'महामुलाखत' : शरद पवारांच्या या 8 विधानांचे राजकीय अर्थ काय?

फोटो स्रोत, Twitter / @PawarSpeaks
- Author, निरंजन छानवाल आणि रवींद्र मांजरेकर
- Role, बीबीसी मराठी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात प्रदीर्घ मुलाखत घेतली. जागतिक मराठी अकादमीनं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शरद पवारांनी अनेक महत्त्वाची राजकीय विधानं केली. पाहूयात यांतली 8 विधानं आणि त्या विधानांचे राजकीय अर्थ.
1. कोण पाय खेचतो?
'दिल्लीत मराठी नेतृत्व पुढे जाऊ नये म्हणून काही घटक काम करतात.' - शरद पवार
"दिल्लीच्या राजकारणात दरबारी हुजऱ्यांवर विश्वास ठेवून निर्णय होतात, हे त्यांनी पुन्हा अधोरेखित केलं. विशिष्ट लॉबीकडून देशाच्या इतर भागातलं नेतृत्व पुढे येऊ नये म्हणून काय केलं जातं, याचा तपशील त्यांनी दिला." - प्रकाश अकोलकर, राजकीय संपादक, सकाळ माध्यमसमूह
2. पंतप्रधान व्हायचंय?
'राष्ट्राचा विचार प्रथम करतो, राज्याचा विचार नंतर. महाराष्ट्र व्यवस्थित ठेवायचा असेल तर दिल्ली हातात पाहिजे.'- शरद पवार
"पवारांना व्यक्तिश: दिल्लीच्या राजकारणात रस आहेच. पंतप्रधानपदाबद्दलच्या प्रश्नावर त्यांनी मौन बाळगून स्वप्नं कायम आहे, याला दुजोरा दिला." - सुरेश भटेवरा, संपादक, लोकमत, दिल्ली
3. अडचणीचं सत्य
'राजकारणात खरं बोललेलं कुणाला अडचणीचं असेल तर कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे.' - शरद पवार
"आता त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचे विचार अधिक परिपक्व होत असल्याचं लक्षात येतं." - प्रकाश अकोलकर, राजकीय संपादक, सकाळ माध्यमसमूह.
4. राहुल गांधींची स्तुती?
'राहुल गांधी शिकत आहेत. या तरुणाची शिकण्याची तयारी आहे.' - शरद पवार
"राष्ट्रवादी पक्ष काँग्रेससोबत जाणार हे स्पष्टच आहे. आघाडीचं सरकार येईल आणि त्याचं नेतृत्व मोठा पक्ष म्हणून काँग्रेसनं करावं, असं त्यांनी सूचित केलं आहे." - सुरेश भटेवरा, संपादक, लोकमत, दिल्ली

फोटो स्रोत, Twitter
5. मोदींना टोला?
'गुजरातचा अभिमान (मोदींनी) जरूर ठेवावा, पण तुम्ही देशाचे प्रमुख आहात हे लक्षात ठेवा.' - शरद पवार
"हा पंतप्रधानांना टोला आहे. पवारांनी सुसंस्कृत राजकारणाचे दाखले देत, सध्याच्या पंतप्रधानांमध्ये सगळ्यांना एकत्र घेऊन सौहार्दाचं राजकारण करण्याचा वकूबच नाही, असा सूर लावला." -सुरेश भटेवरा, संपादक, लोकमत, दिल्ली
6. शिवाजी की आंबेडकर?
'महाराष्ट्र शिवाजी महाराजांचाच आहे. पण शाहू-फुले-आंबेडकर समाजाला एकसंध करण्यासाठी लढले.'
"महाराष्ट्रातील बहुजन समाजाचं हिंदुत्वीकरण केलं जात आहे. समाजात फूट पडू नये असं शरद पवारांना प्रामाणिकपणे वाटतं. त्यांचं प्रत्यक्ष राजकारण काहीही असेल, पण त्यांना हे म्हणायचं आहे. भाजप जे दलित व मुस्लीमविरोधी राजकारण करत आहे, त्याविरोधात माझी भूमिका आहे, असं शरद पवारांना म्हणायचं असावं." - हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार

फोटो स्रोत, Facebook
7. जातीय आरक्षण नको?
'जातीय आरक्षण नको, आर्थिक निकषांवर आरक्षण हवं.' - शरद पवार
"आंबेडकरांनी वंचितांना आरक्षण मिळवून दिलं. शरद पवारांची ही भूमिका त्यांच्या विरोधात जाते. मराठा आरक्षणावरून महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. मराठ्यांनाही बरोबर घ्यायचं आणि दलित-मुस्लीम मागासवर्गीय हेसुद्धा आपलेच आहेत, अशा प्रकारचं शरद पवारांची 'सर्वसमावेशक' भूमिका आहे." - हेमंत देसाई, ज्येष्ठ पत्रकार
8. विदर्भाचं काय?
'वेगळा विदर्भ हे अमराठी नेतृत्वाचं स्वप्न आहे. सामान्य जनतेला वेगळा विदर्भ नको.' - शरद पवार
"लोकांचा विदर्भाला पाठिंबा नाही. पण काही लोकांच्या राजकीय अकांक्षेपोटी हे सर्व चाललेलं आहे ही पवारांची भूमिका आहे. लोकांची इच्छा असेल तर आमची वेगळ्या विदर्भाला काही हरकत नाही, असंही पवार म्हणतात." - प्रताप आसबे, ज्येष्ठ पत्रकार.
हे वाचलं का?
हे पाहिलं आहे का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)









