नरेंद्र मोदी: लोकसभा निवडणुकीत भाजपचं पारडं सध्या विरोधकांपेक्षा जड दिसतंय का? - विश्लेषण

17व्या लोकसभा निवडणुकीसाठीचं वेळापत्रक निवडणूक आयोगानं रविवारी जाहीर केलं. लोकसभेसाठी सात टप्प्यांत मतदान होणार असून 11 एप्रिल ते 19 मे दरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पडेल. निवडणुकांची घोषणा झाली म्हटल्यावर निवडणुकीची खरी धामधूम सुरू होते. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी सत्ताधारी भाजप आणि विरोधकांचं बलाबल काय आहे, याचा घेतलेला हा आढावा.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील एकसंध भाजपच्या तुलनेत सध्या विरोधक विखुरलेले दिसतात. काँग्रेसनं अनेक ठिकाणी प्रादेशिक पक्षांबरोबर आघाडी केली आहे. मात्र देशव्यापी आघाडी अजूनपर्यंत अस्तित्त्वात आलेली नाही. त्यामुळे ही निवडणूक भाजप विरुद्ध काँग्रेस अशी असेल की भाजप विरुद्ध सर्व विरोधक अशा स्वरूपाची अशी असेल, हे पाहणंही महत्त्वाचं ठरेल.

प्रचाराच्या बाबतीत बोलायचं झालं तर भारतीय जनता पक्षानं निश्चितच आघाडी घेतली आहे. सध्याच्या घडीला नरेंद्र मोदी हे निःसंशयपणे अधिक प्रभावशाली वक्ते आहेत. नरेंद्र मोदी आणि भाजपनं आपला निवडणुकीचा अजेंडा खूप आधीपासूनच आक्रमकपणे राबवायला सुरुवात केली आहे, असं मत राजकीय विश्लेषक राधिका रामशेषन यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.

रामशेषन सांगतात की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण शक्तीनिशी आपली प्रचार मोहीम सुरू केली आहे. "आपल्या भाषणात ते प्रत्येक वेळी कोणती तरी नवीन गोष्ट मांडतात. मोदींच्या भाषणातील दावे किती खरे आहेत, याबद्दल विश्लेषक तर्क-वितर्क करत असतीलही. पण लोकांवर त्यांच्या भाषणांचा सकारात्मक परिणाम होतो."

नरेंद्र मोदींनी ग्रेटर नॉयडामधील विकास योजनांच्या उद्घाटनावेळेस जे भाषण केलं, त्याचं उदाहरण रामशेषन यांनी दिलं. "नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात वीज, पाणी आणि रस्त्यांसारख्या मुलभूत मुद्द्यांवर भर दिला. मात्र सरतेशेवटी ते राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर बोलले. भारतीय वायुसेनेनं पाकिस्तानमध्ये कट्टरतावादी कँपमध्ये केलेल्या हल्ल्याचाही त्यांनी उल्लेख केला. या हवाई हल्ल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर त्यांनी कडाडून हल्ला चढवला."

"मोदींनी जी रणनीती 2014 मध्ये अवलंबिली होती, तीच ते यावेळेसही अवलंबतील. लोकांच्या भावना भडकवणारे, ध्रुवीकरण करणारे मुद्दे ते निवडणुकीत वापरतील. मोदी स्वतः याविषयी जास्त बोलणार नाहीत, मात्र पक्षातील अन्य नेते हे मुद्दे वारंवार मांडतील," असं निरीक्षण रामशेषन यांनी नोंदवलं.

विरोधक कुठे आहेत?

भाजप आणि नरेंद्र मोदींच्या तुलनेत विरोधकांची परिस्थिती फारशी चांगली दिसत नसल्याचंही रामशेषन म्हणाल्या. "राहुल गांधी सातत्यानं रफाल व्यवहारातील त्रुटींबद्दल बोलत आहेत. काँग्रेसचे इतर नेते रोजगाराबद्दल बोलत आहेत. मात्र त्याचा फारसा परिणाम होताना दिसत नाहीये," त्या सांगतात.

"उत्तर प्रदेशमध्ये जातिवादी दृष्टिकोनातून पाहिलं तर समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षामध्ये झालेली युती ही अतिशय महत्त्वपूर्ण आहे. बसपा अध्यक्ष मायावतींनी पुलवामा हल्ला आणि पाकिस्तानामध्ये वायुदलानं केलेल्या कारवाईबद्दल प्रश्न उपस्थित केले. मात्र जी आक्रमकता विरोधकांमध्ये दिसायला हवी, तशी त्यांच्यामध्ये दिसली नाही."

"विरोधकांची आघाडीही धड होताना दिसत नाहीये. दिल्लीचंच उदाहरण घेऊया. तिथे आघाडी होणार की नाही, याबद्दल तळ्यात-मळ्यात सुरू आहे. भाजपची निवडणूक मोहिमेची दिशा मात्र स्पष्ट आहे. अजून एखाद हवाई हल्लाही होऊ शकतो. भाजप राष्ट्रवादाच्याच मुद्द्यावर ही निवडणूक लढवेल," असं रामशेषन यांनी बीबीसीशी बोलताना स्पष्ट केलं.

"विरोधक शेतकऱ्यांची दुरवस्था, GST आणि नोटाबंदीचा लहान व्यापाऱ्यांना बसलेला फटका, हे मुद्दे प्रभावीपणे मांडू शकतील का, हादेखील एक प्रश्न आहे. खरं तर गेल्या दीड महिन्यात मुलभूत समस्यांमध्ये कोणताही फरक पडलेला नाही. शेतकरी आणि लहान व्यापारी आजही तितकेच त्रस्त आहेत. त्यांचे प्रश्न आक्रमकपणे मांडून भाजपच्या राष्ट्रवादाच्या मुद्द्याला विरोधकांकडून प्रत्युत्तर दिलं जाणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल," असं रामशेषनं यांनी म्हटलं.

भाजपचं प्राधान्य कशालाः विकास की राष्ट्रवाद?

डिसेंबरमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांनंतर जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान देशातील वातावरण काहीसं बदलताना दिसत होतं. मात्र पुलवामा हल्ला, त्यानंतर बालाकोटमध्ये भारताने केलेल्या कारवाईनंतर देशाचा मूड पुन्हा मोदींच्या बाजूनं आहे," असं मत पत्रकार आदिती फडणीस यांनी बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.

"आता भाजप आपल्या जनधन सारख्या योजना, विकास कामांवर भर देणार की राष्ट्रवादाच्या हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसंच काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्ष भाजपला कोणत्या मुद्द्यावर आव्हान देणार हाही मुद्दा महत्त्वाचा आहे," असं फडणीस यांनी म्हटलं.

"2014ची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळी जे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले होते. त्यामध्ये माध्यमांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. बदलाचे वारे वहायला लागले होते. पुलवामा हल्ल्यानंतर विरोधकांनी सरकारला घेरण्यात काही प्रमाणात यश मिळवलं होतं. मात्र बालाकोटनंतर परिस्थिती बदलली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं."

"विरोधक एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेसनं प्रियंका गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपाची आघाडी झाली आहे, याचा परिणाम अजून स्पष्ट व्हायचा आहे. प्रियंका गांधींनी अजूनपर्यंत एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही किंवा सभाही घेतली नाही. त्यामुळे त्यांची भूमिका, त्या लोकांना कसं सामोरं जाणार, याबद्दल प्रश्नचिन्हच आहे."

"काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होणं अजून बाकी आहे. त्यानंतर औपचारिकरीत्या काँग्रेसच्या प्रचाराचा बिगुल वाजेल. या बैठकीनंतर काँग्रेसच्या प्रचाराची दिशा निश्चित होईल," असं फडणीस यांनी सांगितलं.

काय असेल महाराष्ट्रातील परिस्थिती?

महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेनेची युती झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही एकत्र येणं भाग पडलं. युती तसंच वंचित बहुजन विकास आघाडीमुळे महाराष्ट्रातील राजकीय समीकरणं कशी बदलतील, याबद्दल 'सकाळ'च्या पुणे आवृत्तीचे संपादक सम्राट फडणीस यांनी बीबीसी मराठीशी संवाद साधला.

"गेल्या वेळेस मोदी लाटेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मिळून अवघ्या सहा जागा मिळाल्या होत्या. यावेळी मात्र या दोन्ही पक्षांची परिस्थिती इतकी बिकट नसेल. मराठा मोर्चा, शेतकरी आंदोलनाच्या निमित्तानं विरोधकांना रस्त्यावर उतरून काम केलं आहे. त्याचा त्यांना निश्चितच फायदा होईल," असं सम्राट फडणीस यांनी म्हटलं.

महाराष्ट्रात यंदा भीषण दुष्काळ आहे, त्याचाही परिणाम निवडणुकीवर होईल. शेतकऱ्यांची आंदोलनं महाराष्ट्रभर झाली आहेत. या निवडणुकीत हा मुद्दा प्रभावी ठरेल. प्रत्येक ठिकाणी सरकारला पाण्याच्या प्रश्नावर उत्तरं द्यावी लागतील. पुलवामा आणि भारत-पाकिस्तान यापेक्षाही स्थानिक प्रश्न जास्त प्रभावी ठरतील," असं मतही सम्राट फडणीस यांनी व्यक्त केलं.

"महाराष्ट्रात चार टप्प्यांत निवडणुका होणार असल्यानं राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांना जास्तीजास्त मतदारसंघात प्रचार करता येईल. त्याचा फायदा विरोधकांना होऊ शकतो," असं ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)