You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भूपेन हजारिकाः 'दिल हूँ हूँ करे...' ते राजकारणापर्यंतचा आठ दशकांचा प्रवास
प्रसिद्ध गायक आणि संगीतकार भूपेन हजारिका यांना 2019 साली मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.
हजारिका मूळचे आसामचे असले तरी त्यांनी भाषांच्या पलीकडे जाऊन लोकसंगीताला व्यासपीठ मिळवून देण्याचा आयुष्यभर प्रयत्न केला. 5 नोव्हेंबर 2011 रोजी वयाच्या 86 वर्षी त्यांचं निधन मुंबईत झालं.
हजारिकांनी अनेक सिनेमांना संगीत दिलं होतं. त्यांच्या योगदानासाठी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता, जो भारतीय सिनेसृष्टीतला सगळ्यांत मोठा पुरस्कार मानला जातो.
त्यांनी नंतर राजकारणातही कार्य केलं. ते आसाम विधानसभेवर अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले होते. त्यानंतर 2004 साली त्यांनी भाजपच्या तिकिटावर गुवाहाटी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्यात ते पराभूत झाले होते.
हजारिका यांचं शिक्षण न्यूयॉर्कमधल्या कोलंबिया विद्यापीठातून झालं होतं. त्यांनी कम्युनिकेशन या विषयात PhD केलं होतं.
हजारिकांना पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेक कालाकारांनी आणि नेत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
लता मंगेशकर:
"मला आज अतिशय आनंद होतोय. जिवंत असताना मिळालं असतं तर आसामच्या लोकांना खूप खूप आवडलं असतं. मी कोलकात्त्याला त्यांच्या घरी राहिले होते. ते मला बहिणीप्रमाणे मानायचे. त्यांनी माझे 4-5 कार्यक्रम केले. अतिशय चांगली व्यक्ती होती. ते मला चांगलं समजावून सांगायचे. गाण्याचा अर्थ सांगायचे. मी त्यांचं 'दिल हूँ हूँकरे...' हे गाणं गायली होते. ते खरं तर मूळ आसामी गाणं होतं. ते सगळ्यांशी प्रमाने वागायचे."
उषा मंगेशकर:
"खूप आनंद झालाय. त्यांना आधीच भारतरत्न मिळायला हवा होता. त्यांचे माझे जवळचे संबंध होते. आम्ही भरपूर गाणी सोबत केली. ते हुषार आणि शिकलेले, पण साधे गृहस्थ होते. आसामचं लोकसंगीत त्यांच्या पद्धतीने लोकांसमोर आणलं. मला बिहू आणि इतर आसामी लोकसंगीत गायला मिळालं. ते आव्हान होतं. त्यांनी गाऊन घेतलं. आसाममधल्या गरीब लोकांनाही त्यांनी मदत केली."
पद्मजा फेणाणी:
"खूपच छान झालं. बालपणापासून त्यांना पाहात आलीये. ते युवक बिरादरीत सामूहिक गान करण्यासाठी सगळ्यांना एकत्र आणायचे. 'दिल हूँ हूँकरे...' गाण्याची आठवण येते. ते दुसऱ्या भारतरत्नाने म्हणजे लतादीदींनी गायलं आहे. ते बंगालीत अतिशय लोकप्रिय होते. घनगंभीर आवाज लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचला."
भूपेनदांनी भारतीय संगीत जगभरात पोहोचवलं, असं पंतप्रधान मोदींनी म्हटलंय.
मी माझ्या आईकडून संगीत शिकलो, असं भूपेन हजारिकांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं. "मी लहानपणापासून आदिवासींचं संगीत ऐकत मोठा झालो. माझी आई अंगाई गायची, तिथून मला गाण्याचा वारसा लाभला."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)