You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अप्सरा रेड्डी: कोण आहेत काँग्रेसच्या पहिल्या ट्रान्सजेंडर महासचिव
अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या महासचिवपदी अप्सरा रेड्डी यांची नियुक्ती केल्याची घोषणा काँग्रेसने एका ट्वीटद्वारे केली आहे. महिला काँग्रेसच्या महासचिव होणाऱ्या तसंच कुठल्याही प्रमुख राजकीय पक्षाच्या महत्त्वाच्या पदी बसणारी ही पहिलीच ट्रान्सजेंडर व्यक्ती आहे.
या निर्णयाची घोषणा राहुल गांधी आणि ऑल इंडिया महिला काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार सुष्मिता देव यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
मूळच्या आंध्र प्रदेशातील नेल्लोर जिल्हयातील अप्सरा रेड्डी यांनी शालेय शिक्षण चेन्नईमध्ये पूर्ण केलं आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियातील मोनाश विद्यापीठातून त्यांनी पत्रकारितेतील पदवी संपादन केली.
त्यावेळी कॉलेजच्या कामात त्या सक्रिय होत्या. त्यांनी ट्रान्सजेन्डर लोकांच्या अधिकारासाठी काम केलं आणि त्याचबरोबर पत्रकारिताही केली. त्यानंतर त्यांनी लंडनमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं आणि तिथल्या माध्यमांमध्येही काम केलं.
AIADMKच्या ही प्रवक्त्या
अप्सरा AIADMK पक्षाच्या ही प्रवक्त्या होत्या. मात्र जयललिता यांच्या निधनानंतर त्यांनी पक्ष सोडला. त्यांच्या मते पक्षांतर्गत संघर्षामुळे सामान्य जनतेचं नुकसान होत होतं. काही काळ त्या भाजपमध्ये सुद्धा होत्या. मात्र त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला.
लोकांच्या सेवेसाठी काँग्रेस पक्ष हा सर्वोत्तम पर्याय आहे, असं अप्सरा रेड्डी म्हणतात, कारण "राहुल गांधी तरुण आहेत आणि भारतासाठी त्यांना एक विशिष्ट दृष्टी आहे."
महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी ट्वीट करत महिला काँग्रेसमध्ये त्यांचं स्वागत केलं. "त्यांच्याबरोबर काम करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. त्यांचं व्यक्तिमत्त्व आमच्यासाठी मोलाचं ठरेल. या पदावर त्यांची नियुक्ती केल्याबद्दल राहुल गांधी यांचे आभार."
अनेक आव्हानांचा केला सामना
अप्सरा म्हणतात की, राहुल गांधी महिलांना समभावनेची वागणूक देतात. त्यांनी सुष्मिता देव यांचीही स्तुती केली. त्यांच्याशी दीर्घकाळ चर्चा करून हे पद स्वीकारलं आहे. "जर तू स्वत:ला महिला समजत असशील तर तसाच विचार कर. लिंगाधारित विचार करू नको," असा सल्लाही सुष्मिता यांनी दिल्याचं त्या सांगतात.
अप्सरा यांच्या मते राजकारणात स्त्री किंवा पुरुष असणं महत्त्वाचं नसून काम महत्त्वाचं आहे.
त्या म्हणतात, "भारतातल्या सगळ्यांत जुन्या पक्षाने माझं ज्या पद्धतीने स्वागत केलं, तो माझ्यासाठी अत्यंत भावूक आणि सुखद क्षण आहे."
अप्सरा म्हणतात की त्यांचं आयुष्य खूप खडतर राहिलं आहे. लोकांनी त्यांची खूप थट्टा केली आहे. मात्र त्यांनी कायम डोकं शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या उद्दिष्टावरच लक्ष केंद्रित केलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)