You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गडचिरोली: नक्षलवादी हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी पोलीस सज्ज - पोलीस महासंचालक
गडचिरोलीमध्ये जांभूरखेडा या ठिकाणी नक्षलवाद्यांनी C-60 दलाच्या जवानांवर हल्ला केला. या हल्लात 15 जवानांचा मृत्यू झाला आहे. C-60 दलाच्या जवानांबरोबरच एक नागरिक ठार झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
गडचिरोली हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देणार
या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी दिला आहे. सध्या त्या भागात पोलिसांची पथकं पोहोचली असून यापुढे काही अनुचित प्रकार घडू नये याबाबत दक्षता घेतली जाईल असं जयस्वाल यांनी सांगितलं आहे.
हल्ल्याची माहिती गुप्तहेर यंत्रणांना मिळाली नसल्यामुळे हा हल्ला झाला, हा आरोप जयस्वाल यांनी फेटाळला आहे. "हा भ्याड हल्ला होता. भविष्यात असे हल्ले होणार नाहीत याची पूर्णपणे काळजी घेतली जाईल," असं जयस्वाल यांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्या बद्दल शोक व्यक्त केला आहे. गडचिरोली येथे झालेला हल्ला हा संतापजनक आहे. हा भ्याड हल्ला आहे असं देखील मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शहीदांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
C-60 या दलाचे 16 जवान या हल्ल्यात मृत्युमुखी पडले आहेत असं फडणवीस यांनी म्हटलं. या हल्ल्याचा निषेध करताना फडणवीस म्हणाले की अशा प्रकारचे हल्ले सहन केले जाणार नाहीत. या हल्ल्यांचा अधिक तीव्रतेने प्रतिकार केला जाईल असं फडणवीस म्हणाले.
या आधी, नक्षलवाद्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर गावाजवळ महामार्गाच्या कामावरील तब्बल २७ ते ३० वाहनांसह मिक्सर प्लांटला आग लावून दिल्याचीही घटना घडली आहे. 30 एप्रिलला मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या हल्ल्याचा निषेध केला. या हल्ल्यात मृत्युमुखी झालेल्या जवानांचं बलिदान कधीही विसरलं जाणार नाही असं ते म्हणाले.
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित करण्यात येणारं चहापान रद्द
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. तो रद्द करण्यात आला आहे. गडचिरोली येथे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
सी-60 पथक म्हणजे काय?
नक्षलवाद्यांच्या गनिमी काव्यामुळे मेटाकुटीला आलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी गडचिरोलीत 1992मध्ये विशेष कृती दलाची स्थापना केली. या दलासाठी स्थानिक आदिवासींना भरती करण्याचं धोरण स्वीकारण्यात आलं.
त्यावेळी, 60 जणांच्या पथकाला मान्यता देण्यात आली होती. त्याचं C-60 असं नामकरण झालं. पुढे त्यात भर पडत गेली आणि नक्षलवाद्यांचा बिमोड करणारं महत्त्वाचं दल अशी त्याची ओळख तयार झाली.
सध्या या पथकात हजार जवान आहेत. त्यांना गनिमी युद्धनितीचं प्रशिक्षण देण्यात येतं, प्रगत शस्त्र पुरवली जातात. तसंच त्यांना बढती आणि बक्षिसं देखील दिली जातात.
C-60 या पथकातले जवानही मारले गेले आहेत. पण या पथकात आदिवासींचा समावेश करण्यात आला आहे. त्यांना स्थानिक भाषा, लोकसंस्कृती आणि भूभागाची योग्य माहिती असते. परिणामी गनिमी युद्धतंत्रात त्या महत्त्वाच्या ठरतात.
या पथकामुळे आपल्या अस्तित्वावर घाला येण्याची शक्यता नक्षलवाद्यांना वाटते. त्यामुळेच 1990च्या उत्तरार्धात आणि 2000च्या पूर्वार्धात नक्षलींनी C-60मध्ये भरती होऊ पाहणाऱ्या उमेदवारांना परावृत्त करण्यासाठीच त्यांच्यातल्या काही उमेदवारांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना मारलं होतं.
गेल्या दोन दशकात C-60 या पथकाला माओवाद्यांना चाप बसवण्यात यश आलं आहे.
या पथकाबद्दल अधिक माहिती हवी असल्यास बीबीसी मराठीने याआधी प्रसिद्ध केलेली ही बातमी वाचावी.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)