लोकसभा निवडणुकीच्या काळात मावळ मतदारसंघातलं हरवलेलं एलिफंटा

एलिफंटा

फोटो स्रोत, BBC/PrajaktaPol

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

लोकसभा निवडणुकीचं चौथ्या टप्प्यातलं मतदान अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलंय. राज्यभरात विकासाचे हिशोब मांडले जातायेत. मुंबईपासून १० किलोमीटरचा बोटीने प्रवास करून आम्ही एलिफंटा बेटावर पोहचलो.

मुंबई आणि उरण याच्यामध्ये असलेल्या एलिफंटा बेटावर वर्षभरात लाखो पर्यटक येतात. त्यातले बहुतांश हे परदेशी असतात. सगळीकडे सुरू असलेला प्रचार, मतदानाची धामधुम हे वातावरण इथे कुठेच दिसत नाही.

"इथे अमेरिकेवरून चारवेळा लोक येतील, पण आमचे आमदार, खासदार पाच वर्षांत फिरकत नाहीत," एलिफंटा बेटावरच्या राजबंदर गावात राहणाऱ्या यशवंत म्हात्रेंचे हे शब्द. गेल्या ६७ वर्षांत मूलभूत गरजा पुरवणारा विकासही त्यांनी पाहीला नाही.

यशवंत म्हात्रे इकडे ५० वर्षांपासून कॅन्टीन चालवतात. त्यांना निवडणुकांबाबत विचारल्यावर ते पुढे सांगतात "देशाला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षं झाली. पण आमच्याकडे गेल्यावर्षी लाईट आली. इतकी वर्षं आम्ही अंधारातच काढली. पिण्याचं पाणी नाही, शौचालय, शाळा, दवाखाना तर दूरच."

पण हा संघर्ष एकट्या यशवंत म्हात्रेंचा नाही. तो इथे राहणाऱ्या जवळपास १२०० मतदारांचा आहे.

मूलभूत गरजांचा संघर्ष

एलिफंटा हे मावळ मतदारसंघात येत. इकडे तीन गावं आहेत. शेतबंदर, मोराबंदर आणि राजबंदर.

त्यातल्या शेतबंदर गावात गेल्यावर आम्हाला राधाबाई भोईर भेटल्या. राधाबाईंचा मुलगा गाईडचं काम करतो.

राधाबाई त्यांचा एक मुलगा आणि सून असा त्यांचा परिवार शेतबंदर गावात राहतो. त्यांची दोन मुलं ही उरणला राहायला गेलीयेत. याचं कारण राधाबाई सांगतात, गावात जिल्हापरिषदेची शाळा आहे. पण त्यात १-२ च मुलं आहेत त्यामुळे ती बंद पडायला आली आहे.

एलिफंटा

फोटो स्रोत, BBC/PrajaktaPol

"दवाखाना नाही. गावातले लोक आजारी पडले तर त्यांना बोटीने उरणला किंवा मुंबईला न्यावं लागतं."

राधाबाईंच्या एका सुनेचं बाळंतपण हे बोटीतच झालं. पण फक्त राधाबाईंच्या सुनेचच नाही तर गावातल्या अनेक महिलांची बाळंतपणं दवाखान्यात नेताना बोटीतच झाली आहेत. रात्रीच्यावेळी कोणी खूप आजारी पडलं तर त्यांना दवाखान्यात नेण्याचीही सुविधा नसल्याचं त्या सांगतात.

अशा परिस्थितीत खासगी बोट असलेल्या गावातल्या सावकारांकडे मदत मागावी लागते. चारही बाजूने समुद्र असलेल्या या गावात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई आहे.

एलिफंटाच्या लेण्यांपासून पुढे राजबंदर गावं आहे. या गावांत दोन विहिरी आहेत. याच विहीरीच्या पाण्यावर तीनही गावं जगतायेत.

शेतबंदरपासून दररोज १२० पायर्‍या चढून गावातल्या महिलांना पिण्याचं पाणी भरावं लागतं.

शौचालयाबाबत जेव्हा इथल्या महिलांना विचारसं तेव्हा गावातल्या महिला पुढे काही बोलल्याच नाहीत.

सरकारला आमच्या जीवाची किंमत नाही का?

मुंबईमध्ये राहणार्‍या असंख्य लोकांचं समुद्राजवळ घर असण्याचं स्वप्न असतं. शेतबंदर गावातल्याच सोमेश्वर भोईर यांचं घर अगदी समुद्राच्या बाजूला आहे. पण त्यांना त्याचं अजिबात अप्रुप नाही. याउलट त्यांच घर आणि गाव कधीही समुद्रात वाहून जाईल ही भिती त्यांच्या मनात आहे.

एलिफंटा

फोटो स्रोत, BBC/PrajaktaPol

"जेएनपीटीकडून खासगी प्रकल्पांसाठी समुद्रात भराव टाकला जातो. पण आमच्या घरांच्या सुरक्षिततेसाठी बंदार का बांधत नाही. पावसाळ्यात पाणी घरापर्यंत असतं. सापांच साम्राज्य असतं. गावातल्या अनेकांचा मृत्यू साप चावून झालाय. सरकारला आमच्या जीवाची किंमत नाही का," असा प्रश्न ते विचारतात.

मावळ मतदारसंघात जवळपास ५ लाख १५ हजार मतदार आहेत. त्यापैकी २.५ लाख मतदार पनवेलमध्ये आहेत. सर्वांत जास्त मतदार असलेला हा राज्यातला दुसरा मतदारसंघ आहे.

पण त्यापैकी फक्त १२०० ची लोकसंख्या ही एलिफंटा बेटावरच्या गावांमध्ये आहे. यामध्ये साधारण ७५० ते ८०० रहिवाशांची मतदार यादीत नोंदणी आहे. ८०० मतदारांसाठी इकडे विकासाची मेहनत कोण घेणार असा सवाल इकडचे गावकरी उपस्थित करतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)