नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत - मुलायम सिंह यादव

समाजवादी नेते मुलायम सिंह यादव यांनी लोकसभेत भाषण करताना नरेंद्र मोदींनी पुन्हा पंतप्रधान व्हावं असं म्हटलं आहे.

16 व्या लोकसभेत बुधवारी समारोपाची भाषणं झाली. त्यावेळी बोलताना मुलायम सिंह म्हणाले," माझी मनीषा आहे की सर्व सदस्य पुन्हा निवडून यावेत. पंतप्रधान (नरेंद्र मोदी) तुम्ही पुन्हा पंतप्रधान व्हावं, अशी सदिच्छा मी व्यक्त करतो."

मुलायम सिंह यादव त्यांच्या भाषणात म्हणाले, "माझी अशी इच्छा आहे की या ठिकाणी जितके सदस्य आहेत ते पुन्हा निवडून यावेत. आम्हाला तर पूर्ण बहुमत मिळू शकत नाही तेव्हा पंतप्रधानजी तुम्ही पुन्हा एकदा पंतप्रधान व्हा."

मुलायमसिंह पुढे म्हणाले, " मी पंतप्रधानांचं अभिनंदन करतो. तुम्ही सर्वांसोबत मिळून मिसळून काम केलंय. जेव्हा जेव्हा मी तुमच्याकडे काम घेऊन आलो तुम्ही ते लगेच केलंत. मी तुमचा आदर करतो, सन्मान करतो. सर्वांना सोबत घेऊन चालण्याचा तुम्ही प्रयत्न केला आहे. "

मुलायम सिंह यांचे चिरंजीव अखिलेश यादव यांनी मायावतींसोबत युती करून उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदींना आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मुलायम यांचं हे विधान महत्त्वाचं मानलं जात आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात मुलायम सिंह यांचे आभार मानले. "मुलायम सिंह यांनी मला आशीर्वाद दिला आहे," असं मोदींनी उत्तर देताना म्हटलं.

राहुल यांची प्रतिक्रिया

मुलायम सिंह यांच्या वक्तव्याबद्दल राहुल गांधी यांना विचारलं असता ते म्हणाले की मी मुलायम यांच्याशी सहमत नाही.

गळाभेट आणि गळ्यात पडण्याचा फरक

पंतप्रधान मोदींनी भाषण करत राहुल यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले गळाभेट घेणं आणि गळ्यात पडण्याचा फरक मला पहिल्यांदा याच ठिकाणी कळला.

मोदी म्हणाले, काही लोक म्हणत होते की आम्ही भूकंप आणू पण भूकंप काही आला नाही.

राहुल गांधी यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये त्यांनी आपल्या सहकाऱ्याला डोळा मारल्याचं दिसत होतं. या घटनेच्या आधारावर मोदींनी राहुल यांच्यावर निशाणा साधला. "या सभागृहात पहिल्यांदा कळलं की आंखो की गुस्ताखियां म्हणजे काय असतं."

"पूर्ण बहुमत असलेल्या सरकारचा पूर्ण जगभर मान ठेवला जातो. जेव्हा तो नेता एखाद्या देशात जातो त्या ठिकाणी त्यांना माहीत असतं की या नेत्याकडे पूर्ण बहुमत आहे. जगभरात भारताला जी प्रतिष्ठा प्राप्त झाली ती नरेंद्र मोदी किंवा सुषमा स्वराज यामुळे नाही तर पक्षाला 2014 मध्ये पूर्ण बहुमत मिळालं म्हणून प्राप्त झाली आहे," असं मोदी म्हणाले.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)