लोकसभा 2019: काँग्रेस जाहीरनामा - बेरोजगारी, कृषी संकट, महिला सुरक्षेला प्राधान्य - राहुल गांधी

बेरोजगारी, कृषी संकट आणि महिलांची सुरक्षा, हे तीन प्रमुख मुद्दे असलेला जाहीरनामा काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकांसाठी प्रसिद्ध केला.

11 एप्रिलपासून सात टप्प्यांमध्ये या निवडणुकांसाठी मतदान होणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आता केवळ नऊ दिवस शिल्लक आहेत.

"पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेसने मंगळवारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. Wealth should marry welfare म्हणजेच जनकल्याण आणि समृद्धी यांची कशी सांगड घालू शकतो, हे या जाहीरनाम्याचं लक्ष्य आहे," असं काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष पी. चिदंबरम म्हणाले.

तरुण, महिला, शेतकरी, छोट्या उद्योजकांना प्राधान्य असेल, असंही चिदंबरम यावेळी म्हणाले.

यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अनेक काँग्रेस नेते उपस्थित होते.

पाहा जाहीरनामा सभा इथे LIVE

पाहू या राहुल गांधी यांच्या जाहीरनाम्याच्या भाषणातील प्रमुख मुद्दे -

गेली पाच वर्षं आपण खोटं बोलणं ऐकतोय. म्हणूनच आमच्या जाहीरनाम्यात कोणतीही खोटी घोषणा नाही, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितलं.

"आमचं चिन्ह पंजा आहे. जशी पंजाची पाच बोटं असतात, तशी आमच्या जाहीरनाम्यात पाच सूत्रं आहेत," असं म्हणत त्यांनी जाहीरनाम्यातील पाच प्रमुख मुद्दे सांगितले.

1. न्याय (NYAY)

लोकांच्या खात्यात 15 लाख रुपये असतील असं पाच वर्षांपूर्वी सांगण्यात आलं होतं. आम्ही अशी मोठी पण पोकळ आश्वासनं देणार नाही. आम्ही विचार केला की जनतेच्या खात्यात सरकार खरंच किती रक्कम देऊ शकते. जाहीरनामा समितीने 72,000 रुपये हा आकडा समोर ठेवला.

20 टक्के अतिगरीब जनतेला वर्षाला 72,000 रुपये आणि पाच वर्षात 3 लाख 60 हजार देण्यात येतील. नरेंद्र मोदी सरकारने नोटाबंदी करून अर्थव्यवस्थेची कोंडी केली आहे. ती सोडवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

2. रोजगार आणि शेतकरी

युवा वर्गाला रोजगार नाही. सरकारी नोकऱ्यांमध्ये 22 लाख जागा रिक्त आहेत. आम्ही दहा लाख युवांना ग्रामपंचायतीत रोजगार देऊ. उद्योजकांना तीन वर्षांसाठी उद्योग सुरू करण्यासाठी कोणतीही परवानगी लागणार नाही. मनरेगा बोगस योजना आहे ,असं पंतप्रधान म्हणाले होते. पण मनरेगा 150 कामाचे दिवस पक्के असतील.

शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प असावा. शेतकऱ्याला माहिती असायला हवं की त्याला किती पैसे मिळणार, हमीभाव किती मिळणार याची माहिती त्याला मिळायला हवी.

कोट्याधीश मंडळी बँकेतून कर्ज घेतात. अनिल अंबानी, मेहुल चोक्सी, नीरव मोदी कर्ज घेऊन पळ काढतात. शेतकरी इमानदार असतो. शेतकऱ्याने कर्ज चुकवलं नाही तर त्याला तुरुंगवास भोगावा लागतो. शेतकऱ्याला कर्ज चुकवता आलं नाही तर तो फौजदारी गुन्हा राहणार नाही, दिवाणी गुन्हा असेल.

3. शिक्षण आणि आरोग्य

GDPचा 6 टक्के भाग शिक्षण क्षेत्रावर खर्च करण्यात येईल. आम्ही सरकारी रुग्णालयं सक्षम करणार. गरिबातल्या गरीब व्यक्तीला सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था मिळायला हवी.

4. राष्ट्रीय सुरक्षा

भाजप सरकारने द्वेषाचं राजकारण केलं. आम्ही देशाला जोडू. देशातली एकजूटता वाढावी यासाठी आमचे प्रयत्न असतील.

नमो टीव्हीविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

निवडणूक प्रचारकाळात प्रपोगंडा पसरवण्याच्या दृष्टीने भाजपने नमो टीव्ही लाँच केला आहे, अशी तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.

''पंतप्रधानांच्या पर्सनल टीव्ही चॅनेल काँटेट काही दिवसांपूर्वीच डीटीएच प्लॅटफॉर्म्सवर लाँच केलं. या चॅनेलवर भाजप पक्षाच्या जाहिराती तसंच निवडणूक रॅलीचं प्रक्षेपणही केलं जात आहे. याविरोधात तातडीने कारवाई व्हायला हवी'', असं काँग्रेसने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे.

सरकारी टीव्हीचाही चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे असं काँग्रेसनं म्हटलं आहे. नमो टीव्हीविरुद्ध आम आदमी पक्षानेही निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)