You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतरत्न : नानाजी देशमुख, प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिकांना पुरस्कार निवडणुकीवर डोळा ठेवून?
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, समाजसेवक आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि दिवंगत गायक भूपेन हजारिका यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
पण सोशल मीडियावरून मात्र त्याबाबत आता वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पुरस्कार देण्यात आल्याचा सूर सोशल मीडियामध्ये उमटत आहे.
आपचे नेते संजय सिंह यांनी मात्र प्रणब मुखर्जींना भारतरत्न देण्यावरून टीका केली आहे. "एकदा संघाच्या शाखेत जा आणि भारतरत्न मिळवा, भारतरत्नची थट्टा लावली आहे," असं त्यांनी ट्वीट केलं आहे.
केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रीयो यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, बंगालच्या लोकांसाठी हा फार मोठा सन्मान आहे असं मी समजतो. प्रणब मुखर्जी यांची निवड ही निवडणुकांशी जोडून पाहू नये. यात राजकारण करू नका, असं त्यांनी म्हटलं आहे.
पत्रकार अरफा शेरवानी यांनी प्रणब मुखर्जी यांना जाहीर झालेल्या पुरस्कारावर प्रश्न उपस्थित केल आहे.
"प्रणब मुखर्जींना भारतरत्न म्हणजे पश्चिम बंगालसाठीची खेळी आहे. भारतरत्न पुरस्कारांची प्रतिष्ठा इतकी कमी करण्यात आली आहे," असं पत्रकार शिवम वीज यांनी म्हटलं आहे.
प्रणब मुखर्जी यांनी ट्वीट करून हा पुरस्कार स्वीकरत असल्याचं सांगतिलं आहे. तसंच त्यांनी भारतीय जनतेचे आभार मानले आहेत.
कांशीराम आणि महात्मा फुले तसंच सावित्रीबाई फुले यांना यंदा भारतरत्न पुरस्कार दिला जाईल अशी सर्वत्र चर्चा होती. पण ती काही खरी ठरली नाही.
मोदींनी केले अभिनंदन
प्रणब मुखर्जी हे भारताचे 13 वे राष्ट्रपती होते. 11 डिसेंबर 1935 रोजी त्यांचा तत्कालीन बंगाल प्रांतातील मिराती येथे जन्म झाला. १९९१ ते १९९६ या काळामध्ये ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. परराष्ट्र, संरक्षण, अर्थ अशा विविध मंत्रालयांची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.
नानाजी देशमुख यांचे संपूर्ण नाव चंद्रिकादास अमृतराव देशमुख असे होतं. परभणी जिल्ह्यात 11 ऑक्टोबर 1916 रोजी त्यांचा जन्म झाला होता. महाराष्ट्रात जन्म झाला असला तरी त्यांचे कार्यक्षेत्र राजस्थान आणि उत्तरप्रदेशात राहिले. डॉ. हेडगेवारांच्या संपर्कात आल्यानंतर ते रा. स्व. संघाचे स्वयंसेवक झाले. 1999 साली ते राज्यसभेचे सदस्यही झाले. चित्रकूट येथे त्यांनी उभारलेल्या उपक्रमाचे विशेष कौतुक केले गेले. तेथे त्यांनी चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालयाची स्थापना केली. नानाजींचे 27 फेब्रुवारी 2010 रोजी निधन झालं.
भूपेन हजारिका सुप्रसिद्ध गायक, गीतकार आणि चित्रपट निर्माते होते. त्यांनी मुख्यत्त्वे आसामी भाषेत गाणी गायली. 8 सप्टेंबर 1926 रोजी त्यांचा तत्कालीन आसाम प्रांतातील सदिया येथे जन्म झाला होता. त्यांना पद्मश्री, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे 5 नोव्हेंबर 2011 रोजी निधन झालं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून नानाजी देशमुख आणि भूपेन हजारिका यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसंच त्यांनी प्रणब मुखर्जी यांचं अभिनंदन केलं आहे.
राहुल गांधी यांनीसुद्धा ट्विट करून प्रणब मुखर्जी यांचं अभिनंदन केलं आहे. तसंच काँग्रेस पार्टीला त्याचा गर्व असल्याचंही म्हटलं आहे.
भूपेन हजारिका यांना हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आनंद वाटत आहे, याचा अभिमान सुद्धा वाटत आहे, अशी प्रतिक्रिया लता मंगेशकर यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना दिला आहे. माझ्यासाठी ते आसामी गाणं घेऊन यायचे, अशी आठवण सुद्धा त्यांनी सांगितली.
पद्मविभूषण आणि पद्मभूषण
बाबासाहेब पुरंदरे आणि अनिलकुमार नाईक या महाराष्ट्रातल्या दोघांना यंदा पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.
तर गायिका तीजनबाई, जिबूती येथील इस्माइल ओमर ग्युएलेह यांना देखील पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
तर जॉन चेंबर्स, सुखदेवसिंग धिंडसा, प्रविण गोर्धन, महाशय धरमपाल गुलाटी, दर्शनलाल जैन, अशोक कुकडे, करिया मुंडा, बुधातिया मुखर्जी, मोहनलाल विश्वनाथ नायर, एस नंबी नायर, कुलदीप नय्यर (मरणोत्तर), बचेंद्री पाल, व्ही. के. शृंगलू, हुकुमदेव नारायण यादव यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
महाराष्ट्रातील पद्मश्री
महाराष्ट्रातील दिनार कॉन्ट्रॅक्टर, सुदाम काटे, शंकर महादेवन, डॉक्टर रवींद्र आणि स्मिता कोल्हे दाम्पत्य, शब्बीर सय्यद, नगीनदास संघवी, मनोज वायपेयी यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)