राजीव गांधींनी युद्धनौकेचा वापर सहलीसाठी केला: नरेंद्र मोदी #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. गांधी कुटुंबियांनी सहलीसाठी INS विराट नेली - मोदी

राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना INS विराट या युद्धनौकेचा वापर कुटुंबियांना सुटीत सहलीला नेण्यासाठी केला. त्यातून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथं केला आहे.

दिल्लीत झालेल्या सभेत मोदी यांनी हे गंभीर आरोप केल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रानं दिलं आहे. INS विराट ही युद्धनौका सागरी सुरक्षेवर तैनात असताना तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी लक्षद्वीप इथं सहलीसाठी त्याचा वापर केला. तसंच तिथं कुटुंबीय आणि मित्रांना आरामात राहता यावं म्हणून नौदलाच्या कर्मचाऱ्यांना सेवेसाठी जुंपलं. सहलीवर आलेल्यांसाठी सरकारी हेलिकॉप्टरची व्यवस्था करण्यात आली होती.

राजीव गांधी यांनी सासरकडील नातेवाईकांना सहलीला नेले होते. परकीय नागरिकांना INS विराटवर प्रवेश देऊन राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करण्याचा हा प्रकार नव्हता काय, असा सवाल पंतप्रधानांनी केला.

दरम्यान कुरूक्षेत्रं इथं झालेल्या सभेत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसतर्फे त्यांच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विशेषणांचा उल्लेख करत त्याला काँग्रेसची 'डिक्शनरी ऑफ लव' असं म्हटलं.

2. राज ठाकरेंविषयी नारायण राणेंचा गौप्यस्फोट

ज्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली, त्यावेळी त्यांनी आपण एकत्र येऊन नवीन पक्ष स्थापन करू, असं निमंत्रण आपल्याला दिलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट नारायण राणे यांनी आत्मचरित्रात केला आहे.

लोकसत्तानं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे की, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी 'नो होल्डस बँरेड' या आपल्या आत्मचरित्रातून आपल्या राजकीय प्रवासाचा लेखाजोखा मांडला आहे. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले आहेत.

शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाला कंटाळून राज ठाकरे यांनी 2006 साली शिवसेना सोडली त्यावेळी आपल्याला एकत्र येण्याविषयी सांगितलं होतं. पण मी नकार दिल्याचं राणे यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंनी शिवसेना सोडण्याआधी त्यांच्यासोबत 38 आमदार होते. पण पक्ष सोडताना फक्त 13 आमदारच त्यांच्यासोबत आले असंही या आत्मचरित्रात म्हटलं आहे.

3. प्रज्ञा ठाकूर यांच्याशी संबंधितांनी दिलं बाँब बनवण्याचं प्रशिक्षण

अभिनव भारतच्या फरार सदस्यांनी 2011 ते 2016 या काळात देशभरात बाँब बनवण्याचं प्रशिक्षण दिल्याची माहिती स्पेशल इनवेस्टिगेशन टीमने (SIT) बंगळुरू कोर्टात दिली.

एकूण चार जणांनी हे प्रक्षिशण दिलं होतं. चारही सदस्य समझौता एक्सप्रेस, मक्का मशीद स्फोट, अजमेर दर्गा आणि मालेगाव बाँबस्फोट प्रकरणाशी निगडित असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे. भाजपच्या भोपाळ मतदारसंघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा ठाकूर या मालेगाव बाँबस्फोटात आरोपी आहेत. त्यांच्यासह एकूण 13 जण या प्रकरणात आरोपी आहेत. चार आरोपींपैकी रामजी कालसंगरा आणि संदीप डांगे हे दोघे जण मालेगाव बाँबस्फोटात आरोपी आहेत. हे दोघेही फरार आहेत.

डांगे आणि कालसंगरा यांच्याबरोबरच अमित हकला उर्फ आशिष चौहान यांनी हे प्रशिक्षण दिल्याचं SIT ने सांगितलं.

ज्या पथकाने ही माहिती कोर्टाला दिली आहे तेच पथक पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास करत आहे.

4.वंचित बहूजन आघाडी स्वतंत्र लढणार - आंबेडकर

लोकसभा निवडणुकीत 48 जागांवर स्वतंत्र लढणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने विधानसभेतही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

सोलापूर इथं झालेल्या सभेत त्यांनी हे वक्तव्य केल्याचं एबीपी माझाच्या वृत्तात म्हटलं आहे.

विधानसभा निवडणुकीत कोणासोबतही जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. पंतप्रधान पदासाठी शरद पवार यांना आपला पाठिंबा नसल्याची भूमिका त्यांनी जाहीर केली. त्याचवेळी राहुल गांधी यांच्यापेक्षा मायावती यांना पंतप्रधानपदासाठी आपण पाठिंबा देऊ असं ते म्हणाले.

5. भाजपविरोधी पक्षांची ऐक्यासाठी चर्चा सुरू

लोकसभेच्या 272 जागा भाजपला मिळणार नाहीत अशी शक्यता गृहीत धरून विरोधी पक्षांनी ऐक्यासाठी चर्चा सुरू केल्याची बातमी लोकमतने दिली आहे.

तेलगू देसमचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली.

त्यानंतर लगेचच ते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीसाठी कोलकात्याला रवाना झाले.

राहुल गांधी आणि नायडू यांच्यात काय चर्चा झाली हे समजू शकलं नसल्याचं या वृत्तात म्हटलं आहे. काँग्रेसने सत्ता स्थापनेसाठी पुढाकार घ्यावा असा त्यांचा प्रयत्न आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)