नरेंद्र मोदींनी 'चौकीदार' प्रचाराचा मुद्दा का बनवला आहे?

फोटो स्रोत, EPA/JAGADEESH NV
- Author, ओंकार करंबेळकर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी प्रचाराचा शुभारंभ करताना त्यांच्या ट्विटर हँडलचं नाव बदलून 'चौकीदार नरेंद्र मोदी' असं केलं आहे. त्यानंतर केंद्रातील आणि राज्यातील मंत्री, भाजपचे कार्यकर्ते यांनीही त्यांच्या नावामागे चौकीदार हे विशेषण जोडलं आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रफाल करारावरून मोदींनी 'चौकीदारही चोर है' असं वारंवार लक्ष्य केलं आहे. त्याला उत्तर देण्यासाठी मोदींनी ही रणनीती अवलंबली आहेच, शिवाय यामागे इतरही काही कारणं आहेत, असं तज्ज्ञांचं मत आहे.
2014मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये नरेंद्र मोदी यांनी या शब्दाचा पहिल्यांदा वापर केला होता. 'चौकीदार बनून आपण देशाचे संरक्षण करू' या त्यांच्या विधानानंतर तो शब्द प्रसिद्ध झाला. रफाल प्रकरणानंतर काँग्रेसच्या अध्यक्ष राहुल गांधी यांनी हाच शब्द पंतप्रधानांवरच उलटवण्याचा प्रयत्न केला.
'चौकीदार चोर हे' अशा शब्दांमध्ये काँग्रेसने भाजपला उत्तर द्यायला सुरुवात केल्यानंतर जवळपास सर्वच विरोधकांनी या शब्दाचा आधार घेऊन पंतप्रधानांवर टीका करायला सुरुवात केली. काही दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या सभेमध्ये राहुल गांधी यांनी, "चौकीदार फक्त चोरच नाहीत तर डरपोकही आहेत, जेव्हा मी त्यांना रफालबद्दल विचारले तेव्हा त्यांना (पंतप्रधानांना) माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलता आले नाही. ते इकडे-तिकडे पाहात बसले होते," असे वक्तव्य केले होते.
पंतप्रधान मोदी अंबानींचे चौकीदार आहेत अशी टीकाही राहुल यांनी केली आहे. तर कालच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 'पंतप्रधान जगनमोहन रेड्डीसारख्या भ्रष्ट माणसाचे चौकीदार आहेत', अशी टीका केली आहे. त्यामुळे हा शब्द चर्चेत राहिला आहे.
साधारणपणे 1991 नंतर भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांनी निवडणुकांच्या कार्यकाळात दिलेल्या विविध घोषणा लोकांच्या आजही लोकांच्या लक्षात राहिल्या आहेत. राम मंदिर आंदोलनाच्या काळामध्ये 'मंदिर वही बनायेंगे,' 'गर्व से कहो हम हिंदू है' अशा घोषणा धार्मिक, सामाजिक संघटनांकडून देण्यात आल्या. त्यांचा प्रचारात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या उपयोग केला गेला.
अटलबिहारी वाजपेयी ते नरेंद्र मोदी
'बारी बारी सबकी बारी, अगली बारी अटलबिहारी' अशा यमक जुळवणाऱ्या घोषणांनंतर 2004 साली 'शायनिंग इंडिया' या घोषणेच्या मदतीने भारतीय जनता पार्टीने प्रचार केला. 2009 साली लालकृष्ण अडवाणी यांना 'लोहपुरुष' असे संबोधून प्रचार करण्यात आला. या निवडणुकीमध्ये लोहपुरुष या शब्दाभोवती प्रचार फिरत राहिला. मात्र 2014 साली 'चायवाला' या शब्दाने संपूर्ण निवडणुकीचाच ताबा घेतला.
चहावाला माणूस पंतप्रधान होऊ शकतो याचा उच्चार नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी प्रचारात वारंवार केला आणि त्याचा निवडणुकीनंतरही वापर केला. भाजपच्या वतीने 'चाय पे चर्चा' असे कार्यक्रम देशभर घेण्यात आले. मोदी यांची सर्वसामान्य पार्श्वभूमीचा प्रचारात वापर करण्याचा हा प्रयत्न होता. तसेच याच निवडणुकीत 'अबकी बार, मोदी सरकार' अशीही घोषणा प्रसिद्ध करण्यात आली.

फोटो स्रोत, Twitter
2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर देशात विविध राज्यांमध्ये पार पडलेल्या निवडणुका तसेच पोटनिवडणुकांमध्ये 'नामदार-कामदार' या शब्दांचा वापरही पंतप्रधानांनी केला. राहुल गांधी आणि काँग्रेसचे लोक नामदार आहेत आणि मी कामदार आहे असा नरेंद्र मोदी यांनी वारंवार उल्लेख केला.
गेल्या पाच वर्षांमधील निवडणुकीत 'छप्पन इंच की छाती' शब्दप्रयोगाचा भाजपकडून वापर झाला पण पुलवामा, उरी येथे झालेल्या हल्ल्यानंतर आता तुमची छप्पन इंची छाती कोठे गेली असा प्रश्न सत्ताधारी भाजपाला चहुबाजूंनी विचारला गेला. या काळात राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है', नरेंद्र मोदी यांचे सरकार 'सूटबूटकी सरकार' आहे अशी टीका करून त्यांन प्रत्युत्तर दिले.
चौकीदार शब्दाचा प्रचारात वापर कशासाठी?
'चौकीदार चोर है' असं राहुल गांधी यांनीही वारंवार म्हणूनही भारतीय जनता पक्षाने हा शब्द पुन्हा प्रचारात वापरण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी बरोबर 9 वाजता लोकांना उद्देशून एक ट्वीट केलं आहे.
त्यात ते म्हणतात, "तुमचा चौकीदार देशाच्या रक्षणासाठी ठामपणे उभा राहिला आहे. पण मी एकटाच नाही. भ्रष्टाचार, अस्वच्छता आणि सामाजिक दुष्प्रवृत्तीविरोधात लढणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. भारताच्या प्रगतीसाठी कष्ट करणारा प्रत्येकजण चौकीदार आहे. #MainBhiChowkidar असं आज सर्व जण म्हणत आहेत."
त्यांनी ट्वीटरवर स्वतःच्या नावाआधी चौकीदार हा शब्द वापरल्यानंतर इतर केंद्रीय मंत्र्यांनीही त्याचं अनुकरण केलं आहे.
'नरेंद्र मोदी यांचा प्रचारातला मास्टरस्ट्रोक'
"भारतीय जनता पार्टीने याआधी 'मोदी है तो मुमकीन है' अशा घोषणेचा वापर केला होता. मात्र राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है' या टीकेजवळ ती घोषणा आणली की ती एकमेकांना पूरक वाटायची आणि त्यातून नकारात्मक अर्थ निघत होता. परंतु काल 'मै भी चौकीदार' या नव्या घोषणेमुळे सगळी बाजी विरोधकांवर उलटवण्यात त्यांना यश आलं" असं जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ गोपी कुकडे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.

फोटो स्रोत, Getty Images
ते म्हणाले, "असे शब्द किंवा घोषणा तयार करण्यासाठी मार्केट रिसर्च गंभीरपणे करावा लागतो. मात्र त्याचा बाऊ करण्याची गरज नसते. राहुल गांधी यांच्या 'चौकीदार चोर है' या विधानाचा लोकांमध्ये कितपत परिणाम झाला याचा नक्कीच रिसर्च केला असणार. या कॅम्पेनमध्ये सर्व व्यावसायिक, गृहिणी, लोक यांचा समावेश केल्यामुळे आता चौकीदार चोर है असं म्हटल्यामुळे केवळ माझाच नाही तर सर्वांचा अपमान तुम्ही करता असा अर्थ येईल, अशी नरेंद्र मोदी यांनी व्यवस्था केली आहे."
'प्रधानसेवक'शी जोडण्याचा प्रयत्न
या देशाचा केवळ मी एकटाच रक्षक नाही तर तुम्ही सर्व आहात हे दाखवण्याचा प्रयत्न पंतप्रधान मोदी यांनी केला असं झी 24 तासचे मुख्य संपादक विजय कुवळेकर यांचं मत आहे.
ते म्हणाले, "पंतप्रधान स्वतःला प्रधानसेवक म्हणायचे याचाच अर्थ 'तुम्हीही सेवक आहात, मी तुमच्यापैकीच एक असणारा आणि फक्त प्रधान आहे' बस एवढंच! असा अर्थ त्यांनी घेतला होता."
"आता त्यांनी सर्वांनाच 'मीसुद्धा चौकीदार आहे' असं म्हणायला लावलं आहे. त्यामुळे राहुल गांधी जर 'चौकीदार चोर है' असं म्हटल्यास 'प्रत्येकजण कसा चोर होऊ शकतो' असा अर्थ ध्वनित करण्यात त्यांना यश येईल. अशा प्रकारच्या घोषणा प्रत्येक आंदोलनामध्ये आणि निवडणुकांमध्ये वापरल्या जातात.

फोटो स्रोत, Twitter@Rahul Gandhi
अण्णा हजारे यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केले होते तेव्हा 'मै भी अन्ना' अशा घोषणा लिहिलेल्या टोप्या आंदोलकांनी घातल्या होत्या. म्हणजे आपणही त्या आंदोलनाशी संबंधित आहोत असं त्यांनी दाखवलं होतं. तसाच प्रकार या 'मै भी चौकीदार' घोषणेतून करण्याचा प्रयत्न केला आहे."
जाहिरात क्षेत्रातील तज्ज्ञ अनंत खासबारदार यांच्या मते, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नव्या मोहिमेद्वारे प्रचाराचा 'सायकॉलॉजिकल इफेक्ट' ओळखला आहे. ज्या चौकीदार चोर है या घोषणेमुळे त्यांच्याकडे बोटं रोखली गेली होती तिच बोटं त्यांनी विरोधकांकडे वळवली आहेत. हो मी चौकीदार आहे, तुम्हीही चौकीदार आहात! असं सांगून आता तुम्हीच ठरवा असा प्रश्न त्यांनी विरोधक आणि लोकांसमोर ठेवला आहे."
मात्र जाहिराततज्ज्ञ अमरदीप पाटील यांचं मत वेळ आहे. ते म्हणाले, ''राहुल गांधी यांनी 'चौकीदार चोर है' ही घोषणा लावून धरल्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही भूमिका घ्यावी लागली. ही नवी मोहीम सुरू करून नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधी यांच्या घोषणेवर शिक्कामोर्तब केल्यासारखं आहे. पुलवामा हल्ल्यानंतर काही काळ भाजपाने 'सामर्थ्यवान भारत' शब्दाचा उपयोग केला मात्र 'चौकीदार चोर है'चा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्यावर त्यांना भूमिका बदलावी लागली.''
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








