पुलवामा हल्ला : CRPF विषयी या 5 महत्त्वाच्या गोष्टी माहीत आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
गुरूवारी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जहालवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात CRPFचे 34 जवान ठार झाले आहेत.
पुलवामा जिल्ह्यातल्या श्रीनगर-जम्मू महामार्गावर जहालवाद्यांनी IEDचा स्फोट घडवत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) जवानांच्या बसला लक्ष्य केलं.
CRPFचे हे जवान 76 बटालियनचे होते. CRPF (ऑपरेशन)चे महासंचालक झुल्फिकार हसन यांनी सांगितलं, "जवानांच्या ताफ्यात एकूण 70 गाड्या होत्या. यातील एका बसवर हल्ला झाला. जवानांचा ताफा जम्मूहून श्रीनगरला चालला होता. ज्या बसवर हल्ला झाला त्यामध्ये एकूण 39 जवान होते."
सहसा प्रत्येक ताफ्यात 1 हजार जवान असतात. मात्र यावेळी सुमार अडीच हजार जवान प्रवास करत होते. या ताफ्यात रस्ते मोकळे करणारं पथक होतं. तसंच बुलेट-प्रूफ वाहनंही होती.
1. CRPF म्हणजे काय?
देशाअंतर्गत सुरक्षा पुरवणारं CRPF हे देशातले सर्वांत मोठं केंद्रीय सुरक्षा दल आहे. देशात जेव्हा जहालवादी किंवा नक्षलवादी हल्ले होतात तेव्हा CRPFचे जवान ठार झाल्याचं वृत्त येतं.
"CRPFचे जवान हे अतिसंवेदनशील भागात राज्य पोलीस दलासोबत सगळ्यांत पुढं राहून कारवाई करतात. त्यामुळे त्यांचं काम सर्वांत जोखमीचं असतं आणि त्यांच्या जीवाला जास्त धोका असतो," असं बीबीसीचे सुरक्षा विषयक पत्रकार जुगल पुरोहित यांनी सांगितलं.
2. CRPFची स्थापना कधी झाली?
देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी 1939 साली केंद्रीय राखीव पोलीस दल स्थापन करण्यात आलं. तर 10 वर्षांनंतर डिसेंबर 1949 मध्ये CRPF कायदा करण्यात आला. CRPFला 79 वर्षं पूर्ण झाली आहेत. 246 बटालियन सहित CRPF ही देशांतर्गत सुरक्षा पुरवणारी ही एक महत्त्वाची संस्था आहे.
3. CRPF काय काम करतं?
राज्य पोलीस दलासोबत देशाला अंतर्गत सुरक्षा पुरवणं ही CRPFची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
राज्य पोलीस दलासोबत नक्षलविरोधी कारवाया पार पाडणं, जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्यासोबत अंतर्गत सुरक्षा पुरवणं, दंगलविरोधी कारवायात सहभाग घेणं, निवडणुका, व्हीआयपी व्यक्तींना सुरक्षा पूरवणं, UNच्या शांतता अभियानात सहभाग, नैसर्गिक आपत्तीच्यावेळी व्यवस्थापन अशी कर्तव्यं CRPF कडून चोख पार पाडली जातात.

फोटो स्रोत, Getty Images
सध्या महाराष्ट्रातल्या गडचिरोली, छत्तीसगड, झारखंड याठिकाणी नक्षलवादविरोधी अभियानात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान तैनात आहेत. नक्षलग्रस्त भागात गमिनीकाव्याद्वारे कारवाया पार पाडण्यात CRPF अग्रेसर आहे.
4. संस्थानांच्या विलीनीकरणावेळी शांतता प्रस्थापित करण्यात सहभाग
स्वातंत्र्यानंतर भारतात संस्थानांच्या विलीनीकरणासाठी आणि त्यावेळी उसळलेल्या दंगली रोखण्यात CRPFच्या जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
पंजाबमधल्या खलिस्तानी चळवळीच्या कारवाया CRPFच्या जवानांनी उधळवून लावल्या आहेत. 2001मध्ये संसदेवर झालेला हल्ल्याचा CRPFच्या जवानांनी बिमोड केला होता.
गेल्या 5 वर्षांत CRPFच्या जवानांनी 715 जहालवादी आणि नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. 10,626 जणांना ताब्यात घेतलं, तर 1994 नक्षलवाद्यांना शरण येण्यास भाग पाडलं, अशी माहिती CRPFच्या वेबसाईटवर दिली आहे.
5. CRPF जवान सतत तणावग्रस्त क्षेत्रात तैनात असतात का?
"भारतीय सैन्य, नौदल, हवाई दलांमधल्या जवानांपेक्षा CRPF जवान सतत तणावग्रस्त क्षेत्रात तैनात असतात. नौदल, हवाईदल किंवा पायदळामधील जवान जेव्हा ऑपरेशन्समध्ये सहभाग घेतात त्यानंतर त्यांना कमी जोखमीच्या भागात तैनात केलं जातं. पण CRPF जवांनाच्याबाबत तसं सहसा घडत नाही. ते सतत अतिसंवेदशील भागातच ड्यूटी करतात," असं जुगल पुरोहित सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
सतत तणावग्रस्त क्षेत्रात तैनात केल्यानं या दलातल्या जवानांच्या ट्रेनिंगकडे दुर्लक्ष होत असल्याचं, पुरोहित यांनी सांगितलं.
CRPF वर हल्ला करणारी जैश-ए-मोहम्मद संघटना काय आहे?
जैश-ए-मोहम्मद या जहालवादी संघटनेनं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. या हल्ल्यानंतर जैश-ए-मोहम्मचा प्रवक्ता मोहम्मद हसन यानं हल्ल्यानंतर एक पत्रक प्रसिद्ध केलं. यामध्ये आदिल अहमद उर्फ वकास कमांडो यांनं हा हल्ला घडवून आणल्याचं म्हटलं आहे. आदिल अहमद हा पुलवामाचाच रहिवासी आहे.
जैश-ए-मोहम्मद जहालवादी संघटनेनं याआधी जम्मू-काश्मीरमध्ये अनेक हल्ले केले आहेत. याची स्थापना फेब्रुवारी 2000मध्ये झाली आहे. त्यावेळी मौलाना मसूद अझहर हा या संघटनेचा प्रमूख होता.
डिसेंबर 1999मध्ये इंडियन एयरलाइन्सचं विमान अपहरण केल्यानंतर मसूद अझहरसहित आणखी एका जहालवाद्याची भारत सरकारला सुटका करावी लागली होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








