पुलवामाः CRPF जवानांना सुरक्षित का नेता आलं नाही?

फोटो स्रोत, Getty Images
जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या तुकडीवर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात 34 जवानांनी प्राण गमावले. तर काही जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मात्र एकाचवेळी 2500 हून अधिक जवानांना घेऊन जाणाऱ्या व्यवस्थेत काही उणिव राहिली का किंवा एखाद्या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष झाले का? याचा विचार करणं गरजेचं झालं आहे.
आता जम्मू आणि काश्मीरमधील संवेदनशील परिसरामध्ये इतक्या मोठ्या संख्येने जाणाऱ्या ताफ्यावर मोठा हल्ला होण्याच्या कारणांचा विचार केला जात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
अतिरेक्यांचं हालचालींवर लक्ष
पुलवामा येथे झालेला हल्ला पूर्ण नियोजन करून करण्यात आला असल्याचं दिसतं असं मत ले. ज. दत्तात्रय शेकटकर (निवृत्त) यांनी बीबीसी मराठीशी बोलताना मांडलं.
ले. ज. शेकटकर म्हणाले, "अशा ताफ्यामध्ये जवान बसमधून प्रवास करत असतात. या बस बुलेटप्रुफ नसतात. ज्या अर्थी जम्मूमधून निघालेल्या ताफ्यावर काश्मीरमध्ये पुलवामाजवळ हल्ला करण्यात आला याचा अर्थ ताफ्याच्या हालचालीची सर्व माहिती वेळोवेळी अतिरेक्यांकडे पोहोचत असणार. अमूक वेळेला ताफा येथे पोहोचला आहे, तमूक वेळेला ताफा या भागात आहे याची माहिती त्यांना मिळत असणार. या हल्ल्याचं नियोजनही आधी बराच काळ सुरू असणार.
आत्मघाती हल्ला करण्यासाठी गाडी मिळवणं, तो करण्यासाठी एखाद्या व्यक्तीला राजी करणं तसंच स्फोटकांसाठी रसायनं मिळवणं, इंधन मिळवणं याचं सगळं नियोजन झालं असणार. या हालचालींची थोडीही कल्पना वेळीच मिळाली असती तर धोका टाळता आला असता."

फोटो स्रोत, Reuters
"भविष्यात असे हल्ले होऊ नये म्हणून सर्व अर्धसैनिक दलांची पुन्हा नव्याने रचना करण्याची, त्यांना नवी दिशा देण्याची गरज आहे" असं मत शेकटकर यांनी मांडलं. "कालच्या हल्ल्यामध्ये एखाद्या उच्चपदस्थ अधिकाऱ्याची हलगर्जी कारणीभूत असेल तर कारवाई झाली पाहिजे", असंही ते म्हणाले.
CRPFचे माजी महासंचालक के. व्ही. मधुसुदनन यांनीही ले. ज. शेकटकर यांच्याप्रमाणेच मत मांडलं आहे.
ते म्हणतात, "अशा मोठ्या संख्येने जवानांसह ताफा जात असताना रस्ता सुरक्षित असल्याचे संकेत मिळाल्याशिवाय ताफा पुढे जात नाही. त्याचप्रमाणे रस्ता सुरक्षित असल्याच्या टीम ताफ्याच्या आधी कार्यरत असतात. पण हा रस्ता प्रवासाचा मुख्य रस्ता आहे. यावरुन बीएसएफ, लष्कराच्या तुकड्यांचाही प्रवास होत असतो. तसेच हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्ण बंद केला जाऊ शकत नाही. याचा फायदा अतिरेक्यांनी घेतला."

फोटो स्रोत, Getty Images
या हल्ल्याचं नियोजन तीन ते चार महिने सुरू असणार अशी शक्यता मधुसुदनन यांनीही व्यक्त केली. ते म्हणतात, "हल्ला करण्यासाठी अतिरेक्यांनी जी तयारी केली त्याची माहिती आधीच मिळणं अवघड असते."
रस्त्याचा मार्ग टाळता आला असता का?
CRPFच्या जवानांना रस्ते मार्गाऐवजी वायूमार्गाने का नेण्यात येत नाही यावर मधुसुदनन म्हणाले, इतक्या मोठ्या संख्येने जवानांना हवाई मार्गाने नेणं आर्थिकदृष्ट्या व अपुऱ्या संसाधनाकडे पाहाता शक्य नाही. त्याचप्रमाणे वाहतुकीच्या दृष्टीने ते व्यवस्थेवर ताण आणणारं आहे.
CRPFसह इतरही फौजा त्या परिसरामध्ये कार्यरत आहेत, त्यामुळे एका एजन्सीसाठी इतकी संसाधनं मिळत नाहीत. तसेच हवाई मार्गाचा वापर केल्यानंतर विमानतळाच्यापुढे रस्त्याचा वापर करावाच लागतो. म्हणजे रस्ता मार्ग पूर्णपणे टाळता येणार नाही."
अतिरेक्यांची माहिती मिळवणं व्यावहारिकदृष्ट्या कठिण
'अतिरेक्यांची हालचाली मिळवण्यात अपयश आलं असं सहजपणे म्हटलं जात असलं तरी ती माहिती मिळवणं म्हणजे गवताच्या गंजीतून सुई शोधण्यासारखं आहे', असं मत ब्रिगेडियर हेमंत महाजन (नि) यांनी व्यक्त केलं.
"लाखो मोबाइल दिवसभरात सुरू असतात, सोशल मीडियावर खोटी अकाऊंटस वापरून माहितीचं आदानप्रदान होत असतं तसेच आत्मघातकी व्यक्तीच्या मनातील खरा भाव समजणंही अवघड असतं. त्यामुळे या हल्ल्यांची माहिती मिळण्यात अडथळे येतात", असं महाजन म्हणाले.
पुर्वी असे ताफे जाताना सामान्य नागरिकांसाठी रस्ते बंद केले जात मात्र आता त्याला परवानगी असल्यामुळे हल्ल्याची शक्यता वाढली, जर हे हल्ले थांबवायचे असले तर राजकीय पक्ष, आपण नागरिकांनी एकत्र येऊन सुरक्षा दलांच्या पाठीमागे उभे राहाण्याची गरज आहे असं मत महाजन यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








