You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
काश्मीरमध्ये 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार, बांदीपुरात महिलांचे आंदोलन
काश्मीरमधल्या बांदीपुरा जिल्ह्यात तीन वर्षांच्या एका मुलीवर कथितरित्या बलात्कार झाल्याचं वृत्त आहे.
ही मुलगी आणि आरोपी संबुलच्या मलिकपुरा गावात राहातात. या बलात्काराच्या विरोधात बांदीपुरा जिल्हा तसंच इतर भागात लोकांनी निदर्शनं केली. या घटनेनंतर दोन्ही ठिकाणी कर्फ्यू लावला आहे.
सुरक्षा यंत्रणांनी मलिकपुराकडे जाणारे सगळे रस्ते बंद केले आहेत. इतकंच नाही तर कोणत्याही मीडियाच्या व्यक्तीलाही तिथं जायची परवानगी नाहीये. कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून मुख्य रस्त्यावरही मोठ्या प्रमाणावर सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत.
बारामुल्लामध्ये या घटनेचे पडसाद उमटले आहेत. अनेक ठिकाणी हिंसक आंदोलनं झाली ज्यात अनेक तरुण जखमी झाल्याचं वृत्त आहे. एका आंदोलकाची परिस्थिती गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे.
या घटनेने काश्मीर खोऱ्याचं वातावरण ढवळून निघालं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे आणि तपास सुरु आहे.
या मुलीचे वडीलांनी आरोप केलाय की त्यांच्या मुलीवर शाळेच्या बाथरूममध्ये बलात्कार झाला. ही शाळा त्यांच्या घराला लागूनच आहे. त्यांचं म्हणणं आहे की या प्रकाराचा त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला प्रचंड धक्का बसला आहे.
त्यांनी बीबीसीशी बोलतना सांगितलं की, "9 मे च्या संध्याकाळची गोष्ट असेल, कदाचित 7 वाजले असतील. मी रोजा सोडायला मशिदीत गेलो होतो. त्याचवेळेस माझी बायको माझ्या मुलीला शोधत शोधत घराबाहेर आली. तिने मुलीला खूप हाका मारल्या, पण तिच्याकडून उत्तर आलं नाही. तिथे एक लहानसा तलावही आहे. आम्हाला वाटलं आमची मुलगी पाण्यात बुडाली. पण सत्य परिस्थिती काही वेगळीच होती."
ते पुढे सांगतात, "आम्हाला वाटलं ती मेली की काय. आम्ही परत हाका मारल्या. बराच वेळ झाल्यानंतर शाळेकडून अस्फुट आवाज ऐकू आला. ती आई-आई हाका मारत होती. शाळेत गेल्यावर ती अत्यंत वाईट परिस्थितीत आम्हाला सापडली. आरोपीने तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण मी आणि आमच्या शेजाऱ्यांनी मिळून त्याला पकडलं. माझ्या मुलीच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते आणि बाथरूमच्या फरशीवरही रक्त सांडलं होतं. आम्ही ताबडतोब आरोपीच्या भावाला आणि वडिलांना बोलवलं आणि दाखवलं की पाहा तुमच्या मुलाने काय केलं आहे."
पीडित मुलीच्या वडिलांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलं. "आम्ही आरोपीला लहानपणापासून ओळखतो. तो आमच्या शेजारी राहातो. तो आमच्या मुलीला अनेकदा फिरायला घेऊन जायचा. पण तो असं काही करेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं."
पोलिसांच्या तपासावर मुलीच्या वडिलांनी समाधान व्यक्त केलं आणि म्हणाले की पोलीस सहकार्य करत आहेत. आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे.
मात्र आरोपीचे वडिलांनी त्यांच्या मुलावर लावलेले आरोप खोडून काढले आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, "हे आरोप 100 टक्के निराधार आहेत. हे प्रकरण खरंतर जमिनीच्या वादाचं आहे. मी आमचं घर त्यांना (मुलीच्या कुटुंबाला) विकलं होतं. मुलीच्या कुटुंबांचा जबाब पूर्णपणे चुकीचा आहे."
आरोपीच्या वडिलांचा दावा आहे की त्यांच्या मुलाला घटनास्थळावरून नाही तर त्याच्या घरात येऊन पकडलं. त्यांनी म्हटलं की त्यांचा मुलगा दोषी असेल तर त्याला शिक्षा मिळाली पाहिजे.
बांदीपुराचे पोलीस अधीक्षक राहुल मलिक यांनी सांगितलं की, आरोपीला अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास सुरु आहे. "या प्रकरणाच्या तपासासाठी आम्ही स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम (SIT) तयार केली आहे आणि त्यांनी काही साक्षी-पुरावे नोंदवले आहेत. या प्रकरणी पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे."
आरोपीचं वय विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं की, "याची तपासणी सुरू आहे. आरोपीने शाळा सोडली आहे आणि तीन शाळा आजवर बदलल्या आहेत."
तर स्थानिक लोकांचा आरोप आहे की आरोपीच्या शाळेच्या मुख्याध्यपकांनी त्याचा खोटा जन्माचा दाखला बनवला आहे आणि त्याचं वय कमी दाखवलं आहे.
एक स्थानिक व्यक्ती मोहम्मद अस्लम यांनी सांगितलं की हे खोटं प्रमाणपत्र काही तासातच बनवलं गेलं ज्यात आरोपीचं वय 10 वर्षं असं सांगितलं आहे. अस्लम यांचं म्हणणं आहे की आरोपीच्या जन्माचा दाखला खोटा आहे, असं पोलिसांनाही वाटतं.
पोलीस अधीक्षक मलिक म्हणतात, "आम्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनाही ताब्यात घेतलं आहे. चौकशी सुरु आहे. आम्ही तपास करत आहोत की कोणत्या परिस्थितीत त्यांनी असं केल. हे खोटं प्रमाणपत्र कोणी दिलं आणि का?"
इंदरपुरा सुंबलमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला एकत्र आल्या आणि त्यांनी आंदोलन करत आरोपीला कडक शिक्षा देण्याची मागणी केली.
एक आंदोलक अमीनाने सांगितलं की, "आम्ही एका निर्दोष चिमुकलीला न्याय देण्यासाठी एकत्र आलो आहोत. ती तर आपल्या यातना इतरांना सांगू शकत नाही. जरा विचार करा, इतका घृणास्पद गुन्हा घडत असताना त्या मुलीच्या मनावर काय परिणाम झाला असेल. आम्हाला आता सुरक्षित वाटत नाही. जर तीन वर्षांच्या मुलीसोबत असं घृणास्पद कृत्य घडू शकतं तर इतर कोणाच्याही बाबतीत असं घडू शकतं. आमची मागणी आहे की आरोपीला फाशी व्हावी.
फुटीरतावादी नेते आणि हुर्रियत कॉन्फरन्सचे चेअरमन सय्यद अली गिलानी यांनी या घटनेला 'आमच्या सामाजिक सौहार्दावर असलेला काळा डाग' असं म्हटलं आहे. त्यांनी आरोपीला शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे.
सुप्रीम कोर्टाने कठुआ केस पठाणकोटमध्ये हलवली
दोन महिन्यांपूर्वी बांदीपुरमध्येच बलात्काराची अशी घटना घडली होती ज्याने समाज हादरून गेला होता. एका पित्यावरच आपल्या मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. पुढे या मुलीने आत्महत्या केली.
2018 साली जम्मूच्या कठुआ भागात बकरवाल समुदायाच्या आठ वर्षांच्या एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता आणि तिची हत्याही झाली होती.
या घटनेच्या विरोधात जम्मू-काश्मीरमध्ये तीव्र आंदोलन झालं होते. या प्रकरणात आठ लोकांना अटक झाली होती. ती केस आता सुप्रीम कोर्टाने पठाणकोट कोर्टात हलवली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)