'लिव्ह-इन'मधील संमतीने ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही-कोर्ट

सुप्रीम कोर्ट

फोटो स्रोत, Getty Images

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहताना पुरुष आणि महिलेनं सहसंमतीनं शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर पुरुषानं जर लग्नाला नकार दिला तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे.

बुधवारी एका खटल्याची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं हा निकाल दिला आहे.

महाराष्ट्रातील एका नर्सने आपल्या लिव्ह-इन पार्टनरवर बलात्काराचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता.

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्नाबाबत काही आश्वासनं, वचनं दिली होती. मात्र नंतर पुरुषानं लग्नाला नकार दिला. त्यामुळे हे प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलं होतं.

काय आहे पूर्ण प्रकरण

कायदेशीर प्रकरणांचं रिपोर्टिंग करणारे पत्रकार सुचित्र मोहंती यांनी सांगितलं की "लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर सहसंमतीनं शारीरिक संबंध ठेवले तर तो बलात्कार होणार नाही असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. पीडिता आणि आरोपी दोघेही बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत होते"

लिव्ह इन

पीडिता पेशाने नर्स आहे, आणि आरोपी डॉक्टरसोबत महाराष्ट्रातील एका प्रायव्हेट मेडिकल इन्स्टिट्यूटमध्ये काम करत होती. तिथं दोघं प्रेमात पडले आणि सोबत राहू लागले.

डॉक्टरांनी आपल्याला लग्नाचं वचन देऊन शारीरिक संबंध ठेवले, मात्र दुसऱ्याच महिलेशी लग्न केल्याचा आरोप करत पीडितेनं डॉक्टरांवर FIR दाखल केला होता.

यानंतर डॉक्टर ध्रुवराम मुरलीधर सोनार यांनी मुंबई हायकोर्टात FIR रद्द करण्यासाठी याचिका केली. मात्र कोर्टाने डॉक्टरांचा युक्तीवाद मोडीत काढत FIR कायम ठेवला. ज्यामुळे आरोपी डॉक्टरांवर अटकेची टांगती तलवार होती.

जवळपास सहा महिने आधी डॉक्टर सोनार हे प्रकरण सुप्रीम कोर्टात घेऊन आले, जिथं न्यायमूर्ती ए.के.सिक्री आणि एस.अब्दुल नजीर यांच्या खंडपीठानं डॉक्टरांच्या बाजूनं निर्णय दिला आहे.

कोर्टानं काय म्हटलं?

बलात्कार आणि सहसंमतीनं शरीरसंबंध ठेवणं यात अंतर आहे. लिव्ह-इन पार्टनर्स एखाद्या कारणामुळे लग्न करु शकले नाहीत, तर महिला बलात्काराचा गुन्हा दाखल करु शकत नाही.

लाईव्ह लॉ वरील निकालपत्रानुसार पीडितेचं आरोपीवर प्रेम होतं. दोघं बराच काळ सोबत राहिले. आणि आरोपी दुसऱ्या महिलेसोबत लग्न करतोय, असं कळालं की पीडितेनं FIR दाखल केला

लिव-इन संबंधांवर लोक काय विचार करतात?

लिव-इन रिलेशनशिपमध्ये असेच लोक राहतात जे वैवाहिक आयुष्य जगू पाहतात, पण जबाबदारी घेणं टाळतात. लिव्ह-इन रिलेशनशिप दोघांच्या सहमतीवर अवलंबून असते. ज्यात कुठलाही कायदेशीर दबाव किंवा सामाजिक बंधन नसतं.

लिव्ह इन

मग अशावेळी दोन लोकांमध्ये जर सहमतीनं शारीरिक संबंध तयार झाले तर त्याला बलात्कार म्हणता येणार नाही. जसं की सुप्रीम कोर्टानं आपल्या निर्णयात म्हटलं आहे.

कायदेशीर बाबींचे तज्ज्ञ अड.विराग गुप्ता सांगतात की शारीरिक संबंध प्रस्थापित करताना कुठली जबरदस्ती नाहीए, तर तो बलात्कार कसा?

ते सांगतात "कायद्यात बलात्काराची परिभाषा आधीच करुन ठेवली आहे. मात्र वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्याचा दुरुपयोग होऊ लागला"

विराग गुप्तांच्या मते दुरुपयोग होण्याचे तीन पैलू होते

पहिला मुद्दा असा असा होता की तक्रारी खूप वेळ गेल्यानंतर दाखल होतात. जेव्हा की अपराध झाल्यानंतर तातडीनं FIR दाखल झाला पाहिजे. दुसरा मुद्दा लग्नाचं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले जातात पण लग्न करणं टाळल्यानेही असे आरोप होतात. तिसरा मुद्दा असा की प्रत्येक आरोपात कमीत कमी एक तरी पुरावा असायला हवा.

अडव्होकेट गुप्ता यांचं म्हणणं आहे की भविष्यात अशा नात्यांबद्दल संसदेला कायदा बनवण्याची वेळ येऊ शकते.

लिव्ह इन

फोटो स्रोत, iStock

विराग सांगतात की "या प्रकरणात डॉक्टर आणि नर्समध्ये शारीरिक संबंध होते. पण बलात्काराच्या बाबतीत कोर्टाने लिव्ह-इन रिलेशनशिपला एक नवी मान्यता दिली आहे. संसदेला या प्रकरणी कायदा बनवावा लागू शकतो. कारण लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये घरघुती हिंसा, सिंगल मदर किंवा सिंगल फादरलाही मान्यता मिळत आहे. विवाहसंबंधात बलात्कार जर गुन्हा म्हणून नोंदवण्यात आला तर तो लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येही लागू होईल. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये वेगळं होताना पोटगी मागण्याचेही प्रकार समोर आले आहेत. आता या सगळ्याबाबत कायदेशीर सुधारणा अजून होणं बाकी आहे. कायद्यात अजूनही बदल झालेला नाही."

विराग गुप्ता यांच्या माहितीनुसार या प्रकरणातही लिव-इन मध्ये राहिल्यानंतरच बलात्काराचा आरोप करण्यात आला. पण बलात्काराचा अर्थच आहे जबरदस्तीने संबंध ठेवणं. पण इथं कुठलीही जोरजबरदस्ती नाही, तर मग तो बलात्कार कसा? हे नातं एक प्रकारच्या विश्वास आणि सहमतीवर आधारीत असतं.

लिव्ह इन

फोटो स्रोत, ANDRÉ VALENTE/BBC

अडव्होकेट गुप्ता उदाहरणासह समजून सांगण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या सेक्स वर्करने पैशाच्या बदल्यात काही काम केलं आणि नंतर त्या व्यक्तीने पैसे देण्यास नकार दिला तर तो बलात्कार होऊ शकतो का? खरंतर या प्रकरणात बलात्कार होऊ शकत नाही, पण दुसरे आरोप ठेवले जाऊ शकतात.

त्याच प्रकारे डॉक्टरांनी लग्नाचं आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवले, पण ते वचन पूर्ण न झाल्याने नर्सने बलात्काराचा आरोप लावला. इथंही दुसरे गुन्हेही लागू होऊ शकतात. जसं की शोषण, फसवणूक वगैरे वगैरे. पण भारतात सिव्हिल प्रकरणांमध्ये लवकर न्याय मिळत नाही, त्यामुळे क्रिमिनल खटले दाखल करण्याचं प्रमाण वाढलं आहे.

विराग गुप्ता यांच्या मते लिव्ह-इन रिलेशनशिप, अडल्ट्रीच्या कायद्याचा दुरुपयोग आणि तर्कहीन अटकसत्र या सगळ्या प्रकरणांना बघून एक कायदा करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)