IPL : शिखर धवन आणि ऋषभ पंत यांचा वर्ल्ड कप संघ निवडीपूर्वी धमाका

फोटो स्रोत, Getty Images
सध्या सुरू असलेल्या IPLमध्ये गुरुवारी राजस्थान आणि चेन्नई यांच्यात झालेल्या धमाकेदार सामन्यानंतर शुक्रवारी दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेला सामना शांततेत पार पडला.
या सामन्यात दिल्लीने कोलकाताचा त्यांच्याच ऐतिहासिक ईडन गार्डन स्टेडिअममध्ये पराभव केला.
दिल्लीसमोर विजयासाठी 179 धावांचं आव्हान होतं. सलामीचा फलंदाज शिखर धवनच्या नाबाद 97 धावा आणि ऋषभ पंतच्या 46 धावांच्या मदतीने 18.5 षटकांत तीन विकेट गमावून दिल्लीने हे आव्हान यशस्वीपणे पेललं.
त्या आधी नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाताने 20 षटकांत 178 धावा केल्या. त्यात शुभनन गिलने 65 आणि आंद्रे रसेलने 45 धावा केल्या.
दिल्लीचा विजय सोपा वाटत असला तरी तो नव्हता.
शिखर धवन आणि ऋषभ पंत यांना योग्य वेळी सूर गवसला आणि त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 105 धावांची भागीदारी केली आणि सामन्याचं रूपच पालटलं.

फोटो स्रोत, Getty Images
ऋषभ पंतने 31 चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांच्या सहाय्याने 46 धावा केल्या. ऋषभ पंत ने अतिशय समजूतदारीने खेळी केली.
दिसेल तो चेंडू टोलावण्याची सवय मोडून त्याने योग्य शॉटसाठी योग्य चेंडूचा आधार घेतला. शिखर धवन आणि ऋषभ पंतमध्ये झालेल्या भागीदारी पंतच्या षटकाराने पूर्ण झाली.
ऋषभ पंतने 17 व्या षटकात आंद्रे रसेलच्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर षटकार लगावला. त्या दोघांनी 67 चेंडूत 102 धावांची भागीदारी केली.
आणखी तीन धावांची भर पडताच पंत माघारी परतला. 46 धावांवर नितीश राणाने त्याला बाद केलं. मात्र सामन्याचा खरा नायक ठरला तो शिखर धवन.
धवनची या आयपीएल मधली कामगिरी फारशी उल्लेखनीय नव्हती. बंगळुरूविरुद्ध झालेल्या मागच्या सामन्यात तर त्याला खातंही उघडता आलं नाही.
मात्र त्याचा वचपा धवनने कोलकाताविरुद्धच्या सामन्यात काढला. तो 97 धावांवर नाबाद राहिला.
दिल्लीच्या कोलिन इलग्रामने त्याला स्ट्राईक देण्याच्या ऐवजी स्वत:च पियुष चावलाच्या एका चेंडूवर षटकार लगावत सामना संपवला.
धवनचं शतक झालं असतं तर या मालिकेतलं त्याचं हे पहिलं शतक ठरलं असतं. शतकापेक्षा संघाचा विजय महत्त्वाचा आहे असं तो म्हणाला.

फोटो स्रोत, Getty Images
पंत हा एक खूप मोठा हिटर आहे आणि त्याच्यासोबत वेगवान खेळी करायला मदत झाली असंही तो म्हणाला.
शिखर धवनला सूर गवसला तर त्याला थांबवणं अशक्य असतं.
97 धावांच्या खेळीत धवनने अपर कट, कव्हर ड्राईव्ह, कट, स्वीप, आणि हुक या प्रकाराचं उत्तम प्रदर्शन केलं. या संपूर्ण खेळीदरम्यान त्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत होता.
त्याच्या शॉट्सचं टायमिंग आणि फुटवर्क उल्लेखनीय होतं. शिखर धवनने परदेशी खेळाडू विशेषत: वेस्ट इंडिजच्या खेळाडूंमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.
धवनने पहिल्या सामन्यात मुंबईविरुद्ध 49 आणि दुसऱ्या सामन्यात चेन्नईविरुद्ध 51 धावांची खेळी केली.

फोटो स्रोत, Hw Evans Picture Agency
त्यानंतर कोलकाताविरुद्ध झालेल्या सामन्यात त्यांनी आपल्या घरच्या मैदानात म्हणजे दिल्लीत फक्त 16 धावा केल्या. त्यानंतर पंजाब विरुद्धच्या सामन्यात शिखरने फक्त 30 धावा केल्या.
हैदराबादविरुद्ध 12 आणि गेल्या सामन्यात बंगळुरू विरुद्ध खातंही न उघडता आल्यामुळे शिखरच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.
15 तारखेला विश्वचषकासाठीच्या टीमची घोषणा होणार आहे. त्यातच शिखर धवन आणि ऋषभ पंत यांना सूर गवसणं भारतासाठी सुचिन्ह आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








