#MainBhiChowkidar : नरेंद्र मोदींची प्रचारात उडी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर व्हीडीओ पोस्ट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या समर्थकांना 'मै भी चौकीदार (मीही चौकीदार)' अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन केलं आहे. समाजात घडणाऱ्या अप्रिय घटनांच्या विरोधात लढणारे ते एकटेच नाहीत, असा संदेश त्यांनी दिला आहे. तर काँग्रेसने या प्रचार मोहिमेवर टीका केली आहे.

"तुमचा चौकीदार ठामपणे उभा आहे आणि देशाची सेवा करत आहे. पण मी एकटा नाही. भ्रष्टाचार, समाजात पसरलेली घाण यांच्याविरोधात आवाज उठवणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. देशाच्या प्रगतीसाठी काम करणारा प्रत्येक जण चौकीदार आहे. आज प्रत्येक भारतीय MainBhiChowkidar, असं म्हणत देशाचं रक्षण करत आहे," असं त्यांनी म्हटलं आहे.

हा संदेश देण्यासाठी त्यांनी तीन मिनिटांचा एक व्हीडिओ पोस्ट केला आहे. मोदींनी स्वत:ला चौकीदार असं संबोधलं आहे. स्वत: भ्रष्टाचार करणार नाही आणि करूही देणार नाही असं ते म्हणाले.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सतत 'चौकीदार चोर है' अशा शब्दांत मोदींवर टीका करतात. विशेषत: रफाल मुदद्यावर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. भाजपने मात्र या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस

ही घोषणा केल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीही ट्विट केलं आहे. "#MainBhiChowkidar या मोहिमेत सहभाग घेताना अतिशय आनंद होत आहे. भारताचा नागरिक म्हणून माझं देशावर प्रेम आहे. भ्रष्टाचार, दारिद्र्य आणि कट्टरवादाचा पराभव करण्यासाठी मी शक्य ते सगळं करेन..तसंच संपन्न, सुरक्षित आणि सक्षम भारताची निर्मिती करण्यासाठी मदत करेन," असं ट्विट त्यांनी केलं आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी चोराने स्वतःला चौकीदार दाखवणे ही शोकांतिक असून खऱ्या पोलिसांचा अवमान असल्याचं म्हटलं आहे.

याच शब्दात असंख्य ट्विटर युजर्सनी या मोहिमेला पाठिंबा दिला आहे. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनीसुद्धा याच आशयाचं ट्विट केलं आहे.

त्याचवेळी हे एक चांगलं गाणं असून ते निवडणुकीवर केंद्रित नको होतं. एखादं चांगलं उद्दिष्ट ठेवून ते आधीच काढायला हवं होतं अशी प्रतिक्रिया राज रॉकर या ट्विटर युजरने दिली आहे.

"सर्वसमावेशक अर्थव्यवस्था महत्त्वाची आहे. आता लोकांच्या खात्यात थेट पैसे जातात. आधीच्या सरकारमध्ये 100 रुपये मंजूर केले तर लाभार्थींना 15 रुपये मिळत असत," अशा शब्दांत सिद्धार्थ पै यांनी या मोहिमेला प्रतिसाद दिला आहे.

"चौकीदार चोर है या आरोपाला 'मै भी चौकीदार' हे उत्तर म्हणजे गेल्या काही काळातील उत्तम मोहीम आहे. असं यशवंत देशमुख यांना वाटतं. निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू झाला असून रंगतदार सामन्याची वाट पाहतोय," असंही ते पुढे म्हणाले.

त्याचवेळी विपिन गर्ग म्हणतात, "उत्तरेत सुशिक्षित युवक आणि निवृत्त सरकारी अधिकाऱ्यांमध्ये बरेच अंत:प्रवाह आहेत. मत विभागली गेली आहेत. मतदारांच्या मनात काय असेल हे सांगता येत नाही."

"डिजिटल माध्यमांत आपला ठसा उमटवण्यासाठी ही एक अत्यंत चांगली मोहीम होऊ शकते. नरेंद्र मोदींना असले षटकार हाणण्याचं कौशल्य आहे," असं मत अनुराग सक्सेना यांनी व्यक्त केलं आहे.

"पंतप्रधान मोदींनी या हॅशटॅगसह प्रचार सुरू केला आहे. त्यामुळे चौकीदार चोर आहे हे सिद्ध झालं आहे. त्यांना हे खापर फोडण्यासाठी लोक हवीत," असं मत पनस्टार या ट्विटर युजर ने व्यक्त केलंय.

झैनाब सिकंदर म्हणतात, "भ्रष्टाचारविरोधात लढणारा प्रत्येक जण चौकीदार आहे, हे मान्य. आम्हाला नीरव मोदी, विजय मलल्या, मेहुल चौक्सी यांना परत आणयाचं आहे. त्यांना परत आणण्याची शक्ती कुणाकडे आहे? पंतप्रधान मोदी तुमच्याकडेच ते अधिकार आहेत. जबाबदारी लोकांकडे ढकलण्याची ही सोयीस्कर वाट आहे."

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सामान्य कुटुंबातून पुढं आले आहेत. या पार्श्वभूमीचा त्यांनी धुर्त उपयोग केला आहे, असं शहजाद यांनी म्हटलं आहे. "गेल्या निवडणुकीत मनीशंकर अय्यर यांनी मोदींचा उल्लेख चहावाला असा केला. यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांची सर्वसामान्य पार्श्वभूमी राजकारणात वापरण्याची संधी दिली आहे. हा मोठा सेल्फ गोल आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)