राज ठाकरे: महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवणार नाही

फोटो स्रोत, Getty Images
आगामी लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. राज ठाकरे यांनी गेल्या वेळी लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले होते, यावेळी मात्र त्यांनी ही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
विधानसभेची व्यूहरचना म्हणून राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला असावा असं मनसेच्या समर्थकांना वाटतं. तर, लोकसभेत दारुण पराभव होईल हे ओळखून राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असावा असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
भारतीय जनता पार्टीच्या केंद्र आणि शिवसेनेच्या राज्यातील युती सरकारवर आणि केंद्रातील एनडीए सरकारविरोधात गेली पाच वर्षे राज ठाकरे यांनी सातत्याने टीका केली आहे.
मनसेतर्फे ट्विटरवर पत्रक प्रसिद्ध करून हा निर्णय घोषित करण्यात आला आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काही दिवसांपूर्वी झालेल्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातही ठाकरे यांनी सरकारचा खरपूस समाचार घेतला. त्यामुळे लोकसभा निवडणुकांमध्ये मनसे काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
तसेच कोणत्या मतदारसंघात मनसेचा प्रभाव कसा राहील, शिवसेनेच्या मतांना मनसेमुळे किती धक्का पोहोचेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मैत्री झाल्यामुळे राज्यातील गणिते कशी बदलतील असे अनेक प्रश्न तयार झाले होते.
मात्र आता लोकसभा निवडणुका लढवायचेच नाकारल्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. अर्थात अचानक असा निर्णय घेऊन निवडणुकांमध्ये मनसे कशा पद्धतीने राजकीय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
19 तारखेला राज ठाकरे मेळावा घेणार आहेत त्यामध्ये कदाचित अधिक स्पष्ट भूमिका मांडतील असं तज्ज्ञांना वाटत आहे.
मनसे पुन्हा उभारी घेईल?
राज ठाकरे आणि मनसेच्या राजकीय भूमिकांचे समर्थक तसेच 'दगलबाज राज' या पुस्तकाचे लेखक कीर्तिकुमार शिंदे यांच्या मते, "महाराष्ट्र हे आपलं कार्यक्षेत्र राज ठाकरे यांनी आखून घेतलं आहे. लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्याविरोधात प्रचार करून ते विधानसभा निवडणुकीत मनसेला पुन्हा राजकीय पटलावर आणतील. त्यांनी आताची व्यूहरचना ही विधानसभा डोळ्यांसमोर ठेवून केली असावी."

फोटो स्रोत, Getty Images
राज ठाकरे हे येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीविरोधी किंवा भाजपाविरोधी प्रचाराचे ते मुख्य केंद्र किंवा तोफखाना असतील असं शिंदे यांना वाटतं. ते म्हणाले, "19 तारखेच्या मेळाव्यात तसेच 6 एप्रिलला होणाऱ्या गुढी पाडवा मेळाव्यामध्ये ते अधिक स्पष्टपणे केंद्र सरकारवर हल्ला चढवतील. मतदानाच्या अगदी काही दिवसच पाडव्याला त्यांना आपली बाजू मांडायची संधी मिळणार आहे."
राज ठाकरे आपली नरेंद्र मोदी विरोधाची धार पुढेही कायम ठेवतील याबाबत सांगताना कीर्तिकुमार शिंदे म्हणाले, "संपूर्ण देशात मोदीमुक्त भारत अशी घोषणा करणारे राज हे एकमेव नेते आहेत. मोदी यांच्या विरोधात गेली चार वर्षे त्यांनी सातत्य ठेवलं आहे. परवाच (वर्धापन दिनाचं) भाषण हा मोदींविरोधाचा सर्वोच्च आविष्कार होता. पुढच्या दोन महिन्यात राज हे पुन्हा पुन्हा मोदी आणि भाजप वर टीका करतील, असं स्पष्ट दिसत आहे."
'विधानसभेपर्यंत प्रतिमा जपण्यासाठी'
पक्षाचा दारुण पराभव होईल हे ओळखूनच मनसेनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असावा असं मत फ्री प्रेस जर्नलचे ब्युरो चीफ विवेक भावसार यांनी व्यक्त केलं.
"झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणतात. मनसेनं लोकसभा न लढवण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत विचारपूर्वक घेतला आहे असंच म्हणावं लागेल. कारण त्यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला असता आणि पक्षाची प्रतिमा मलीन झाली असती. याचा परिणाम विधानसभा निवडणुकीवरही झाला असता. हे टाळण्यासाठी मनसेनं हा निर्णय घेतला असावा," भावसार सांगतात.
त्यांच्यामते, " या पक्षाची दुरवस्था झाली आहे. मनसेकडे नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत. जुने नेते सोडून गेले आहेत आणि आहे त्यांचा जनसंपर्क कमी झाला आहे. अशा वेळी जर ते निवडणुकीला सामोरं गेले असते तर त्याचा फटका त्यांना विधानसभेच्या निवडणुकांवर झाला असता. दुसरी गोष्ट अशी की जर विधानसभेसाठी त्यांना एखाद्या पक्षाची सोबत हवी असेल तर त्यासाठी त्यांची बार्गेनिंग पॉवर देखील वाढेल."
"गेल्या निवडणुकीत लोकसभेत त्यांनी 10 जागा लढवल्या होत्या. सर्वच ठिकाणी ते हरले. यातूनही त्यांनी धडा घेतला असंच म्हणावं लागेल. त्यांच्या या निर्णयाचा त्यांना विधानसभेला फायदा होऊ शकतो," भावसार सांगतात.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








