#MainBhiChowkidar: नरेंद्र मोदी का बनले 'चौकीदार'?

मै भी चौकीदार या घोषणेसकट प्रचाराचा श्रीगणेशा करणाऱ्या नरेंद्र मोदींनी त्यांच्या ट्विटर हँडलचं नाव बदलून चौकीदार नरेंद्र मोदी असं केलं आहे. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर सतत चौकीदार चोर है, असा हल्लाबोल केला असताना मोदी आणि भाजपने अशा पद्धतीनं उत्तर दिलं आहे. मोदी यांच्या या नव्या प्रचार मोहिमेवर काँग्रेसने टीका केली आहे.

मोदींचा कित्ता गिरवत भाजप अध्यक्ष अमित शाह, रेल्वेमंत्री पियुष गोयल, जे.पी.नड्डा, मीनाक्षी लेखी यांनीही त्यांच्या ट्विटर हँडलचं नाव बदलत नावापुढे चौकीदार लावलं आहे. भाजपच्या देशभरातील नेत्यांनी मोदींच्या पावलावर पाऊल टाकत ट्विटर हँडलच्या नावापुढे चौकीदार हे विशेषण जोडलं आहे.

रफाल प्रकरणावरून चौकीदार चोर है असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सातत्याने केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मै भी चौकीदार ही मोहीम मोदींनी आखली होती. त्याबाबत तीन मिनिटांचा एक व्हीडिओसुद्धा पोस्ट केला होता. आज पोस्ट केलेल्या व्हीडिओत त्यांनी 31 मार्चला संध्याकाळी सहा वाजता कनेक्ट होण्याचं आवाहन केलं आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही हे विशेषण लावलं आहे.

भाजपच्या नेत्यांबरोबर काही ट्विटर युजर्सनेसुद्धा आपल्या नावापुढे चौकीदार हे विशेषण लावत मोदींच्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका करत आज तुम्हाला जरा अपराधी वाटतंय का असा प्रश्न विचारला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी मोदींवर टीकेची झोड उठवली. ते म्हणतात, "2014 मध्ये वापरलेल्या क्लृप्त्या आता कामास येणार नाही. शेतकऱ्यांसाठीची अपुरी कर्जमाफी, दुप्पट हमीभाव, बेरोजगाराचे गड आम्ही चढले 15 लाखांची स्वप्नं धुळीत माखली. आप भी चोर चौकीदार, पाप मे भागीदार."

भाजपच्या नेत्यांबरोबर काही ट्विटर युजर्सनेसुद्धा आपल्या नावापुढे चौकीदार हे विशेषण लावत मोदींच्या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)