गूपचिळी. त्यावेळी काँग्रेसच्या जुन्याजाणत्या नेत्यांचं म्हणणं असं असे की राहुल गांधी बदलत आहेत. ते लवकरच किमया घडवून आणतील.
प्रियंका यांच्यावर जबाबदारी
राहुल गांधी खरोखरंच चांगलं काम करू लागले. गुजरातमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळाली. भाजप विजयी ठरलं परंतु काँग्रेसने जबरदस्त टक्कर दिली. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्ये काँग्रेसचं सरकार आलं.
राहुल गांधींच्या आक्रमक पवित्र्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमधील अस्वस्थता कमी होऊ लागली. हे सगळं सुरू असताना अचानकच लोकसभा निवडणुकांच्या चार महिने आधी प्रियंका गांधी यांनी सक्रिय राजकारणात उतरवण्यात आलं.
प्रियंका यांना महासचिव हे पद देण्यात आलं आणि त्यांच्यावर उत्तर प्रदेशातील पूर्वांचल विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली. प्रियंका रायबरेली आणि अमेठी या मतदारसंघांमध्ये सक्रिय दिसल्या. निवडणुकीच्या तोंडावर प्रियंका यांना ही जबाबदारी मिळणं काँग्रेसच्या खास डावपेचांचा भाग असं काँग्रेस नेते म्हणू लागले.
उत्तर प्रदेशातील पूर्वांचल हा भाग भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. प्रियंका यांच्यासमोर हा बालेकिल्ला भेदण्याचं आव्हान होतं.
प्रियंकांनी जिथे प्रचार केला तिथे पराभव झाला
प्रियंका गांधी यांची महासचिवपदी नियुक्ती करण्यात आली तेव्हा काँग्रेस नेत्यांनी हा मास्टरस्ट्रोक असल्याचं म्हटलं होतं. मात्र काहींनी हा घाईघाईत घेतलेला निर्णय आहे अशी टीका केली.
निवडणूक प्रचारादरम्यान प्रियंका यांनी 38 रॅली घेतल्या. यापैकी 26 उत्तर प्रदेशात होत्या. मध्य प्रदेश, दिल्ली, झारखंड आणि हरियाणात काँग्रेस उमेदवारांसाठी त्यांनी रॅली घेतल्या.
ज्या मतदारसंघात प्रियंका यांनी प्रचार केला तिथे तिथे म्हणजे 90 टक्के ठिकाणी काँग्रेस उमेदवारांचा पराभव झाला.
देशाच्या राजकारणात उत्तर प्रदेशची भूमिका निर्णायक असते. लोकसभेत या राज्याचं सर्वाधिक प्रतिनिधित्व आहे. 543 पैकी 80 खासदार उत्तर प्रदेशातून निवडले जातात.
पूर्व उत्तर प्रदेशात लोकसभेच्या 41 जागा आहेत. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गोरखपूर, अखिलेश यादव यांचा आझमगढ, अफझल अन्सारी यांचं गाजीपूर, काँग्रेसचा बालेकिल्ला असलेलं अमेठी आणि रायबरेली हे मतदारसंघ येतात.
प्रियंका यांचं कुठे चुकलं?
उत्तर प्रदेशात काँग्रेसची कामगिरी सुमार झाली. काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीत गड राखू शकले नाहीत.
नेमकी चूक झाली कुठे? प्रियंका गांधी यांच्याकडून काँग्रेसने चमत्काराची अपेक्षा केली होती का?
प्रियंका गांधी यांचा करिश्मा दिसला नाही याची काही कारणं आहेत.
प्रियंका गांधी यांनी सोळाव्या वर्षी केलेल्या भाषणाची लोक आजही आठवण काढतात. त्यांना बोलताना अनेकांना इंदिरा गांधी यांचा भास झाला होता. मात्र या घटनेला आता 30 हून अधिक वर्ष झाली आहेत.
अशा परिस्थितीत प्रियंका यांच्याकडून त्यावेळच्या करिश्म्याची अपेक्षा करणं काँग्रेसची चूक आहे. प्रियंका ऐन निवडणुकांच्या आधी राजकारणात सक्रिय झाल्या. त्यांची पीछेहाट होण्याचं प्रमुख कारण हेच सांगितलं जात आहे.
प्रियंका फक्त निवडणुकांच्या वेळीच येतात अशी टीका केली जाते. अमेठीपेक्षा त्या रायबरेलीतच रमतात असाही एक टीकेचा सूर असतो. प्रियंका यांना राजकारणात यायचं होतं तर त्यांनी आधीच काम करायला सुरुवात करायला हवी होती. यासाठी अनेकजण स्मृती इराणी यांचं उदाहरण देतात. स्मृती यांनी अमेठीत तळ ठोकला होता.
वाराणसीत मुकाबल्यापासून पळ
प्रियंका वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लढणार अशी चर्चा होती. मात्र शेवटपर्यंत तसं झालं नाही. त्यांनी मुकाबल्यातून पळ काढला कारण त्यांना पराभवाची भीती होती अशी टीका केली जात आहे. मात्र यात प्रियंका यांची भूमिका कमी आणि काँग्रेसची जास्त आहे. प्रियंका पंतप्रधान मोदींसमोर निवडणुकीला उभ्या राहिल्या असत्या तर कदाचित चित्र वेगळं दिसलं असतं.
त्यांचा पराभव झाला असता तरी त्यांना झुंजार म्हटलं गेलं असतं. मात्र प्रियंका यांनी मुकाबल्यापासून स्वत:ला दूर ठेवणं त्यांच्या विश्वासार्हतेवर परिणाम करणारं ठरलं.
पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर आरोप
डीएलएफ डीलप्रकरणी प्रियंका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. प्रियंका यांना कमकुवत करणारा हा कळीचा मुद्दा होता. निवडणुकांच्या आधी आणि दरम्यानही रॉबर्ट यांची तासनतास चौकशी सुरू होती.
रॉबर्ट यांच्या चौकशीप्रकरणी प्रियंका यांनी आक्रमक होऊन केंद्र सरकारविरुद्ध भूमिका घेतली असती तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र प्रियंका याप्रकरणी भावनिक दिसल्या. या मुद्यापासून त्या स्वत:ला दूर ठेवत आहेत असं लोकांना वाटलं.
पूर्व उत्तर प्रदेशापुरत्या मर्यादित राहिल्या
प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेशातील पूर्व भागापुरतं मर्यादित ठेवणं काँग्रेसच्या अंगलट आल्याची चर्चा आहे. गांधी कुटुंबीय आणि या परिसराची भावनिक नाळ आहे.
भाजपकडून कुटुंबापुरत्या राजकारणावर जोरदार टीका केली जात होती. प्रियंका अखिल भारतीय स्तरावर उतरल्या असत्या तर त्यांनी दमदार प्रत्युत्तर दिलं असतं. त्या उशिराने दाखल झाल्या आणि पूर्व उत्तर प्रदेशपुरत्या सीमित राहिल्या. अमेठी आणि रायबरेलीपल्याड त्यांनी फारसं पाहिलंही नाही.
संघटना पातळीवर गडबड
काँग्रेसने निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रियंका यांना लाँच केलं. त्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात केली. बूथ मॅनेजमेंटविषयी त्या बोलत होत्या मात्र प्रत्यक्षात काहीच करू शकल्या नाहीत.
काँग्रेसने संघटना पातळीवर पक्षाला मजबूत करण्याऐवजी व्यक्तीकेंद्रित राजकारणावर भर दिला. याच तर्कातून प्रियंका यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं. मात्र संघटना बळकट करण्यावर राहुल किंवा प्रियंका कोणीच लक्ष दिलं नाही.
कार्यकर्त्यांचं मनोधैर्य म्हणूनच खच्ची झालं. दुसरीकडे भाजपला राष्ट्रीय स्वयंसेवक दलाच्या रूपात खंदा पाठिंबा होता. भाजप एकेक घर, एकेक मोहल्ला अशा पातळीवर काम करत होतं.
युवा शक्तीवर काँग्रेसने फारसा विश्वास ठेवला नाही. अनुभवाची कमतरता असणाऱ्या तसंच बड्या घरातील युवा वर्गाला संधी देण्यात आली. युवा आणि अनुभव यांचा मिलाफ काँग्रेसला साधता आला नाही.
'ते' वक्तव्य
अशा उमेदवारांना संधी देण्यात येत आहे जे मतांची विभागणी करतील हे प्रियंका यांचं वक्तव्य चांगलंच गाजलं. आपल्या उमेदवारांकडून त्यांना विजयाची आशा नाही हे यातून स्पष्ट होत होतं.
जनतेसाठी काम करण्याऐवजी भाजपला धडा शिकवणं हे त्यांचं उद्दिष्ट असल्याचं मतदारांच्या लक्षात आलं. या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचं सांगत त्यांनी सारवसारव केली मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते पराभवाचं खापर प्रियंका यांच्या डोक्यावर फोडणं चुकीचं आहे. त्यांचं उशिराने आगमन झालं, त्यांच्याकडे अगदीच अपुरा वेळ होता. मात्र ही सगळी टीका काँग्रेस पक्षावरही केली जात आहे.
उत्तर प्रदेश विधानसभेत काँग्रेसने सपाटून मार खाल्यानंतर राहुल गांधी वेगाने कामाला लागले. 2019 निवडणुकासांठी तयार होण्यासाठी त्यांनी साडेतीन वर्षं घेतली. काँग्रेस पक्षच निवडणुकांसाठी तयार नव्हता, मग प्रियंका गांधी कुठून तयार असणार?
काँग्रेस पक्षाला आपला संदेश मतदारांपर्यंत न्यायला प्रदीर्घ कालावधी लागला. न्याय योजना त्यांनी मांडली मात्र लोकांना त्याबद्दल समजलंच नाही.
उज्ज्वल योजना, जनधन योजना, शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची मदत, सर्वांना घरं आणि शौचालयं यातून भाजपने गरिबांना आपलंसं केलं.
काँग्रेसला भाजपला टक्कर द्यायची असेल तर प्रियंका गांधी यांच्याकडून चमत्काराची अपेक्षा करण्याऐवजी पायाभूत पातळीवरील कार्यकर्त्यांचं संघटन पक्कं करावं लागेल. त्यांच्यावर विश्वास ठेवावा लागेल. तसं झालं असतं तर निवडणुकांमधली परिस्थिती वेगळी दिसली असती.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)