You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
PM Narendra Modi trailer: नरेंद्र मोदी यांच्यावरील सिनेमात जावेद अख्तर, समीर यांची नावं कशी आली?
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या "जीवनावर आधारित" 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाचा ट्रेलर दोन दिवसांपूर्वी आला. विवेक ओबेरॉय त्यात मुख्य भूमिकेत आहेत, जे मोंदींच्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळ्या रूपात दिसत आहेत.
पण ऐन निवडणुकांच्या तोंडावर आलेल्या या सिनेमामुळे वादळ तर उठणारच होतं. दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी आधीच सांगितलं होतं की हा प्रोपगंडा सिनेमा आहे की नाही, हे तुम्हीच ठरवायचं.
विरोधी पक्षांनीही या बायोपिकच्या रिलीजच्या मुहूर्ताबद्दल आक्षेप नोंदवला आहे. हा सिनेमा 5 एप्रिलला देशभरात प्रदर्शित होत आहे, तर देशभरात 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान मतदान होत आहे.
पण सध्या वाद वेगळ्याच मुद्द्यावर सुरू झाला आहे.
प्रख्यात लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांना आपलं नाव ट्रेलरमध्ये दिसलं आणि ते चक्रावून गेले. "या सिनेमाच्या पोस्टरवर आपलं नाव पाहून मला धक्काच बसला. मी त्यासाठी एकही गाणं लिहिलेलं नाही," असं त्यांनी ट्वीट केलं.
त्यांचं ट्वीट त्यांच्या पत्नी आणि अभिनेत्री शबाना आझमी यांनी रिट्वीटही केलं.
असाच धक्का गीतकार समीर यांनाही बसला आणि त्यांनीसुद्धा असाच दावा केला. "मला आश्चर्य वाटलं आपलं नाव पीएम नरेंद्र मोदी सिनेमात पाहून. मी अशा कुठल्याच सिनेमासाठी गाणं नाही लिहिलंय," असं त्यांनी ट्वीट केलं.
मिड-डे वृत्तपत्राशी बोलताना समीर म्हणाले, "जरी माझं एखादं जुनं गाणं वापरलं गेलं असेल तरी निदान त्या गाण्यांच्या मालकांना याविषयी माहिती असावी. पण याबद्दल त्यांनाही माहिती नाही. मी स्वतः ओमंग कुमार आणि संदीप सिंह (निर्माते) यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे फोन बंद होते. त्यांनी जे केलं ते चूकच आहे, ती चूक ताबडतोब दुरुस्त व्हायला हवी."
दरम्यान, 'पीएम नरेंद्र मोदी' च्या निर्मात्यांनी एक निवेदन जारी करत स्पष्टीकरण दिलं आहे. यात निर्माते आणि कथेचे लेखक संदीप सिंह यांनी सांगितलं की, "टी-सीरिज या सिनेमाचा अधिकृत म्युझिक पार्टनर आहे. आम्ही '1947: अर्थ' या सिनेमातलं 'ईश्वर अल्लाह' आणि 'दस' मधलं 'सुनो गौर से दुनियावालो...' ही दोन गाणी या सिनेमात वापरत आहोत. त्यामुळे आम्ही जावेद अख्तर आणि समीर यांना त्यासाठीचं श्रेय दिलं आहे."
1999 साली प्रदर्शित झालेला '1947: अर्थ' या सिनेमाच्या दिग्दर्शिका दीपा मेहता होत्या. आमीर खान आणि नंदिता दास यात प्रमुख भूमिकेत होते.
तर 'दस' सिनेमातलं 'सुनो गौर से दुनियावालो' हे गाणं तसं तर लोकांनी बरेचदा ऐकलं आहे, पण या सिनेमाबद्दल नाही. 1997 साली बनून तयार झालेला 'दस' हा सिनेमा कधी प्रदर्शितच झाला नाही. सलमान खान, संजय दत्त आणि रविना टंडन यात मुख्य भूमिकेत होते.
मोदींच्या बायोपिकमध्ये विवेक ओबेरॉयबरोबरच बोमन ईराणी, मनोज जोशी आणि झरीना वाहाबसारखे कलाकार आहेत. जावेद अख्तर, समीर यांच्या नावांबरोबर गीतकारांच्या यादीत प्रसून जोशी, अभेंद्र कुमार उपाध्याय आणि सरदारा, पॅरी जी आणि लवराज अशी नावं आहेत.
2019च्या सुरुवातीपासूनच एकापाठोपाठ एक राजकीय सिनेमे निवडणुकांच्या तोंडावर येत आहेत. आधी 'उरी - द सर्जिकल स्ट्राईक', 'द अॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर', 'ठाकरे' आणि आता 'पीएम नरेंद्र मोदी'.
तसंच आपल्या उजव्या विचारसरणीसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री हेही 'द ताश्कंद फाईल्स' हा सिनेमा 12 एप्रिलला रिलीज करत आहेत. लालबहादूर शास्त्री यांच्या मृत्यूचं गूढ उलगडणारा हा सिनेमा असेल, असं याचं पोस्टर सूचित करतं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)