You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभा 2019 : काय आहे महाराष्ट्राच्या मनात? #BBCRiverStories
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या लोकांना कोणते प्रश्न महत्त्वाचे वाटतात, हे #BBCRiverStories या सीरिजमधून बीबीसी मराठी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
यूट्यूबर निकिता गिरीधर नार्वेकर यांच्यासोबत बीबीसी मराठीची टीम नाशिकली पोहोचली आणि गोदावरी नदीच्या तिरावर नाशिकरांना त्यांच्या प्रश्नांबदद्ल विचारलं.
नदी म्हटलं की डोळ्यासमोर येतं, एक पाण्याचा मोकळा प्रवाह. मोकळा आणि मुक्त वाहणारा. आणि जशी नदी वाहती असते तसे आपले विचारही वाहते असायला हवेत, असं म्हटलं जातं.
पण अशी परिस्थिती खरंच आहे का? की जसं आपण नद्यांवर बंधन घातलीत तसंच आपल्या विचारस्वातंत्र्यावर, आपल्या अभिव्यक्तीस्वांतत्र्यावर बंधन घातलीत का, हे आम्ही नाशिककरांकडून जाणून घेतलं.
याबद्दल आम्ही नाशिकमधल्या कॉलेज रोडवरील सलीम टी स्टॉलवर जमलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
विचारस्वातंत्र्य म्हणजे काय, यावर हे विद्यार्थी सांगतात, "अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे आपली मतं आपल्याला ज्या माध्यमातून (भाषण, लेखन) मांडायची आहेत, त्या माध्यमातून ती मांडणं. पण आता यावर दबाव आणला जात आहे."
"सरकारच्या विरोधात आता मतं मांडता येत नाहीत. मागे आम्ही पेट्रोलच्या प्रश्नावर सोशल मीडियावर मोहीम सुरू केली तेव्हा आमचे अकाऊंट बंद करण्यात आले, आम्हाला नोटिसा आल्या. हे कुठंतरी थांबलं पाहिजे," असं काहींचं म्हणणं होतं.
तर एका मुलीच्या मते, मासिक पाळीबद्दल फेसबुकवर पोस्ट लिहिली तर काही लोक कमेंट करून म्हणे की हे असं लिहिणं चुकीचं आहे.
पॉर्न बंदीबद्दल तरुणांचं म्हणणं आहे, "प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे आणि कुणी काय बघायचं यात हस्तक्षेप करायला नको. तर काहींच्या मते, पॉर्नवर बंदी हे अभिनंदनीय पाऊल आहे, कारण पॉर्न पाहिल्यानं विचारांवर त्याचा परिणाम होतो आणि माणूस तसाच विचार करायला लागतो."
आम्ही कुस्तीच्या आखाड्यातही गेलो. येथील हिरामण वाघ सांगतात, "विचारस्वातंत्र्य म्हणजे कुणाला काही करायचं असेल तर ते करता आलं पाहिजे. पण आजकाल थोडासा दबाव येतो. पहिलवानाला काही करायचं असेल तर संघटनेचा दबाव होतो."
दिनकर मनवर यांच्या पाणी कसं असतं या कवितेनिमित्तानं मध्यंतरी बराच वाद झाला होता. याविषयी कुसुमाग्रज स्मारक येथील विचारवंत सांगतात, "शब्द कुठलेही असोत आणि कसेही असोत त्यांना अभिव्यक्त व्हायचं स्वातंत्र्य आहे. आणि ते वाचायचं वाचकांनाही स्वातंत्र्य आहे."
तर नाशिकमधील सक्रीय कार्यकर्ते समीर देव यांच्या मते, "खरंतर या 4 ते 5 वर्षांमध्ये स्वातंत्र्याला उधाण आलं आहे. या देशात देशविरोधी घोषणा सहजपणे दिल्या जातात, हे आपल्याला बघायला मिळत आहे. आजपर्यंत पंतप्रधानांवर अत्यंत वाईट शब्दांत कधीही टीका होत नव्हती, ती आता गेल्या 4 वर्षांत व्हायला लागलीय. मग अभिव्यक्तीचा आवाज दाबला जातोय, या विधानाला काही अर्थ आहे का? आणखी किती स्वातंत्र्य हवंय, या देशाचे तुकडे होण्याची आपण वाट पाहणार आहोत का, मी तर म्हणतो अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटी स्पष्ट करून मर्यादा घालण्याची वेळ आली आहे."
शेतकरी नेते राजू देसले यांनाही आम्ही भेटलो. विचारस्वातंत्र्याविषयी ते सांगतात, "नाशिक ते मुंबई लाँग मार्चच्या वेळी पोलिसांनी माझा मोबाईल ताब्यात घेतल होता. तो आजही 13 महिन्यांनी परत दिलेला नाही. मोबाईल जप्त करण्याच्या माध्यमातून त्यांनी माझं अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं आहे."
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)