You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शरद त्रिपाठी..ज्यांनी आमदार राकेश बघेल यांना बुटानं मारहाण केली
भारतीय जनता पक्षाचे खासदार शरद त्रिपाठी आणि आमदार राकेश सिंह बघेल यांच्यात बुटानं झालेली हाणामारी देशभरात चर्चेचा विषय बनली आहे. त्यांच्या हाणामारीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. आणि राजकीय वर्तुळात यावरून भाजपला चिमटेही घेतले जात आहेत.
जिल्ह्याच्या विकासकामांच्या उद्घाटन आणि कोनशिला समारंभाच्या कार्यक्रमात त्यांचं नाव डावललं जात असल्याची खासदार शरद त्रिपाठी यांची तक्रार होती.
त्रिपाठींच्या तक्रारीवर आक्षेप घेत मेहंदावलचे भाजप आमदार राकेश बघेल यांनी त्यांना बुटानं मारण्याची धमकी दिली. पण त्यानंतर काही कळण्याच्या आत खासदार शरद त्रिपाठी यांनी बूट काढून राकेश बघेल यांना मारहाण केली. यानंतर राकेश बघेल यांनीही त्रिपाठींवर हात साफ केले.
यावेळी दोन्ही नेत्यांनी शिवीगाळ आणि आक्षेपार्ह भाषेचा भरपूर वापर केला.
आणि हा सगळा तमाशा उत्तर प्रदेशचे जिल्हामंत्री आशुतोष टंडन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर झाला. पण या सगळ्या घटनेनंतर एक प्रश्न विचारला जातोय तो म्हणजे मर्यादा खुंटीला टांगणारे हे खासदार आणि आमदार नेमके आहेत तरी कोण?
उद्योजक असलेले खासदार त्रिपाठी
उत्तर प्रदेशच्या संतकबीरनगरचे खासदार असलेले शरद त्रिपाठी पेशानं उद्योजक आहे.
निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार शरद त्रिपाठी यांच्यावर कुठल्याही गुन्ह्याची नोंद नाहीए.
प्रतिज्ञापत्रातील माहितीनुसार ते हर्बल प्रॉडक्ट्सचा व्यवसाय करतात. त्यांची पत्नी गृहिणी आहे.
त्यांनी कानपूर विद्यापीठातून प्राचीन इतिहास विषयात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं आहे.
त्रिपाठी यांच्याकडे 1 लाख रुपये किंमतीची रिव्हॉल्वर आहे. तसंच 20 हजाराची एक बंदूकही आहे.
2014च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांनी 2013-14 या आर्थिक वर्षात आपलं उत्पन्न 2 लाख 26 हजार 960 रुपये असल्याचं म्हटलं होतं.
त्रिपाठी यांच्या परिवारात पत्नीसह आणखी चार जण त्यांच्यावर अवलंबून आहेत. 2014च्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना त्यांच्याकडे 55 हजार रुपये तर त्यांच्या पत्नीकडे 15 हजार रुपये इतकी रोकड होती.
प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे शेतजमीन नाहीए. आणि त्यांना पूर्वजांकडून कुठलीही संपत्तीही मिळालेली नाही. पण त्यांच्याकडे लखनौमध्ये 1796 चौरस मीटरचा प्लॉट आहे.
2014पर्यंत त्यांच्यावर कुठलंही कर्ज नसल्याचं त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केलंय.
त्रिपाठी यांच्याकडे 340ग्राम सोन्याचे दागिने आहेत. ज्याची किंमत 10 लाख रुपये आहे. याशिवाय 900ग्राम चांदीचे दागिने आहेत, ज्याची किंमत 40 हजार रुपये आहे.
बघेल यांच्यावर याआधीही आरोप
उत्तर प्रदेशच्या मेंहदावालमधून आमदार असलेल्या राकेश सिंह बघेल यांच्यावर आधीच गुन्हेगारी खटले दाखल आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर बेघल यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर 10 कलमांअंतर्गत गुन्हे दाखल आहेत. ज्यातील काही गुन्हे गंभीर स्वरूपाचे आहेत.
50 वर्षाच्या बघेल यांच्यावर दंगलीत हात असणं, सरकारी अधिकाऱ्यांना कामात अडथळा आणण्यासारखे गुन्हे दाखल आहेत.
बघेल शेतीच्या क्षेत्राशी निगडीत आहेत. आणि आपल्या परिवारासोबत मिळून ते काम करतात. त्यांची पत्नी गृहिणी आहे. त्यांच्याकडे 3 कोटींहून अधिकची संपत्ती आहे.
राकेश सिंह बघेल यांनी सिव्हिल इंजीनियरिंगमध्ये डिप्लोमा केला आहे. शेती क्षेत्रात काम करणाऱ्या बघेल यांच्याकडे शेतजमीन नाहीए हे विशेष. पण गोरखपूर जिल्ह्यात त्यांच्या मालकीचं 2 कोटी 89 लाखाचं घर आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)