निवडणूक 2019: छगन भुजबळ - सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या इमेजला धक्का
- Author, अभिजित करंडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पाहा संपूर्ण मुलाखत
"राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय यांना आम्ही राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांना समविचारी राष्ट्रवादीच्या चिन्हापेक्षा काँग्रेसच्या विरोधात भूमिका असलेला भाजप जवळचा वाटला," असा चिमटा राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी काढला आहे. ते बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
दरम्यान, विरोधी पक्षनेत्याचा मुलगा निवडणुकीच्या आधी अचानक भाजपमध्ये गेल्याने आघाडीच्या प्रतिमेला धक्का बसला नाही का? या प्रश्नाला त्यांनी "डॉ.सुजय हे खूप मोठे नेते नाहीत. त्यांचा भाजप प्रवेश होणं म्हणजे आघाडीचं सगळं संपलं, असं नव्हे. जर धक्का बसलाच असेल तर ते राधाकृष्ण विखे यांच्या इमेजला बसला आहे. ते आमच्या सगळ्यांचे नेते आहेत. उद्या जर सरकार बदललं तर ते मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असतील. तेव्हा डॉ. सुजय यांनी थांबायला हवं होतं," असं उत्तर दिलं.
भुजबळ यांनी वंचित बहुजन आघाडीमुळे बऱ्याच ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मतांचं विभाजन होईल हे मान्य केलं.
याबाबत उत्तर देताना भुजबळ म्हणाले, "आधी आम्ही आंबेडकरांना तीन जागांची ऑफर दिली होती. त्यात नाशिकची जागाही होती. पुढे त्यांनी ती ऑफर नाकारली आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत कसं आणणार? असा प्रश्न विचारला.

फोटो स्रोत, TWITTER
"काँग्रेस आणि राष्ट्रवादी मसुदा बनवायला तयार होते. आंबेडकरांनी ती जबाबदारी काँग्रेसला दिली. मात्र त्यादरम्यान परस्पर 12 जागांवर उमेदवार जाहीर केले. त्यात माढा, बारामतीचीही जागा होती. त्यामुळे या 12 जागा सोडून पुढं बोलणी करा, अशी त्यांनी मागणी केली. त्यामुळे वंचित आघाडीला सोबत घेणं शक्य झालं नाही."
ते पुढे म्हणाले की, आम्ही शेवटपर्यंत वंचित आघाडीला सोबत घेण्याचा प्रयत्न करू. मात्र अवास्तव मागण्यांचा अर्थ काय होतो तो तुम्ही ठरवा, असं सूचक विधानही त्यांनी केलं.

फोटो स्रोत, TWITTER/NCP
या मुलाखतीत छगन भुजबळ यांनी भाजप सरकारने आपल्यावर सूडापोटी कारवाई केल्याचा आरोपही केला. समता परिषदेच्या माध्यमातून मी देशभर मेळावे घेत होतो. त्यामुळे OBC नेतृत्व उभं राहू नये म्हणूनही माझ्यावर कारवाई केल्याचं भुजबळ म्हणाले.
दरम्यान, कधीकाळी भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या भुजबळांनी कोट्यवधीचं साम्राज्य कसं उभं केलं, या प्रश्नालाही भुजबळांनी उत्तर दिलं.
ते म्हणाले की, "मी 70 वर्षं काही घरात बसून राहिलो नव्हतो. अनेक कंपन्यांची कंत्राटं घेतली. ती कामं पूर्ण केली. टूर अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय केला. यातून दोन पैसे कमावले. शिवाय माझ्या आजीनं त्यावेळी स्वस्तात दिलेल्या स्थावर मालमत्तेची किंमत वाढली. पण जसं तुम्ही मला विचारताय, तसाच प्रश्न 'लोढा-फोडां'नाही विचारा. त्यांच्याकडे पैसे कुठून आले?"
याशिवाय राष्ट्रीय पातळीवर चेहरा नसलेली आघाडी, काँग्रेसला दूर ठेऊन उत्तरेतील पक्षांनी दिलेला इशारा, नोटाबंदी, बेरोजगारी आणि इतर विषयांवरही भुजबळांनी आपली मतं मांडली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








