नोटाबंदीशी संबंधित BBCच्या नावे पसरवला जाणारा हा व्हीडिओ खोटा - फॅक्टचेक

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज

बीबीसीचं नाव वापरून सोशल मीडियावर दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. नोटाबंदीच्या काळामध्ये हजारो लोकांचा मृत्यू झाला होता, त्याचं वार्तांकन झालंच नाही अशी माहिती बीबीसीच्या नावाचा खोटा वापर करून पसरवली जात आहे.

बीबीसीला वाचकांकडून असे काही संदेश, स्क्रीनशॉट्स मिळालेले आहेत.

फेसबूक, ट्वीटर, शेअरचॅट आणि व्हॉट्सअपवर पसरवली जात असलेली ही माहिती खोटी आहे.

चलनातील 86 टक्के नोटा एकदम रद्द केल्यामुळे कोट्यवधी लोकांच्या आयुष्यावर परिणाम झाला हे जरी खरं असलं तरी नोटाबंदीमध्ये हजारो लोकांचे प्राण गेले, अशी कोणतीही माहिती बीबीसीनं प्रसिद्ध केलेली नाही.

नोटाबंदी झाल्यामुळं देशात संतापाची लाट का नाही?

भारतात नोटाबंदीमुळे लोकांना होणाऱ्या त्रासाबद्दल सर्वत्र बातम्या प्रसिद्ध झाल्या. बीबीसीचे प्रतिनिधी जस्टीन रॉलेट यांनी नोटाबंदी अयशस्वी का झाली ठरूनही देशातील लोकांमध्ये संतापाची लाट कशी आली नाही याचं विश्लेषण केलं.

या रिपोर्टमध्ये रॉलेट लिहितात -

देशातील 86 टक्के चलन रद्द करण्याचा निर्णय झाल्यानंतर मोठा गोंधळ उडाला होता. एका क्षणी जगातील सातव्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेतील 1.2 अब्ज लोक बँकांबाहेर रांगा लावून उभे आहेत असं वाटलं होतं.

नोटाबंदीमुळं अनेक व्यवसाय ठप्प झाले. अनेकांचं आयुष्य उद्धवस्त झालं. काही लोकांकडे पोट भरण्यासाठीही पैसे नव्हते.

रोख पैसे नसल्यामुळं लोकांच्या जीवनावर नकारात्मक परिणाम झाला. या निर्णयामुळं जवळपास एक कोटी लोकांवर अत्यंत वाईट परिणाम झाला असं मानलं जातं.

आता साधारणपणे सर्व पैसे परत गेल्यावर भारतीय लोक सरकारच्या विरोधात आवाज उठवतील असं तुम्हाला वाटेल. पण हा निर्णय चुकीचा ठरूनही लोकांत संताप का दिसला नाही?

यामागचं एक कारण असं की अनेक लोकांना पैशाच्या मोठ्या हिशेबाची सवय नसते. त्यातल्या बारीक गोष्टी कळत नाहीत. दुसरं कारण म्हणजे, या निर्णामुळं श्रीमंत लोकांच्या खिशाला कात्री लागणार असं नरेंद्र मोदींनी गरीब जनतेला सांगत प्रचार केला.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या आकड्यांवरून या निर्णयाचा काहीही फायदा झाला नाही हे सिद्ध झालं असलं तरी मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता असलेल्या देशात मोदींचं भाषण त्यापेक्षा प्रभावी ठरलं.

जेव्हा निर्णयाचा फायदा होत नसल्याचं दिसल्यावर सरकारने या निर्णयाचं उद्दिष्ट बदललं. सुरुवातीला नोटाबंदीचा फायदा काळा पैसा बाहेर काढण्यासाठी होत असल्याचं सांगितलं.

पण ही नोटाबंदीनंतर काही आठवड्यात असं कळलं की बँकेत अधिक पैसा जमा होत आहे. तेव्हा हा निर्णय डिजिटल व्यवहारांना गती देण्यासाठी निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं.

नोटबंदीचा फायदा झाला की नुकसान?

या निर्णयाचे परिणाम संमिश्र असल्याचं बीबीसीच्या पडताळणीत दिसून आलं.

अघोषित संपत्ती चव्हाट्यावर आणण्यात सरकारला यश आलं नाही पण टॅक्स भरणा होण्याच्या बाबतीत याचा नक्कीच फायदा झाला आहे.

RBIच्या ऑगस्ट 2018च्या रिपोर्टनुसार बंद केलेल्या 99 टक्के नोटा हा परत बँकेत जमा करण्यात आल्या आहेत. या अर्थ लोकांकडं बेकायदेशीर संपत्ती असल्याचा दावा खरा नाहीये किंवी ती संपत्ती कायदेशीररीत्या दाखवण्याचा मार्ग त्यांनी शोधला असावा.

नोटाबंदीमुळे खोट्या नोटा बंद होतील का?

नोटाबंदीनंतर खोट्या नोटा चलनातून हद्दपार होतील, असं RBIने म्हटलं होतं. पण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अर्थतज्ज्ञांच्या मते नवीन नोटांच्या बनावट नोटा बनवणं कठीण नाही. नव्या नोटा व्यवहारात आणल्यानंतरही बनावट नोटा जप्त झाल्याची उदाहरणं आहेत.

नोटाबंदीनंतर भारतीय अर्थव्यवस्था अधिक डिजिटल झाली आहे. पण याबाबत RBIने अधिकृतरीत्या काहीही वक्तव्य केलेलं नाही.

देशात गेल्या काही वर्षांत कॅशलेस देवाणघेवाण वाढतच होती. 2016च्या नोटाबंदीनंतर त्याचा वेग वाढला. पण त्यानंतर लवकरच कॅशलेस व्यवहारांचा वेग पूर्वपदावर आला.

कॅशलेस व्यवहारांचा वाढता वेग नोटाबंदीनं नव्हे तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळं झाल्याचं जाणकार सांगतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)