You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पोल्लाची सामूहिक बलात्कार प्रकरण : तामिळनाडूचं राजकारण हादरलं, सोशल मीडियावर व्हीडिओ आल्याने खळबळ
"माझ्यावर अत्याचार करू नका," अशी विनंती बॉयफ्रेंड आणि त्याच्या काही मित्रांना करणाऱ्या एका तरुणीचा व्हीडिओ तामिळनाडूमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या व्हीडिओमुळे तामिळनाडूतलं वातावरण ढवळून निघालं आहे आणि त्यानंतर दक्षिण भारतात यासंबंधित बातम्यांचं पेव फुटलं आहे.
तामिळनाडूत एक गँग सक्रिय आहे जी महिलांचा लैंगिक छळ करत आहे, तसंच महिलांना ब्लॅकमेल करत आहे आणि या गँगशी संबंधित आरोपींवर पोल्लाची भागातल्या काही राज्यकर्त्यांचा वरदहस्त आहे, अशा आशयाच्या बातम्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आल्या आहेत.
वसंत कुमार, सबरीश, सतीश आणि थिरुनावुकारसू या चौघांना या प्रकरणी अटक करण्यात आली होती. हे चौघं संबंधित मुलगी आणि तिच्या मित्रांना एका खासगी जागेवर घेऊन गेले आणि त्यांचा लैंगिक छळ केला. त्यानंतर या घटनेचं चित्रीकरण करण्यात आलं.
यानंतर ते फुटेज वापरून त्यांनी महिलेला धमकावलं. तामिळनाडूच्या कोइंबतूर जिल्ह्यातल्या पोल्लाची गावातले हे चार जण आहेत.
या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर संबंधित मुलीच्या भावानं पोल्लाची पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
24 फेब्रुवारीला 4 जणांविरुद्ध केस दाखल करण्यात आली आणि 28 फेब्रुवारीला तिघांना अटक करण्यात आली. यापैकी थिरुनावुकारसू हा लपून बसला होता. पोलिसांनी 5 मार्चला त्याला अटक केली.
वसंत कुमार, सबरीश, सतीश आणि थिरुनावुकारसू या चौघांविरुद्ध 59/19, u/s. 354(A), 354(B), IPC r/w 66(E), IT Act 2000 आणि Tamil Nadu Women Harassment Act अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुलीच्या भावावर हल्ला
व्हायरल व्हीडिओविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पीडितेच्या भावावर काही संशयितांनी हल्ला केला होता. हल्लेखोरांपैकी वसंत कुमार, सेंथील आणि नागराज या तीन जणांना अटक करण्यात आली होती.
यापैकी नागराज सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाशी संबंधित आहे, यामुळे सत्ताधारी पक्ष या केसमध्ये अडथळा आणत आहे, अशी अनेकांनी टीका केली होती.
सोमवारी अण्णा द्रमुकनं निवेदन प्रसिद्ध करून म्हटलं की, नागराजला पक्षातून काढून टाकण्यात आलं आहे.
पोलीस काय म्हणतात?
या प्रकरणी सरकारच्या हस्तक्षेपाचे आरोप, कोइंबतूरचे पोलीस उपअधीक्षक पांड्याराजन यांनी फेटाळले आहेत.
"अटक करण्यात आलेल्यांकडून 4 मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. या फोनमध्ये 4 महिलांचे व्हीडिओ सापडले आहेत. यापैकी 2 महिलांचा शोध लागला असून इतर 2 महिलांचा शोध सुरू आहे. एकदा उरलेल्या 2 महिलांचा पत्ता लागला की त्यांच्याकडून पोलीस जवाब नोंदवून घेणार आहे. यानंतर Gundas Actअंतर्गत कारवाई करण्यात येईल," असं पोलिसांचं म्हणणं आहे.
या प्रकरणातील इतर पीडितांना सहकार्य करण्याचं आणि गरज पडल्यास त्यांची माहिती गोपनीय ठेवण्याची विनंती पोलिसांनी केली आहे.
"या प्रकरणातील मुख्य आरोपी थिरुनावुकारसू हा कॉलेजच्या दिवसांपासून असं वर्तन करत आहे. पण आतापर्यंत एकूण पीडितांची संख्या आणि त्यांची माहिती मिळवण्यात पोलिसांना यश आलेलं नाही," असं पोलीस सांगतात.
2012मध्ये पोल्लाची भागात झालेल्या सर्व तरुण महिलांच्या आत्महत्यांच्या प्रकरणांची नव्यानं चौकशी करण्यात यावी, अशी मागणी All India Democratic Women Associationच्या राधिका यांनी केली आहे.
त्यावर 2012पासूनच्या तरुण महिला आत्महत्या प्रकरणांची नव्यानं चौकशी करू, असं पोलिसांनी म्हटलं आहे. या आत्महत्या आणि सध्याच्या प्रकरणात काही कनेक्शन आढळल्यास दोषींना कडक शिक्षा केली जाईल, असंही पोलिसांनी म्हटलं आहे.
थिरुनावुकारसू ज्यावेळेस बेपत्ता होता त्यावेळेस त्याला त्याच्या एका मैत्रिणीनं मदत केली होती. पण या महिलेबद्दल अधिक सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
"सोशल मीडियावर व्हीडिओ व्हायरल होत आहेत आणि यामुळे पीडितेच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. सोशल मीडियावर हा व्हीडिओ शेअर करणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात येईल," असं पोलिसांनी म्हटलं आहे.
पोलीस जेव्हा सर्वप्रथम पत्रकारांसमोर आले होते, तेव्हा त्यांनी पीडितेची ओळख जाहीर केली होती. त्यानंतर मात्र त्यांनी खंत व्यक्त केली होती.
याप्रकरणी तत्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी अनेक राजकीय पक्ष सरकारवर दबाव आणत आहे. या घटनेच्या निषेधार्थ तामिळनाडूत निदर्शनंही करण्यात आली आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)