You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी : 'मिलावटी सरकार देशासाठी सर्वांत घातक गोष्ट'
महामिलावट करुन एकत्र येणारे देशासाठी घातक आहेत, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी भाजपविरोधातील महाआघाडीवर निशाणा साधला आहे. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मोदी यांनी आज लोकसभेत भाषण केलं.
यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर घराणेशाहीचा आरोप करत गांधी कुटुंबाला लक्ष्य केलं. ते म्हणाले, "आज 1947 ते 2014 अशी तुलना करत अनेकांनी भाषणं केली. कालगणनेचे दोन भाग आहेत. ख्रिस्तपूर्व (BC) आणि ख्रिस्तोत्तर (AD). पण कालगणनेची काही जणांची व्याख्या वेगळी असावी. BC म्हणजे Before Congress आणि AD म्हणजे After Dynasty अशी त्यांची संकल्पना असावी."
इतकी वर्षे सत्तेत असूनही काँग्रेसमध्ये संवेदनशीलतेचा कसा अभाव आहे, हे सांगताना त्यांनी एका कवितेचा आधार घेतला.
"जब कभी झूठ की बस्ती में, सच को तडपते देखा है
तब मैंने अपने भीतर किसी, बच्चे को सिसकते देखा है
अपने घर की चार दिवारी में, अब लिहाफ में भी सिहरन होती है
जिस दिन से किसी को गुर्बत में, सडकों पर ठिठुरते देखा है"
ही कविता म्हणून सत्ताभोग आणि सेवायोग यांच्यात हाच फरक असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. काँग्रेसची 55 वर्षे ही सत्ताभोगाची होती आणि आमचे 55 महिने हे सेवायोगाचे आहेत, असं मोदी यांनी म्हटलं.
'तुम्ही कधी घटनात्मक संस्थांचा सन्मान केला?'
"मोदी घटनात्मक संस्थांची गळचेपी करत असल्याचा आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असाच प्रकार आहे. आणीबाणी लादली काँग्रेसनं, देशाच्या सेनाध्यक्षांना गुंड म्हटलं काँग्रेसनं आणि मोदींवर आरोप करत आहात? निवडणूक आयोग देशासाठी गौरव आहे. आम्ही त्याच्या स्वायत्तेवर घाला कसा घालू? आपली विफलता लपण्यासाठी ईव्हीएमचा आधार विरोधक घेत आहेत."
काँग्रेसच्याच माजी पंतप्रधानांनी योजना आयोगाला जोकरांचा समूह म्हटलं होतं. आणि तुम्ही संस्थांच्या संस्थांचा सन्मानाची भाषा करता? मंत्रीमंडळाचा निर्णय प्रेस कॉन्फरन्समध्ये फाडण्यामध्ये कोणता सन्मान आहे? असा सवालही मोदींनी केला.
"कलम 356 चा दुरुपयोग काँग्रेसनं किमान 100 वेळा केलाय. इंदिरा गांधींनी एकट्यांनी 50 वेळा हे कलम वापरलंय. 1959 मध्ये इंदिरा गांधी काँग्रेस अध्यक्षा असताना केरळमधलं निवडून आलेलं सरकार बरखास्त केलं होतं. मोदींकडे बोट दाखवताना चार बोटं स्वतःकडे आहेत, हे विसरू नका."
'सेनेला निःशस्त्र केलं होतं'
आमच्यावेळेसही सर्जिकल स्ट्राईक झाला होता, असं काँग्रेसनं म्हटलं. पण तुम्ही सेनेची अशी अवस्था केली होती, की सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेण्याचीही परिस्थिती नव्हती. जवानांकडे बुलेटप्रूफ जाकीटं, चांगले शूजही नव्हते. शस्त्रास्त्रांबद्दल तर मी बोलणारच नाही. तुम्ही सर्जिकल स्ट्राईकची भाषा करता? तुम्ही गेली तीस वर्षे सेनेला निःशस्त्र केलं असा गंभीर आरोप मोदींनी केला.
"सेनेला बळकटी देण्याचा विचार तुम्ही कधीच केला नाही. देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कायम संवेदनहीनता दाखवली. त्यांच्या गरजांकडे दुर्लक्ष केलं गेलं. तीस वर्षांत एकही नेक्स्ट जनरेशन फायटर प्लेन सेनेला का दिलं गेलं नाही?" असा प्रश्न मोदींनी विरोधकांना विचारला.
"तुम्ही राफेलबद्दल बोलत आहात. पण राफेलबद्दल सर्वोच्च न्यायालयानं सौद्याच्या प्रत्येक तपशील तपासले आहेत. तरीही राफेल सौदा रद्द करण्यासाठी का प्रयत्न होताहेत? कोणाच्या फायद्यासाठी हे सर्व सुरू आहे? वायूसेनेला बळकटी मिळावी अशी काँग्रेसची इच्छाच नाही."
काँग्रेसच्या कारकिर्दीत एकही संरक्षण सौदा दलालीशिवाय नाही. कोठूनतरी येणारा काका-मामाच्या माध्यमातून सौदा व्हायचा. म्हणून यांचे चेहरे उतरले आहेत, असं मोदींनी म्हटलं.
'रोजगाराच्या आकडेवारीत वाढच'
"गेल्या 55 वर्षांत रोजगाराची आकडेवारी गोळा करण्यासाठी कोणतीही निश्चित व्यवस्था नव्हती. देशात असंघटित क्षेत्रात 85 ते 90 टक्के रोजगार आहे, तर संघटित क्षेत्रात केवळ 10 ते 15 टक्के रोजगार आहे."
"सप्टेंबर 2017 पासून नोव्हेंबर 2018 पर्यंत 1 कोटी 80 लाख लोकांनी पहिल्यांदाच पीएफमध्ये पैसे टाकले. यात 60 टक्क्यांहून अधिक लोकांचं वय 28 वर्षांहून कमी. हे विना रोजगार शक्य झालं का? 2014 मध्ये देशात 65 लाख लोक नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये (NPS) रजिस्टर्ड होते. गेल्या वर्षी ही संख्या 1 कोटी 20 लाख झाली." असा दावा मोदींनी केला.
"असंघटित क्षेत्राचा विचार करताना आपण आधी ट्रान्सपोर्ट क्षेत्राचा विचार करू. गेल्या चार वर्षांत जवळपास 36 लाख ट्रक किंवा कमर्शियल वाहनांची विक्री झाली. या क्षेत्रातच गेल्या चार वर्षांत सव्वा कोटी लोकांना रोजगार मिळाला आहे. मान्यताप्राप्त हॉटेल्सच्या संख्येत 50 टक्क्यांनी वाढ झाली. पर्यटन क्षेत्रातही दीड कोटी नवीन रोजगारांची निर्मिती झाली."
"मुद्रा योजनेअंतर्गत पहिल्यांदाच कर्ज घेणाऱ्या लोकांची संख्या सव्वा चार कोटींहून अधिक झालीये. या लोकांनी काम सुरू केलंय. मात्र हे लोक रोजगाराच्या आकडेवारीत येत नाहीत. सरकारनं दोन लाख नवीन कॉमन सर्व्हिस सेंटर उघडले आहेत. यात अनेक तरूण काम करतात. हा रोजगार नाही का?"
देशात महामार्ग, एअरपोर्ट, रेल्वे स्टेशन्स बांधले जात आहेत. बांधकाम क्षेत्राचा विकास झाला आहे. यातून रोजगार मिळत नाहीत का? असा सवाल मोदींनी केला.
कर्जमाफीपेक्षाही शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर भर
शेतकऱ्यांसाठी तुम्ही किती तरतूद करत होता आणि आम्ही किती केली आहे, याची तुलना करा. तुम्ही निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून कर्जमाफीचा खेळ सुरू केला. सत्तेत असताना दहा वर्षे तुम्ही तेच करत होता. शेतकऱ्यांचं एकूण कर्ज 6 लाख कोटी रुपयांचं होतं. तुम्ही केवळ 52 हजार कोटी रुपये माफ केलंत. त्यातही 35 लाख लोक बनावट होते. हा कॅगचा रिपोर्ट होता.
आम्ही कर्जमाफीपेक्षा शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावर भर. हजारो कोटी रुपये खर्च करुन प्रलंबित राहिलेले 99 सिंचन प्रकल्प मार्गी लावले. मेगा फूड पार्क, ग्रामीण हाट बनवण्यासाठी प्रयत्न केले.
शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये देण्याचा निर्णय आम्ही अर्थसंकल्पात घेतला. 12 कोटी शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरतील. त्यांना थेट लाभ मिळेल, मध्ये कोणीही दलाल नसतील.
कर्नाटकमध्ये तुम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. त्याचा लाभ 43 लाख शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं, मात्र आतापर्यंत केवळ 60 हजार शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळाला. तुम्ही दहा दिवसांत कर्जमाफीची भाषा करता, पण राजस्थान-छत्तीसगढमध्ये अजून कागदपत्रंही तयार नाहीत.
आम्ही मत्स्यपालन, पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही विशेष योजना आणल्या.
तुम्ही प्रत्येक गोष्ट अर्धवट सोडलीत. मला त्या पूर्ण करण्यातच वेळ घालवावा लागत आहे.
महागाईशी तुमचं अतूट नातं
या सभागृहात महागाईवरही चर्चा झाली. त्यात काहीच तथ्य नाही. महागाईवर दोन गाणी प्रसिद्ध आहेत-बाकी जो बचा महंगाई मार गई आणि महंगाई डायन खाये जात है. पहिल्या गाण्याच्या वेळेस इंदिरा गांधींचं सरकार होतं आणि दुसऱ्या गाण्याच्या वेळेस रिमोट कंट्रोलवालं सरकार. महागाईशी तुमचं नातं अतूट आहे. तुमच्या काळात प्रत्येक वेळेस महागाई वाढली. गेल्या 55 वर्षांत महागाईचा दर 4 टक्क्यांच्या घरात आहे.
जीएसटीनंतर जीवनावश्यक वस्तूंवरचा कर आम्ही हटवला. तुम्ही दूधावरही कर घेत होता. आज 99 टक्के सामान 18 टक्के कर मर्यादेच्या खाली आहे. शैक्षणिक कर्जाचा व्याजदर 15 टक्क्यांवरून 11 टक्के केला. गृहकर्जातही आम्ही दिलासा दिला.
एलईडी बल्ब युपीएच्या काळात तीनशे-चारशे रुपयांना मिळायचा. आमच्या काळात केवळ 50-60 रुपयांत मिळतो. त्यामुळे वीज बिलात 50 हजार कोटी रुपयांची घट झाली. देशातील मध्यमवर्गाला यामुळे दिलासा मिळाला.
आम्ही स्टेंट स्वस्त केला. डायलिसिस आता मोफत होतं. 5 हजारांहून अधिक जनऔषधी केंद्र आम्ही सुरू केली आहेत. त्यामुळं 100 रुपयांचं औषध केवळ 30 रुपयांत मिळतं.
आयुष्यमान भारत योजना सुरु होऊन 100 दिवस झाले असतील, पण दररोज पंधरा हजारांहून अधिक गरीब लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. 11 लाख गरीबांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असल्यानं विरोधकांना धास्ती
काळा पैसा, भ्रष्टाचार संपवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तुमचे हात मात्र कोठे ना कोठे तरी अडकलेले आहेत. आमच्याकडे असं काही बॅगेज नाही. कोणाच्या उपकारावर आम्ही जगत नाही. त्यामुळंच बेनामी संपत्तीसाठी आम्ही कायदा केला. याचाच त्रास होत आहे. कुठे, किती आणि कशापद्धतीनं प्रॉपर्टी बाहेर येतीये, हे सगळ्यांनाच दिसतंय.
आम्ही भ्रष्टाचार विरोधाच्या संकल्पात मागं हटणार नाही. आव्हान खूप आहेत. पण आमचा निश्चय पक्का आहे.
परदेशातून निधी घेणाऱ्या संस्थांच्या कारभारावर आम्ही नियंत्रण आणलं. आम्ही देशातील विविध संस्थांना चिठ्ठी पाठवली. विदेशातून येणाऱ्या पैशाचा हिशोब मागितला. धाड नाही, इन्कम टॅक्स विभागाची कारवाई नाही. केवळ एक चिठ्ठी. त्यातून परदेशातून निधी घेणाऱ्या वीस हजार संस्था पुढे आल्या. त्यांना पायबंद का नाही घातला? येत्या काळात हा आकडा वाढणार आहे. आम्ही पै-पैचा हिशोब मागू
आमच्यावर आरोप, चिखलफेक होण्याचं कारण हेच आहे. एका प्रामाणिक माणसाच्या नेतृत्वात स्थापन झालेलं सरकार काय करू शकतं हे दिसल्यामुळं त्रागा होतोय.
'काँग्रेसमुक्त भारत' महात्मा गांधींची संकल्पना
55 वर्षे सत्तेत राहून काही जण इतरांना तुच्छ लेखतात. प्रत्येकाला अपमानित करणं त्यांचा स्वभाव झाला आहे. न्यायपालिका, मुख्य न्यायाधीश, आरबीआय, निवडणूक आयोग, सर्वोच्च तपास यंत्रणा आणि लोकशाहीचाच अपमान ते करत आहेत.
महात्मा गांधींना या सर्व गोष्टींची कल्पना खूप आधीच आली होती. त्यामुळंच त्यांनी काँग्रेस विसर्जित करण्याचा सल्ला दिला होता. खरं तर 'काँग्रेसमुक्त भारत' ही माझी घोषणा नाहीये तर महात्मा गांधींची आहे. महात्मा गांधींचं दीडशेवं जयंती वर्ष सुरू आहे. हे काम करूनच टाकू
जगात भारताची मान ताठ झाली
आज जागतिक व्यासपीठावर भारताचा आवाज बुलंद झाला आहे. जागतिक पातळीवर कोणताही निर्णय घेताना भारताचं मतही विचारात घेतलं जातं.
परदेशात राहणाऱ्या भारतीयांची किंमत माझ्या प्रयत्नांनंतर सर्वांनाच समजली. हे लोक आपली शक्ती आहेत.
यावर्षीचा प्रवासी भारतीय दिवस वाराणसीत पार पडला. त्याला परदेशातून आलेल्या सर्वाधिक प्रतिनिधींनी हजेरी लावली.
आज कुंभमेळ्यातही जगभरातील अनेक देशांतील प्रतिनिधींची उपस्थिती आहे.
1947 मध्ये स्वतंत्र झालेल्या इतर देशांशी तुलना केल्यास तुमचं अपयश अधोरेखित होईल. तुमच्याकडे गती, नीती आणि व्हिजन नव्हतं.
अहंकारामुळं 400 वरुन 40 पर्यंत अधोगती
काही महिन्यांपूर्वी अविश्वास प्रस्ताव आणून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. पण त्यात यश आलं नाही. लोकही हुशार असतात. म्हणूनच 2023 मध्ये तुम्हाला पुन्हा अविश्वास प्रस्ताव आणता यावा, यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. अहंकारामुळं तुम्ही 400 वरून 40 वर आलात आणि आम्ही 2 वरून इथपर्यंत पोहोचलो, हे लक्षात ठेवा.
सत्ताभोग विरुद्ध सेवाभाव
- 10 कोटींहून अधिक शौचालयं बांधली.
- 55 वर्षांत बारा कोटी गॅस कनेक्शन देण्यात आली तर आम्ही 55 महिन्यांत 13 कोटी दिली. त्यात 6 कोटी गॅस कनेक्शन उज्ज्वला योजनेतील आहेत. काम किती वेगानं होतं त्याचं हे उदाहरण आहे.
- बँकांचं राष्ट्रीयकरण केलं. पण 55 वर्षांत केवळ 50 टक्के लोकांची बँकांमध्ये खाती होती आणि आता 100 टक्के झाली आहेत.
- ज्या गतीनं गेल्या 55 महिन्यांत सरकार चाललं आहे तसं काम तुम्ही केलं असतं तर स्वातंत्र्यानंतर पहिल्या वीस वर्षांत घरोघरी वीज पोहोचली असती
- 2004,2009,2014 या तीनही वर्षी निवडणूक जाहीरनाम्यात प्रत्येक घरात वीज पोहचवण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. मात्र काम झालंच नाही. मी रात्रं-दिवस मेहनत करून 100 टक्के विद्युतीकरण करण्यासाठी झटतो आहे.
- 2014 पूर्वी तुम्ही 25 लाख घरं बनवली आणि साडे चार वर्षांत आम्ही 1 कोटी 30 लाख घरं बांधून चावी दिली. तीसुद्धा शौचालय आणि सर्व सोयींनी युक्त घरं होती.
- आधारमुळे पैसे गरीबांच्या खात्यात जमा होतात. कुठेही मध्यस्थ नाहीत. दलाल नाहीत.
- 2004,2009,2014 अशा तीन जाहीरनाम्यांमध्ये काँग्रेसनं प्रत्येक पंचायत क्षेत्रात ऑप्टिकल फायबर पोहचवण्याचं आश्वासन दिलं होतं. तुमची तीन वर्षांची व्याख्या माहित नाही. पण 2005 पासून काम सुरू करून तुम्ही 59 गावांत कनेक्टिव्हिटी दिली. आम्ही 1 लाख 16 हजार गावांत ब्रॉडबँड कनेक्टिव्हीटी दिली.
- आमची निष्ठा अटल आहे आणि हेतू शुद्ध आहे. आम्ही 24 तास देशाच्या विकासासाठी काम करण्याची चिरंतन प्रेरणा मिळवत राहू.
- मुद्रा योजनेतून आम्ही 7 लाख कोटी रुपये दिले. ज्यांच्याकडे तारण ठेवण्याची ताकद नव्हती त्यांनाही कर्ज दिलं.
काँग्रेसची 55 वर्षे सत्ताभोगाची होती आणि आमचे 55 महिने सेवा भावाचे आहेत. आमच्या कामातूनही हाच फरक दिसतो. आमच्या सरकारची ओळख पारदर्शकता, गरीबांचं हित, राष्ट्रहिताला प्राधान्य, भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई आणि वेगानं काम यांमुळं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)