पुलवामा : CRPF ताफ्यावर हल्ला करणारा आदिल अहमद कोण?

पुलवामा हल्लेखोर

फोटो स्रोत, VIDEO GRAB

काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या एका आत्मघातकी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 जवानांचा मृत्यू झाला आहे.

या हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद संघटनेनं घेतली आहे.

काही माध्यमांच्या वृत्तानुसार या आत्मघातकी हल्ल्याला 21 वर्षाचा आदिल अहमद जबाबदार असल्याचं म्हटलं जातंय.

आत्मघातकी हल्ला जिथं झाला ती जागा राजधानी श्रीनगरपासून दक्षिणेला जवळपास 25 किलोमीटर दूर आहे. तर आदिलच्या घरापासून ही जागा केवळ 15 किलोमीटर दूर आहे.

गुरुवारी स्फोटकांनी भरलेल्या एका स्कॉर्पिओ कारनं सीआरपीएफ जवानांच्या तुकडीती एका बसला धडक दिली. या कारमध्ये 350 किलो स्फोटकं होती, असं म्हटलं जातंय. प्रत्यक्षदर्शींच्या मते हा स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की काही किलोमीटर दूरपर्यंत लोकांना तो ऐकू गेला.

आत्मघाती हल्ला

1998 च्या कारगिल युद्धानंतर जैश ए मोहम्मद आणि लष्कर ए तोयबाने अनेक ठिकाणी आत्मघातकी हल्ले केलेत.

पण आतापर्यंत असे हल्ले करणारे पाकिस्तानी नागरिक असायचे. ही पहिलीच वेळ आहे जेव्हा स्थानिक असलेल्या आदिल उर्फ वकास कमांडोने आत्मघातकी हल्ला केल्याचा दावा जैश ए मोहम्मदनं केला आहे.

4 जानेवारी रोजी अवंतीपुरा येथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन कट्टरवादी मारले गेले होते.

फोटो स्रोत, AFP

फोटो कॅप्शन, 4 जानेवारी रोजी अवंतीपुरा येथे सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन कट्टरवादी मारले गेले होते.

हा हल्ला इतका शक्तीशाली होता की काही क्षणात बस एका लोखंडी सांगाड्यासारखी दिसू लागली. या बसमधून जवळपास 44 सीआरपीएफ जवान प्रवास करत होते.

आदिलचे वडील गुलाम हसन डार कपड्यांच्या विक्रीचं काम करतात. सायकलवर फिरून ते हा व्यवसाय करतात. आदिलशिवाय त्यांच्या परिवारात दोन भाऊ आणि आईसुद्धा आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात आदिल जैश ए मोहम्मद संघटनेत भरती झाला. यावेळी तो बारावीत शिकत होता.

दक्षिण काश्मीरात कट्टरवाद्यांच्या विरोधात सुरक्षा यंत्रणांनी मोहीम उघडली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार 2018 मध्ये काश्मिरात सुरक्षा यंत्रणांनी 250 कट्टरवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

मात्र तरीही काश्मीर खोऱ्यात अजून 240 कट्टरवादी सक्रीय असल्याचा दावा भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांनी केल होता.

आदिलचा भाऊसुद्धा जैशमध्येच

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार आदिलचा चुलतभाऊ समीर अहमदसुद्धा कट्टरवादी आहे आणि आदिल जैशमध्ये सामील झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी समीरसुद्धा जैशमध्ये सामील झाला होता.

समीर काश्मीर विद्यापीठात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेत होता. मात्र ते अर्धवट सोडून त्यानं कट्टरवादी संघटनेत प्रवेश केला.

कालच्या हल्ल्यानंतर आदिलचं मूळ गाव अर्थात गुंडीबागमध्ये तीन वेळा 'नमाज ए जनाजा' प्रार्थना करण्यात आली. यावेळी इथं मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. आत्मघातकी हल्ल्याआधी आदिलनं एक व्हीडिओसुद्धा बनवला होता.

ज्यात त्यानं आत्मघातकी हल्ला करण्याची माहिती दिली होती. याशिवाय आदिल अहमदचा एक फोटोसुद्धा समोर आला आहे. त्या व्हीडिओत तो स्वत:ला जैश ए मोहम्मदचा कमांडर असल्याचं सांगतोय.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)