IPL 2019 - MI vs KKR: मुंबई इंडियन्सकडून कोलकाता नाईट राईडर्स पराभूत, प्लेऑफ्सचं स्वप्न भंगलं

रविवारी वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यावर सगळ्यांची नजर होती, कारण कोलकाताने मुंबईचा पराभव केला असता तर त्यांना प्लेऑफ म्हणजे अंतिम चार मध्ये जाण्याची संधी होती. मात्र असं घडलं नाही.

कोलकाताचा नऊ विकेटने पराभव झाला आणि या पराभवामुळे सनरायजर्स हैदराबादसाठी प्लेऑफ्सचं दार उघडलं. पराभवानंतरही कोलकाताच्या 14 सामन्यात सहा विजयांसह 12 गुण तर होते, मात्र नेट रनरेटमध्ये ते हैदराबादपेक्षा कमी पडले.

आता होणाऱ्या प्लेऑफ्सच्या पहिल्या क्वालिफायरमध्ये मंगळवारी चेन्नईचा सामना मुंबईशी होईल तर बुधवारी दिल्लीचा सामना हैदराबादशी होईल.

पंजाबने केला चेन्नईचा पराभव

रविवारी झालेल्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्सने पहिले फलंदाजी केली. फॉफ डू प्लेसीच्या 96 आणि सुरेश रैनाच्या 53 धावांच्या जोरावर चेन्नईने 20 षटकात 170 धावा केल्या.

किंग्स इलेव्हन पंजाबने विजयासाठी 171 धावांचं लक्ष्य 18 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. सलामीचा फलंदाज के.एल. राहुलने 36 चेंडूत सात चौकार आणि पाच छटकारांच्या मदतीने 71 धावा केल्या. तर निकोलस पुरनने 36 आणि ख्रिस गेलने 28 धावा केल्या.

हरभजन सिंहने 57 धावात तीन गडी बाद केले.

पण या विजयानंतरही पंजाबचा संघ प्लेऑफमध्ये स्थान पटकावू शकला नाही.

'करो या मरो'

कोलकातासाठी रविवारचा सामना 'करो या मरो' अशी परिस्थिती होती. नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी केल्याचाही त्यांना फायदा झाला नाही.

कोलकाताचे फलंदाज सातत्याने मुंबईच्या गोलंदाजाच्या दबावाखाली होते आणि निर्धारित 20 षटकात फक्त 133 धावाच करू शकले. सलामीचा फलंदाज क्रिस लिनने 29 चेंडूत दोन चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने 47 धावा केल्या.

दुसऱ्या बाजूला रॉबिन उथप्पाने 47 चेंडूत अवघ्या 40 धावा केल्या. त्यांच्या या संथ खेळीमुळे कोलकाताचा प्लेऑफचा मार्ग हळूहळू बंद होत गेला.

क्रिस लिन आणि रॉबिन उथप्पाशिवाय नीतीश राणाने केवळ 13 चेंडूत 26 धावा केल्या. यांच्याशिवाय कोलकाताचा एकही फलंदाज मुंबईच्या गोलंदाजीपुढे टिकला नाही. त्यांनी अगदी दहाचा आकडाही पूर्ण केला नाही.

मुंबईकडून लसिथ मलिंगाने 35 धावात तीन, बुमराहने 31 धावात दोन आणि हार्दिक पांड्याने 20 धावा देऊन दोन गडी बाद केले.

मुंबईसमोर विजयासाठी 134 धावांचं लक्ष्य होतं. सलामीचा फलंदाज रोहित शर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या भरवशावर मुंबईने 16.1 षटकांत त्यांनी निर्धारित लक्ष्य पूर्ण केलं. रोहित शर्माने 48 चेंडूत आठ चौकारांच्या मदतीने 55 धावा केल्या.

त्याचा साथीदार क्विंटन डी कॉकने 23 चेंडूत एक चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 30 धावा केल्या आणि कोलकाताच्या गोलंदाजीची लय बिघडवली.

बाकीचं काम सूर्यकुमार यादवने केवळ 27 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद 46 धावा करत पूर्ण केलं.

मुंबईच्या हार्दिक पंड्याला मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार मिळाला.

प्लेऑफ्ची गुणतालिका

IPL मध्ये झालेल्या 56 सामन्यात मुंबई इंडियन्स गुण तालिकेत 14 सामन्यात 9 विजय आणि 18 गुणासह पहिल्या स्थानावर आहे.

चेन्नई सुपर किंग्सने 14 सामन्यात 9 विजय आणि 18 गुण प्राप्त करूनही सरासरी कमी असल्यामुळे दुसऱ्या स्थानावर आहे.

सात वर्षांनंतर प्लेऑफ्समध्ये पोहोचलेल्या दिल्ली कॅपिटल्सने 14 सामन्यात 9 विजयासह 18 गुण प्राप्त केले. मात्र त्यांची सरासरी मुंबई आणि चेन्नईपेक्षा कमी आहे. त्यांनी या तालिकेत तिसरं स्थान पटकावलं आहे.

तर हैदराबाद 14 मॅचेसमध्ये सहा विजय मिळवून 12 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)