लोकसभा 2019 : शिवसेनेच्या विरोधात उमेदवार देणार, भाजपच्या नाही – नारायण राणे

- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
लोकसभा निवडणुकांची घोषणा अगदी काही तासांवर आली आहे. सर्वच नेते निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवसेना भाजप युतीनंतर खासदार नारायण राणे यांची भूमिका काय याची उत्सुकता वाढली आहे.
बीबीसी मराठीला नारायण राणे यांनी सर्वप्रथम मुलाखत दिली. यामध्ये स्वाभिमान पक्षाचे उमेदवार हे भाजपविरोधात न देता शिवसेनेविरोधात देणार असल्याचा मोठा खुलासा नारायण राणे यांनी केला आहे.
त्याचबरोबर भाजप हा सहयोगी पक्ष असला तरी जी कामं फडणवीस सरकारने केली नाहीत त्यावर निश्चितच भाजपला टीकेचं लक्ष्य करणार असल्याचही ते म्हणाले.
नारायण राणे यांचे पुत्र आणि कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे योग्यवेळी राजीनामा देऊन स्वाभिमान पक्षातून निवडणूक लढविणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
निवडणूकीमध्ये नारायण राणेंच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय. काय असणार नारायण राणेंची भूमिका?
या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काही जागा लढवेल. किती जागा लढवणार हे आम्ही लवकरच जाहीर करू. आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गमधून निलेश राणेंच्या नावाची घोषणा केलेली आहे. लवकरच बाकी उमेदवारांचीही घोषणा करू
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
शिवसेना भाजपचं प्रेम आता वाढताना दिसतंय. नारायण राणेंचं मात्र भाजपवर एकतर्फी प्रेम बघायला मिळतंय.
एकतर्फी प्रेम वगैरे काही नाही. सगळ्यांशीच वाईटपणा घेण्यापेक्षा कोणीतरी मित्र असावा म्हणून मी भाजपशी जुळवून घेतलय. मी भाजपचा सहयोगी पक्ष म्हणून राहणार
स्वाभिमान पक्षाकडून तुम्ही उमेदवार उभे करताय. भाजपच्या विरोधात तुम्ही उमेदवार देणार?
शक्यतो नाही! बहुतांश उमेदवार शिवसेनेच्या विरोधात असतील.
स्वाभिमान पक्षाला भाजपकडून शिवसेनेच्या विरोधात वापरलं जातय?
असं नाहीये. आता निवडणुकीत प्रचार सुरू झाला की सर्वांच्याच विरोधात बोललं जाईल. फक्त शिवसेनाच टार्गेट आहे असं नाही कॉंग्रेस, राष्ट्रवादीवरही बोललं जाईल.

फोटो स्रोत, NArayan Rane/Twitter
मग भाजप तुमचं टार्गेट नसेल?
भाजप टार्गेट नसेल. सरकारवर टीका करणार नाही असं नाही सरकारवर पण टीका राहील. जिथं कामं झाली नाहीत, जी आश्नासनं दिली पूर्ण झाली नाहीत त्यावर टीका राहील.
देवेंद्र फडणवीस सरकारच्या कामावर तुम्ही खूश आहात?
खूश जरी नसलो तरी नाराजही नाही. काही गोष्टी झालेल्या नाहीत. राज्य आर्थिक संकटात आहे. राज्य दिवळखोरीत जायला नको हे मी वारंवार त्यांना सांगितलंय. याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहीजे. कोकणातले जे प्रकल्प जाहीर केले होते ते प्रकल्प सुरू झालेले नाहीत.
कोकणातले पाटबंधारे प्रकल्प बंद आहेत. शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न वार्यावर सोडला तर आम्ही सहन करणार नाही. उध्दव ठाकरे मराठ्यांशी ज्या पद्धतीने वागलेत त्याची किंमत त्यांना चुकवावी लागेल.

उध्दव ठाकरेंना अचानक सरकारची चांगली कामं दिसायला लागली आहेत. कसं बघता याकडे?
यूटर्न..! उद्धव ठाकरेंना नेहमीच युटर्न घेण्याची सवय आहे. आधी बोलायचे कामं होत नाहीत आता अचानक कामं दिसायला लागली कारण निवडणुका आहेत. पण लोकं शहाणी आहेत. त्यांच्या सर्व लक्षात असतं.
नाणार प्रकल्प रद्द झाल्याचं क्रेडिट शिवसेना घेतय. तुम्हीही मुख्यमंत्र्यांना भेटला होतात?
उध्दव ठाकरे तिथे गेले त्यांना कोणी विचारलं का? लोकं नाराज आहेत. हा प्रकल्प शिवसेनेनेच आणला. त्यांचे मंत्री आनंद गिते आणि खासदार विनायक राऊत यांनी आणला. त्यांनी नोटीफीकेशन काढलं. जागा त्यांनी संपादित केली. उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी सर्व परवानग्या दिल्या. जर हे पापच यांचं होतं तर पुढे नाचायचं काय कारण आहे. नाचून दाखवायचं हे आम्हीच केलं म्हणून....
नाणार प्रकल्प रोह्यामध्ये होणार आहे, या प्रकल्पाला तिथेही तुमचा विरोध असेल का?
तिकडच्या स्थानिक लोकांचा विरोध नसेल तर मी कोण होतो विरोध करणारा... मला तिकडच्या स्थानिक लोकांशी बोलांवं लागेल. रत्नागिरीत लोकांच्या जमिनी जात होत्या. लोक उद्ध्वस्त होत होते.

फोटो स्रोत, Twitter
नारायण राणे भविष्यात खासदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात दिसणार का?
खासदारकीचा राजीनामा मी अजिबात देणार नाही. मी महाराष्ट्रात दिसणार पण खासदारही असणार.
भविष्यात जर नारायण राणेंना आघाडीनं पाठींबा दिला तर तुम्ही घेणार का?
पाठिंबा दिला तर कोण नाही घेणार.. कुठल्या एका उमेदवारासाठी पाठिंबा दिला तर घेणार.. सर्वांची मदत घेणार
शिवसेना भाजप युतीनंतर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात. भाजपचे सहयोगी म्हणून त्यांनी तुमच्या बरोबर राहण्याचा विश्वास दिला आहे का?
सहकार्य करणार हे त्यांचं पहिल्यापासून आश्वासनं आहे. माझ्याबाबतीत तरी या आश्वासनात बदल घडणार नाही. हा विश्वास मला वाटतो.
तुम्ही भाजपच्या जाहीरनामा समितीवर आहात. तुम्ही दुसरीकडे म्हणताय की सरकारवर मी टीका करणार हा बॅलेन्स कसा करणार?
हा बॅलेन्स मी योग्यरितीने करेन. मी त्यांना सांगितलंय की जिथे मला पटत नाही तिथे मी बोलणार.
निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील.
राज्याच्या विकासकामांवर माझा भर राहील. शेतकरी, कामगार आणि शिक्षण या विषयावर माझा भर राहील.
नितेश राणे हे अजूनही कॉंग्रेसमध्ये आहेत?
योग्यवेळी ते राजीनामा देऊन आमच्या पक्षात प्रवेश करतील आणि स्वाभिमानमधूनच निवडणूक लढवतील.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








