You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मोदी सरकारच्या काळात तिप्पट रस्तेबांधणी झालीये का? : बीबीसी रिअॅलिटी चेक
- Author, सलमान रावी
- Role, बीबीसी प्रतिनिधी
दावा : विद्यमान सरकारने दावा केला आहे की आधीच्या सरकारच्या तुलनेत त्यांच्या काळात तिप्पट रस्ते बांधले गेले आहेत.
सत्य परिस्थिती : या सरकारच्या कार्यकाळात रस्तेबांधणीत वाढ झाली आहे. मात्र तिप्पट नक्कीच नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये विधान केलं होतं की त्यांच्या कार्यकाळात आतापर्यंत सगळ्यांत जास्त रस्ते तयार झाले आहेत.
"आजच्या घडीला रस्त्याची जी कामं होत आहे ती मागच्या सरकारच्या तिप्पट आहेत," असं ते म्हणाले.
भारतात रस्त्यांचं विस्तृत जाळं पसरलं आहे. सध्या भारतात 50 दक्षलक्ष किमीचे रस्ते आहेत.
भारतात तीन प्रकारचे रस्ते आहेत.
- राष्ट्रीय महामार्ग
- राज्य महामार्ग
- ग्रामीण मार्ग
भारताला 1947 साली जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा रस्त्यांची लांबी 21,378 किमी होती. 2018 मध्ये हा आकडा 1,29,709 किमी इतका झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग केंद्र सरकारतर्फे बांधले जातात. त्यांना निधीही केंद्र सरकार पुरवतं. दिल्लीत आणि राज्यांमध्ये मात्र महामार्ग राज्य सरकारतर्फे बांधले जातात.
ग्रामीण भागातील रस्ते केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाच्या अखत्यारित येतात.
बांधकामाचा खर्च वाढला
गेल्या दशकातील शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार 2014 पासून म्हणजेच भाजप सत्तेत आल्यापासून रस्त्यांच्या बांधणीत कमालीची वाढ झाली आहे.
2013-14 साली काँग्रेस सरकारने 4,260 किमीचे राष्ट्रीय महामार्ग बांधले होते.
2017-18 या काळात विद्यमान भाजप सरकारने 9,289 किमी लांबीचे रस्ते बांधले आहेत. 2013-14 च्या आकड्यांपेक्षा हा आकडा दुपटीपेक्षा जास्त आहे.
डिसेंबर 2018 मध्ये झालेल्या एका परीक्षणात रस्तेबांधणीचे 300 प्रकल्प 2019च्या शेवटपर्यंत पूर्ण होतील.
राष्ट्रीय महामार्ग बांधण्यासाठी विद्यमान सरकारने अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद केली आहे.
रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मते रस्ते आणि महामार्ग ही देशाची संपत्ती आहे.
त्यांच्या प्रयत्नांची काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही स्तुती केली आहे.
ग्रामीण भागातील रस्तेबांधणी
ग्रामीण भागातील रस्त्यांची लांबी वाढवण्याची योजना तत्कालीन NDA सरकारने आखली होती. ही योजना 2000 सालातील आहे. गेल्यावर्षी मे महिन्यात भाजप सरकारने म्हटलं की 2016-17 मध्ये 47,000 किमीपेक्षा जास्त लांबीचे रस्ते बांधले गेले आहेत.
"2016-17 या काळात ग्रामीण भागात झालेलं रस्त्याचं बांधकाम मोदी सरकारच्या कार्यकाळात झालेलं सगळ्यांत जास्त बांधकाम होतं," असं भाजपतर्फे सांगण्यात येतं.
मात्र गेल्या दशकातील आकडेवारीवर एक नजर टाकल्यास असं लक्षात येतं की 60,017 किमीचे रस्ते बांधले गेलेत. तेव्हा काँग्रेस सत्तेत होती.
भाजप सत्तेवर आल्यापासून ग्रामीण भागातील विशेषत: दुर्गम भागातील रस्तेबांधणीच्या तरतुदीत प्रत्येक आर्थिक वर्षात वाढ झाली आहे.
डिसेंबर 2018 मध्ये आलेल्या अहवालानुसार जागतिक बँक रस्त्यांच्या बांधणीसाठी मदत करत आहे. त्यांच्या मते ही प्रगती समाधानकारक आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)