You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा निकाल : यंदा निकाल उशिरा लागणार, कारण...
17व्या लोकसभेसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे आणि येत्या काही तासांतच निकाल येऊ लागतील, पण त्यांना नेहमीपेक्षा जरा जास्त उशीर होणार आहे.
या निवडणुकीत पहिल्यांदाच VVPATचा वापर होत आहे आणि यामुळे निकाल लागण्यास काही तासांचा विलंब होईल. निवडणुकीचा अंतिम निकाल लागण्यास 5 ते 6 तास विलंब होईल, असं निवडणूक अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाचे उपआयुक्त उमेश सिन्हा यांनी राज्यसभा टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे की, "EVMनं मतमोजणी संपल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार VVPATच्या मतांशी त्याची पडताळणी केली जाईल."
या निवडणुकीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील 5 VVPAT मशीन आणि EVMच्या निकालाची तुलना केली जाईल. यापूर्वी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात एकाच VVPATमशीनचा वापर केला जात होता.
राजकीय पक्ष गेल्या काही दिवसांपासून EVMच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित करत आहेत.
मतदारानं EVMचा वापर करून ज्या उमेदवाराला मत दिलं, ते VVPATशी मॅच होत आहे की नाही, याची या प्रक्रियेमुळे पडताळणी होणार आहे.
अर्ध्या मतदानावर VVPAT पडताळणीची मागणी
VVPATचा वापर पहिल्यांदा नागालँडच्या नक्सन विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान झाला होता. यानंतर 2014मध्ये लोकसभा निवडणुकीत लखनऊ, गांधीनगर, बंगळुरू दक्षिण, मध्य चेन्नई, जाधवपूर, रायपूर, पटना साहिब आणि मिझोराममध्ये VVPAT मशीन वापरण्यात आले.
यानंतर 2017मध्ये गोवा विधानसभा निवडणुकीत VVPAT मशीनचा वापर करण्यात आला. या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदा संपूर्ण देशात VVPATचा वापर करण्यात आला.
प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील 50 टक्के मतदानाची पडताळणी VVPAT मशीनच्या साहाय्यानं करण्यात यावी, अशी विरोधकांची मागणी होती.
पण, असं करण्यासाठी जवळपास 5 दिवस लागतील आणि त्यामुळे निवडणुकीच्या निकालास विलंब लागेल, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे.
प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील 5 EVM आणि VVPAT मशीनमधील मतांची पडताळणी करण्यात यावी, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे.
यासाठी विधानसभा क्षेत्रातील 5 VVPAT मशीनची निवड रँडमली करण्यात येईल आणि EVM आणि VVPAT मधील मतांची पडताळणी करण्यात येईल, असं निवडणूक आयोगानं म्हटलंय.
यासाठी प्रत्येक मतमोजणी केंद्रावर VVPAT बूथ बनवण्यात आला आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)