शरद पवारः पराभवाच्या भीतीमुळं भाजपकडून जवानांच्या शौर्याचंही राजकारण

फोटो स्रोत, Getty Images
देशाच्या जवानांमुळं जगात भारताची प्रतिष्ठा वाढली. पण दुर्दैवानं भाजपनं याचंही राजकारण केलं आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. नाशिक येथे आयोजित केलेल्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
बालाकोट इथं भारतीय वायुदलानं केलेल्या हवाई हल्ल्यात 250 कट्टरपंथीय ठार झाले असं विधान भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी गुजरातमधील एका कार्यक्रमात बोलताना केलं होतं. शरद पवार यांनी अमित शहांच्या या वक्तव्याचाही समाचार घेतला.
राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये जे झालं, त्याचीच पुनरावृत्ती लोकसभेत होणार असल्याचं जाणवल्यानं आता जवानांच्या शौर्याचंही राजकारण केलं जात आहे, असं पवार यांनी म्हटलं.
संकट आल्यावर आम्ही एक आहोत असं सांगून नंतर त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याची किंमत तुम्हाला मोजावी लागेल, असा इशाराही शरद पवार यांनी भाजपला दिला.
सत्तेचा गैरवापर करून सत्ता राखायची हेच या सरकारचं धोरण असल्याचं पवार यांनी म्हटलं. शरद पवार यांनी मेळाव्यात बोलताना म्हटलं, की आपल्याला निवडणूक आयोगावर शंका नाही मात्र राज्य आणि केंद्र सरकारच्या निवडणूक यंत्रणेवर विश्वास नाही. आपला पराभव होणार याची जाणीव असल्यानं सत्ताधारी रडीचा डाव खेळणार, सत्तेचा दुरुपयोग करणार. त्यामुळेच तुम्ही जागरूक रहा, अशी सूचना पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना केली.
कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक

"पूर्वीच्या सरकारनं काहीच काम केलं नाही, असा आरोप चुकीचा आहे. मी कृषीमंत्री असताना जेव्हा शेतकरी आत्महत्या झाल्या, तेव्हा मला दोन दिवस झोप लागली नाही. त्यानंतर मी माहिती घेत दहा दिवसांत 71 हजार कोटींची कर्जमाफी केली," असं शरद पवार यांनी सांगितलं. मोदी सरकारनं कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला.
"आमच्या काळात रोजगार हमी योजनेवर शेतकऱ्याला 300-350 रूपये मिळायचे. या सरकारनं 16-17 रुपये हातावर टेकवले. शेतमालाला भाव नाहीये. संपूर्ण कृषी अर्थव्यवस्था खड्ड्यात गेली आहे."
रफालची मूळ किंमत 530 कोटी
मनमोहन सिंह सरकारच्या काळात रफालची निवड करण्यात आली होती. यावेळेस या विमानांची किंमत 530 कोटी रुपये होती. आज हेच विमान 1600 कोटी रुपयांना घेण्यात येत आहे, असं सांगून शरद पवार यांनी रफालच्या व्यवहारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.
पाकिस्तानचा भूगोल बदलला
पंतप्रधान सतत एका परिवारावर टीका करतात. जे काही वाईट झालं, ते याच परिवारामुळं असं म्हणतात. पंतप्रधानांनी माजी पंतप्रधानांवर अशी टीका करणं योग्य नाही, असं पवारांनी म्हटलं.
"पाकिस्तानने जेव्हा आगळीक केली, तेव्हा इंदिरा गांधींनी कणखरता दाखवली. त्यांनी पाकिस्तानचा भूगोल बदलला. पाकिस्तानचे दोन देश झाले. इंदिरा गांधींना अटलबिहारी वाजपेयींनी 'दुर्गा' म्हटलं होतं. याची आठवण कोणीतरी पंतप्रधानांना करून द्यायला हवी."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








