ताहिरा कश्यप: कॅन्सरशी दोन हात करताना म्हणते, 'तीच मी पण नव्या रूपात'

बॉलिवुड अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप गेल्या अनेक महिन्यांपासून ब्रेस्ट कॅन्‍सरविरोधात लढा देत आहे. तिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली होती.

ताहिराने बुधवारी इंस्टाग्राम अकाऊंटवर आपल्या डोक्याचे संपूर्ण केस कापल्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. त्यासोबत तिने या संपूर्ण प्रवासाबाबतच्या आपल्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

त्या कॅप्शनमध्ये ती लिहिते,"हॅलो, मी तीच पूर्वीची ताहिरा, पण नव्या अंदाजात, नव्या रूपात. मी एक्सटेंशन (वीग) घालून थकले आता. बिना वीगचं असणं हे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अनुभव देणारं आहे. आता शॉवर घेताना मला केस सांभाळावे लागत नाही. मी विचारदेखील केला नव्‍हता, की मी बाल्ड होईन. पण मला आता चांगले वाटत आहे.'

काही दिवसांपूर्वी सोनाली बेंद्रे हिने कॅन्सरवरील उपचारादरम्यान केस कापलेला फोटो शेअर केला होता. आता ताहिरानेही आपल्या बाल्ड लूकमधला फोटो शेअर केला आहे.

ताहिराच्या या पोस्टवर आयुष्मानने 'हॉटी' अशी कमेंट केली आहे.

त्याव्यतिरिक्त अभिनेत्री दीपिका पदुकोणनेही तिला 'हॉट' दिसत असल्याचं म्हटलं आहे. तर हृतिक रोशन आणि दिया मिर्झानेदेखील ताहिराच्या या नव्या लूकची स्तुती केली आहे.

5 जानेवारीला ताहिराने आयुष्मान खुरानासोबत एक बुमरॅंग शेअर केला होता. त्याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं होतं की, "माझ्या किमोथेरिपीचं शेवटचं सेशन पूर्ण झालं. या दरम्यान मला खूप काही शिकायला मिळालं. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आर्शीवादाबद्दल मी आभारी आहे."

'कॅन्सरबद्दल कळल्यावर तुम्ही त्याला बाहेरचा रस्ता दाखवता. पण हे अत्यंत कठीण आहे. अनेकदा आपल्याला आपल्या आतील शक्तीचा अंदाज येत नाही. माझ्या मते, आयुष्यात अनेक अडचणी येतात आणि या अडचणीचं तुम्हाला आणखी सहनशील, शक्तीशाली बनवतात.

मला स्टेज 1A कॅन्सरचं निदान झालं आहे आणि यासाठी मला १२ किमोथेरपी घ्यावा लागणार आहेत. यापैकी 6 मी घेतल्या. आणखी 6 बाकी आहेत. कॅन्सरशी लढा देण्याच्या आत्तापर्यंतच्या माझ्या प्रवासाला मी ही माझी पोस्ट समर्पित करते. अर्धा प्रवास संपला...अर्धा बाकी आहे...' असे ताहिराने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

आयुष्यमानने २०११ मध्ये ताहिरा कश्यपसोबत लग्न केलं. त्याआधी ११ वर्षांपासून दोघेही एकमेकांना डेट करत होते.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)