डॉन रवी पुजारीला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगलमध्ये अटक

रवी पुजारी

रवी पुजारी. अंडरवर्ल्ड डॉन. मुंबईतल्या अनेक सिनेतारकांना, वकिलांना, उद्योगपतींना खंडणीसाठी फोन करुन धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हजारो किलोमीटर दूर परदेशातून पुजारीचा धमकावणारा फोन आला की अनेकांची भीतीनं गाळण उडालीय. भल्याभल्यांनी संरक्षणासाठी पोलिसांची मदतही घेतल्याचं रेकॉर्डवर आहे.

पण याच पुजारीची दहशत आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कारण अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीला अटक करण्यात आली आहे.

पश्चिम आफ्रिकेतील सेनेगलमध्ये त्याला पकडण्यात आलं आहे. रवी पुजारीवर 60 हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. आणि त्याला गजाआड करण्यासाठी पोलीस आणि भारतीय तपास संस्था प्रयत्न करत होत्या.

आफ्रिकेत जाण्याआधी रवी पुजारी ऑस्ट्रेलियातून आपली सूत्रे चालवत होता असे सांगण्यात येते.

रवी पुजारी हा ऑस्ट्रेलियन पासपोर्टच्या आधारे राहात असल्याचे सिडनी मॉर्निंग हेरल्ड या वर्तमानपत्राने स्पष्ट केले होते.

बॉलिवुड अभिनेत्यांना धमक्या

रवी पुजारीने सलमान खान, अक्षय कुमार, करण जोहर, राकेश रोशन यांच्यासारख्या बॉलीवूड अभिनेते, दिग्दर्शकांना धमकावल्यानंतर सुपरस्टार शाहरुख खानलाही धमकावलं होतं.

रवी पुजारी टोळीचे सदस्य

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2011 मध्ये रवी पुजारी टोळीच्या कलम नझीम खान आणि स्ययद शाहिद हुसेन या दोन शूटर्सना पकडण्यात आले होते.

2014 साली रवी पुजारीने शाहरुखच्या कार्यालयात फोन करून त्याचा मित्र आणि व्यवसायातील भागीदार करीम मोरानी यांनाही धमकी दिली होती.

जून 2015मध्ये बेळगाव दक्षिणचे तत्कालीन आमदार संभाजी पाटील यांना फोन करून पैशाची मागणी केल्याचे पाटील यांनी सांगितले होते.

"मी रवी पुजारी बोलत असून सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. मला पैशाची गरज आहे. मी आजवर अनेकांना मदत केली आहे," असे त्या व्यक्तीने फोनवरून सांगितल्याचे पाटील यांनी सांगितले होते.

रवी पुजारी टोळीने केलेला गुन्हा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 2009 साली खार पश्चिम येथील व्हाइट पिकॉक बुटिकवर गोळीबार झाला होता. हा गोळीबार रवी पुजारी टोळीकडून झाला असावा असे सांगण्यात येते

2017 साली पुजारी टोळीमधील नितीन गोपाळ राय आणि दिनेश नारायण राय यांना ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली होती.

पुजारी टोळीने बांधकाम व्यावसायिकाकडून धमकी देऊन 10 कोटी रूपये उकळण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती.

फोनवरून धमक्या हीच मोडस ऑपरेंडी

रवी पुजारीच्या गुन्ह्यांबद्दल मुंबईस्थित ज्येष्ठ पत्रकार रवींद्र राऊळ यांनी बीबीसीला अधिक माहिती दिली. ते म्हणाले, "फोनवरून धमकी देणं हीच रवी पुजारीची एकमेव मोडस ऑपरेंडी होती. कधीकधी भारतात असूनही मी परदेशातून बोलत आहे असे सांगून तो धमक्या देत असे. सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या गँगस्टर टोळीमध्ये राहिल्यानंतर त्याने स्वतःची टोळी तयार केली होती. पण गेली काही वर्षे तो परदेशातून धमक्या देऊन खंडणी उकळण्याचं काम करत होता. लोकांना घाबरवणं किंवा फारतर एखादी गोळी झाडणं असे प्रकार तो करत असे. हत्येचा गुन्हा झाला तर पोलीस तपास अधिक गतीने होईल यामुळे तो धमक्या, गोळी झाडणं यापलीकडे जात नसे."

सेनेगल कोठे आहे?

रवी पुजारीला अटक जेथे अटक झाली आहे तो सेनेगल देश पश्चिम आफ्रिकेत आहे.

त्याच्याशेजारी मॉरिशिआना, माली, गिनी, गिनीआ-बिसू, गांबिया हे देश आहेत.

सेनेगलची राजधानी डाकार असून हा देश फ्रेंचांची वसाहती होती. सेनेगलची अधिकारिक भाषा फ्रेंच आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)