You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दुर्गा भागवतांनी जेव्हा यशवंतरावांच्या उपस्थितीत जेव्हा आणीबाणीचा 'निषेध' केला...
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
"लेखनावर एकदा बंधन आलं की लेखन मरतं. लेखन मेलं की विचार मरतात आणि विचार मेले की संस्कृती धोक्यात येते नि विकृतीला आरंभ होतो," असं म्हणणाऱ्या दुर्गा भागवतांची आठवण साहित्य संमेलनाच्या वेळी प्रत्येक येते.
आताही अमळनेर इथे 2 ते 4 डिसेंबर दरम्यान 97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत असतानाच कराडमधल्या साहित्य संमेलनाची पुन्हा एकदा आठवण काढली जात आहे.
काय घडलं होतं त्या संमेलनात?
मराठी साहित्यात दुर्गा भागवतांच्या नावाला एक विशिष्ट वलय आहे. त्यांचं ललित लेखन असो वा संशोधकीय लिखाण दोन्ही प्रकारांना वाचक आणि समीक्षकांनी भरपूर दाद दिली. पण दुर्गाबाई म्हटलं तर एक गोष्ट प्रकर्षाने आठवते ती म्हणजे त्यांनी आणीबाणीला केलेला विरोध.
'ऐसपैस गप्पा: दुर्गाबाईंशी# या पुस्तकाच्या लेखिका प्रतिभा रानडे सांगतात की, कराडच्या साहित्य संमेलनात काय झालं याचा सविस्तर वृत्तांत दुर्गाबाईंनी मला सांगितला होता. तसंच ही गोष्ट मला त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या लोकांनी देखील सांगितली आहे. आणीबाणी म्हणून 1975ला साहित्य संमेलनाच्या निवडणुका झाल्याच नाहीत. मग साहित्य संमेलनच भरवायचं की नाही याची चर्चा सुरू झाली. जर साहित्य संमेलन झालं नाही तरी वेगळाच संदेश जाऊ शकतो म्हणून साहित्यिकांनी ते घ्यायचं ठरवलं. पण अध्यक्ष कोण राहील? शेवटी सर्वांनी एकमताने दुर्गा भागवत यांची निवड अध्यक्ष म्हणून केली आणि त्या अध्यक्ष बनल्या."
26 जून 1975 ला आणीबाणी जाहीर झाली होती आणि साहित्य संमेलन डिसेंबर 1975मध्ये होतं. संमेलनाच्या आधी काय झालं याबाबत दुर्गा भागवत यांनी त्यांच्या आठवले तसे या पुस्तकात सविस्तर सांगितले आहे.
त्या सांगतात, "आणीबाणीचे कार्य संपले तेव्हा आणीबाणी उठवण्यात यावी असं एक पत्रक साहित्यिकांतर्फे इंदिरा गांधी यांना देण्यात येणार होतं. त्या पत्रावर अंदाजे 200 साहित्यिकांनी सह्या केल्या होत्या. हे पत्र यशवंतराव चव्हाण यांना द्यावं असं ठरलं. आणीबाणी उठावी असं आम्हाला वाटत होतं, पण ती शासनाला विनंती करून नव्हे."
या निवेदनावर दुर्गाबाईंनी सही करून ते यशवंतरावांच्या हाती द्यावे अशी सूचना त्यांना साहित्य समितीतल्या लोकांनी केली.
पण त्यावर दुर्गाबाई म्हणाल्या, "हे पत्र माझ्या मांडवात माझ्या हातून अगर कुणा प्रतिनिधीच्या हातून कुणालाही दिलं जाणार नाही. तुम्ही मांडवाबाहेर त्याची जी पाठवणी असेल ती करा."
आणि त्यांनी त्यांचा शब्द पाळला. आणीबाणीविरोधातला ठराव देखील मांडण्यात आला होता.
"खरी चिंता दुर्गाबाईंना हीच होती की अध्यक्षीय भाषणात काय बोलावं. जर आपण या परिस्थिती काहीच बोललो नाही तर लोकांना काय तोंड दाखवणार अशी भीती दुर्गाबाईंना वाटत होती," असं रानडे सांगतात.
"जयप्रकाश नारायण हे आणीबाणीला प्रखरतेने विरोध करत होते. त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा म्हणून प्रार्थना करायचा निश्चय त्यांनी त्यावेळी केला," रानडे सांगतात.
"संमेलनाच्या दिवशी पु. ल. देशपांडे हे भाषण करत होते. ते साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष होते. त्यांचं भाषण ऐकून सर्वजण हसत होते. टाळ्या वाजवत होते. तितक्यात त्यांनी त्यांच्याकडून माइक घेतला आणि जयप्रकाश नारायण यांची प्रकृती बरी नाही. त्यांना आराम मिळावा म्हणून आपण सर्वांनी प्रार्थनेला उभं राहावं अशी विनंती त्यांनी प्रेक्षकांना केली. हे ऐकून सर्वजण उभे राहिले. यशवंतराव चव्हाण देखील उभे राहिले. दुर्गाबाईंनी थेट आणीबाणी हे नाव न घेता योग्य तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. अशा रीतीने त्यांनी आणीबाणीचा प्रतिकात्मक निषेध नोंदवला आणि त्यात यशवंतरावांना देखील सहभागी करून घेतलं," रानडे सांगतात.
'आणीबाणी फुलासारखी झेलता आली'
पण ज्येष्ठ पत्रकार अभ्युदय रेळेकर यांनी बीबीसी मराठीला सांगितलं, "प्रार्थना संपल्यावर शांतता सर्वत्र पसरली. यशवंतराव चव्हाण यांची काय प्रतिक्रिया येईल याची आयोजकांना धास्ती वाटली, पण ते शांतपणे बसले आणि पुढील कार्यक्रम व्यवस्थितरीत्या पार पडले. यशवंतराव चव्हाण हे एक थरो जंटलमन होते. ते अतिशय सुसंस्कृत आणि व्यासंगी होते.
"प्रसंगाचं औचित्य भंग होणार नाही याची ते काळजी घेत आणि मुख्य म्हणजे जेव्हा ते राजकारण करत नसत तेव्हा एखाद्या सामान्य माणसाप्रमाणेच त्यांची वर्तणूक असे. त्यांनी त्यांच्या पदाचा किंवा उंचीचा अभिनिवेश बाळगला नाही. सर्वांबद्दल त्यांना आदर होता. म्हणूनच अशा प्रसंगात ते शांत राहिले हे त्यांचं व्यक्तिवैशिष्ट्य होते."
दोन मिनिटं मौन पाळल्यानंतर पुन्हा पु.ल. देशपांडे यांच्याकडे माइक देण्यात आला आणि नंतर दुर्गाबाई भागवत यांचं अध्यक्षीय भाषण झालं होतं. आणि पुढील सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले.
"साहित्य संमेलन पार पडलं पण आणीबाणी उठली नव्हती. त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी भाषणं केली. आणीबाणी उठावी असं त्या म्हणतच होत्या, पण त्याच बरोबर स्वातंत्र्याचं मूल्य काय हे देखील त्या सांगत होत्या," असं दुर्गा भागवत यांच्या साहित्यावर अभ्यास करणाऱ्या लेखिका मीना वैशंपायन यांनी बीबीसी मराठीला सांगितलं.
त्यावेळी निवृत्त सनदी अधिकारी ए. डी. गोरवाला हे 'ओपिनियन' नावाचं नियतकालिक चालवत असत. त्यांच्या नियतकालिकानं आणीबाणीविरोधात सातत्यपूर्ण लढा दिला होता.
त्यांच्या एका लेखाचा अनुवाद करून दुर्गाबाईंनी 1976 साली गणपती उत्सवात वाचून दाखवला. त्यानंतर लोक म्हणाले 'बाई तुम्ही आम्हाला दोन वर्षं मागे नेलेत. आता आम्हाला ओरडू द्या.' असं म्हणून श्रोत्यांनी घोषणांचा जल्लोष केला.
दुसऱ्याच दिवशी त्यांना पोलिसांनी पकडलं आणि तुरुंगात टाकलं. "मला आणीबाणी फुलासारखी झेलता आली. त्यामागे ए. डी. गोरवाला यांची प्रेरकशक्ती होती," असं दुर्गाबाईंनी गोरवाला यांच्यावर लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. (संदर्भ- भावसंचित, संपादन - मीना वैशंपायन)
जशा त्या स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दल आग्रही होत्या तितकाच त्या दुसऱ्याच्या स्वातंत्र्याचा देखील आग्रह धरत. दुसऱ्याचं म्हणणं पटो अथवा न पटो ते त्याला सांगण्याचा पूर्ण अधिकार आहे असंच त्या मानत, असं वैशंपायन सांगतात.
आज दुर्गाबाई असत्या तर...
दुर्गाबाईंचे विचार आजच्या काळातही समर्पक असल्याचं लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर सांगतात. इतकंच नाही तर आज त्यांच्यासारख्या व्यक्तीची उणीव जाणवते असं देखील ते म्हणतात.
"आजकाल डावा किंवा उजवा अशी वेगवेगळी विशेषणं असलेल्यांची बजबजपुरी आहे. जो कुणी आपलं मत मांडतो त्या व्यक्तीवर डावा किंवा उजवा ठसा मारला जातो. या सगळ्याच्या वर उठून तटस्थतेनं सामाजिक स्थितीवर भाष्य करणारा कुणीतरी पाहिजे. दुर्गाबाई तशाच होत्या. त्या उंची व्यक्तिमत्वाच्या धनी होत्या. त्यांचा नैतिक, भौतिक आणि सात्विक धाक होता," कुबेर सांगतात.
"समाजाचं नेतृत्व हे अनेक अंगांनी करावं लागत असतं. प्रज्ञा आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर समाजाचं नेतृत्व केलं आणि लोकांनी ते मान्य केलं. त्यांचं नेतृत्व लोकांनी स्वीकारण्याचं कारण म्हणजे दुर्गाबाईंची लिखाणातली मूल्य आणि जगण्यातली मूल्य समान होती. जे त्यांनी लिहिलं तेच त्या जगल्या," असं कुबेर सांगतात.
नुकत्याच झालेल्या साहित्य संमेलनात इंग्रजी साहित्यिक नयनतारा सेहगल यांना निमंत्रित करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांचं निमंत्रण रद्द करण्यात आलं.
जर दुर्गाबाई आज असत्या तर त्यांची काय प्रतिक्रिया असती असं विचारला असता कुबेर सांगतात, "त्या कडाडल्या असत्या. त्यांना डावं-उजवं पटत नव्हतं. एखाद्याचे विचार पटोत अगर न पटोत ते ऐकण्याची तयारी पाहिजे असंच त्यांना वाटत होतं. कदाचित त्या म्हटल्या असत्या नयनतारा सेहगल यांना तुम्हीच सन्मानानं बोलवलं ना? मग त्यांचं निमंत्रण रद्द का करता. आणि इतकं करूनही जर उद्घाटकाला येण्याची बंदी असती तर निश्चितच त्या स्वतःही बाहेर पडल्या असत्या.
दुर्गाबाईंचा तुरुंगवास
"1976 ते 1977 या काळात दुर्गा भागवतांना तुरुंगवास झाला. राजकीय बंदीवानाला असतात तशा सोयीसुविधा दुर्गाबाईंना नाकारण्यात आल्या. त्यांना सामान्य कैद्यांबरोबरच ठेवण्यात आलं होतं. याचा उलट दुर्गाबाईंना आनंदच झाला. त्या सांगायच्या मला त्या स्त्रियांनी गोधडी बनवायला शिकवली. तसंच याच काळात त्यांनी अभ्यास आणि लिखाण केलं. तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांनी सरकारी मानसन्मान, पुरस्कार किंवा शिष्यवृत्ती असं काही कधीही स्वीकारलं नाही," असं रानडे सांगतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)