#HerChoice एका विकलांग मुलीचा लिव्ह इन ते लग्नापर्यंतचा प्रवास

मी 26 वर्षांची झाली होती आणि आईला वाटतं होतं की मी आता लग्न केलं पाहीजे.
फोटो कॅप्शन, मी 26 वर्षांची झाले होती आणि आईला वाटायला लागलं की, माझं लग्न झालं पाहिजे.
    • Author, इंद्रजित कौर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

अनेकवेळा तो विसरून जायचा की मला एक हात नाही. जर तुम्ही स्वतःला जसं आहे तसं स्वीकारत असाल तर तुमच्या आजूबाजूचे लोकही तुम्हाला सहजतेनं स्वीकारतात, हे मी अनुभवत आहे.

तो विकलांग नव्हता. त्याला कुठलीही मुलगी मिळू शकली असती. पण तो माझ्याबरोबर होता. एकाच घरात लग्न न करता सोबत राहून आम्हाला एक वर्ष झालं होतं. परंतु लग्नाआधी सोबत राहण्याचा घेतलेला निर्णय एवढा सोपाही नव्हता.

हे सगळं सुरू झालं ते एका मॅट्रिमोनिअल साईटच्या माध्यमातून. माझ्या लग्नाबद्दल माझ्या आईला नेहमी काळजी वाटायची. यातून मी या मॅट्रिमोनिअल साईटवर माझं एक प्रोफाईल तयार केलं होतं.

माझं वय 26 वर्षं झालं होतं आणि आईला वाटतं होतं की, मी आता लग्न केलं पाहिजे.

लहान असताना एका अपघातात माझा एक हात गेला होता. त्यामुळे माझ्या आईची चिंता ही रास्तच होती.

एक दिवस मॅट्रिमोनिअल साइटवर मला रिक्वेस्ट आली. थोडी वेगळी वाटली. मुलगा इंजिनीअर होता आणि माझ्यासारखाच बंगाली होता. पण दुसऱ्या शहरात राहात होता.

मी काही ठरवू शकत नसल्यानं मी लग्नासाठी तयार नसल्याचं उत्तर त्याला पाठवून दिलं. त्यावर त्याच्याकडून तातडीने उत्तर आलं, "किमान आपण बोलू तर शकतो ना?"

#HerChoice ही मालिका आहे १२ भारतीय स्त्रियांच्या आयुष्यांवरील खऱ्याखुऱ्या कहाण्यांची. आधुनिक भारतीय स्त्रीच्या समोरील आव्हानं आणि तिच्या जगण्याचा विस्तारलेला परीघ उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. या कहाण्यांच्या केंद्रस्थानी आहेत, तिच्या जगण्याचा वेध घेणारं तिचं निवड स्वातंत्र्य, आकांक्षा आणि इच्छा.

मी दोन मैत्रिणींबरोबर एका फ्लॅटमध्ये राहात होते. त्यांना भीती वाटत होती की तो फ्रॉड तर नसेल ना?

माझे दोन ब्रेकअप झालेले होते आणि जुन्या प्रेम संबधांनी मला किमान हे शिकवलं होतं की, मला नात्यात काय हवंय आणि काय नको.

मी नव्या नात्यासाठी अजून तयार तर नव्हते. पण एकटं जगायची इच्छाही नव्हती.

यामुळं मी त्याच्याशी बोलणं सुरूच ठेवलं. त्याचा नंबर मी 'टाईमपास' या नावानं 'सेव्ह' करून ठेवला होता. एक दिवस आम्ही भेटण्याचा निर्णय घेतला.

मी त्याला आधीच सांगितलेलं होत की, मला एक हात नाही. तरीसुद्धा मला पाहून त्याची प्रतिक्रिया काय असेल, याची मला भीती होतीच.

फेब्रुवारीतला हलकासा गारवा होता. त्या दिवशी मी आपल्या ऑफिसच्या ड्रेसमध्येच होते. फक्त काजळ आणि लिपस्टिक जरा चांगल्या पद्धतीनं लावलेलं होतं.

रस्त्याच्या कडेने चालत चालत आम्ही गप्पा मारत होतो. आमच्या बऱ्याच आवडीनिवडी मिळत्याजुळत्या होत्या. आम्ही लगेचच मित्र झालो.

तो फार कमी बोलायचा. माझी फार काळजी घ्यायचा. मी सुरक्षित घरी पोहोचले की नाही बघायचा. बऱ्याच वेळा त्याला उशीर होणार असेल तर तो मला घरी सोडायला येत होता. जर मला एकट्यानंच घरी पोहोचायचं असेल, तर मला रात्री दहा वाजायच्या आत घरी पोहोच असं सांगायचा.

मी चांगली पत्नी होऊ शकते का नाही, हे मला माहीत नव्हतं. पण त्याच्यात एक चांगला नवरा होण्याची क्षमता मला दिसत होती.

मला माहीत नव्हतं की या नात्याचा शेवट काय असेल. पण हळूहळू आम्हाला एकमेकांची सोबत चांगली वाटायला लागली.

एकदा मी आजारी असताना त्याने माझी व्यवस्थित काळजी घेतली. ती पहिली वेळ होती जेव्हा त्याने मला कवटाळलं. त्यादिवशी फार चांगलं वाटतं होतं.

मग आम्ही हातातहात घालून चालायचो. अर्थात माझा उजवा हात!

काही महिन्यानंतर माझ्या फ्लॅटमेट्सचं लग्न झालं. त्या फ्लॅटचं भाडं एकटीनं देणं, मला आता परवडत नव्हतं.

त्याच दरम्यान माझ्या 'मॅट्रिमोनीअल साईट'वाल्या मित्राच्या बिल्डिंगमध्ये एक रूम रिकामी झाली होती. ही रूम त्याच्या घराच्या बाहेरील बाजूला होती. मी या रूममध्ये शिफ्ट झाले.

एक प्रकारे आम्ही सोबत राहत नसल्याचं दाखवत सर्वांना फसवत होतो. पण माझी आई जेव्हा पहिल्यांदा मला भेटायला आली तेव्हा कदाचित तिला समजल होतं की आम्ही सोबत राहात आहोत.

या काळात आम्हाला एकमेकांना अधिक जाणून घेता आलं. मला एक हात नसल्यानं त्याच्या मनात ज्या काही शंका किंवा भीती होती ती दूर झाली. मला घरातली सर्व कामं करताना कसलीच अडचण येत नव्हती.

त्याची आई म्हणाली, मैत्रीपर्यंत ठिक आहे पण लग्नाचा विचार विसरून जा.
फोटो कॅप्शन, त्याची आई म्हणाली, मैत्रीपर्यंत ठीक आहे पण लग्नाचा विचार विसरून जा.

नंतर नोकरी बदलली आणि आम्ही नवीन घर शोधलं. यावेळेस आम्ही पूर्णरित्या तयार होतो.

लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे फक्त लैंगिक आकर्षण नसतं. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तुमचं खासगी आयुष्य शेअर करत असता.

एकमेकांना साथ देण्याचं आणि स्वीकारण्याचं वचन दिलेलं असतं. कदाचित हेच एक कारण असेल की, आपल्या न्याय व्यवस्थेनेही त्याला मान्यता दिली असेल.

त्याला जेवण बनवता येत नव्हतं आणि मी याआधी काही फारसा स्वयंपाक केलेला नव्हता. पण हळूहळू मी सर्व काही शिकले.

माझ्या मनात स्वतःबद्दल असलेल्या शंकाही दूर झाल्या होत्या. मी कदाचित रोमँटिक नसले तरी एक चांगली पत्नी म्हणून स्वतःला सिद्ध करू शकते असा विश्वास निर्माण झाला होता.

हे त्यालाही समजत होते. पण त्याच्या कुटुंबाच्या दृष्टीने मात्र मी सक्षम नव्हते.

तो एकुलता एक मुलगा होता. माझ्याविषयी जेव्हा त्याने त्याच्या कुटुंबाला पहिल्यांदा सांगितलं तेव्हा त्याची आई त्याला म्हणाली, "मैत्रीपर्यंत ठीक आहे. पण लग्नाचा विचार विसरून जा."

लोक असा विचार का करतात? आणि त्यांचे विचार मी स्वतःवर का म्हणून लादू? मी विनाकारण का स्वतःला मर्यादा घालून घेऊ?

आता विचार करते की मी एका बाळाचं संगोपन करू शकेल का?
फोटो कॅप्शन, आता विचार करते की मी एका बाळाचं संगोपन करू शकेल का?

मी विकलांग आहे म्हणून विकलांग जोडीदाराचीच अपेक्षा करावी का? मला समजून घेणारा जोडीदार मला मिळावा, अशीच इतर मुलींसारखी माझीही अपेक्षा होती.

मग त्याने त्याच्या आईवडिलांशी माझं फोनवर बोलणं करून दिलं. पण त्यांना हे कळू नाही दिली की मी तीच मुलगी आहे. सर्वांत आधी त्यांनी मला एक व्यक्ती म्हणून जाणून घ्यावं असं त्याला वाटत होतं.

एका सर्वसाधारण मुलीप्रमाणेच मी काम करू शकते हे सिद्ध करण्याचा दबाव माझ्यावर सुरुवातीपासूनच राहिलेला आहे.

ते पण जेव्हा ते मला भेटायला आले तेव्हा याचंच निरीक्षण करत होते. एक साधारण गृहिणी जी कामं करू शकते ती सर्व कामं मी करू शकते हे त्यांनी पाहिलं.

भाजी चिरणं, स्वयंपाक करणं, अंथरूण लावणं, भांडी घासणं, साफसफाई करणे, अशी सर्व कामं मी एका हाताने करू शकत होते.

विकलांगता एका व्यक्तीला मर्यादित करून टाकते, हा भ्रम त्याच्या आईवडिलांच्या मनातून आता हद्दपार झाला होता.

आज विवाहाच्या एक वर्षानंतर आमचं प्रेम अधिकच बहरलं आहे.

माझी विकलांगता ना माझ्या 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये आली ना तर माझ्या लग्नाच्या!

आता विचार करते की मी एका बाळाचं संगोपन करू शकणार का?

याचं उत्तर शोधताना वाटतं की, आधी मी स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे. त्यानंतर माझ्या आजूबाजूच्या लोकांनाही माझ्या क्षमतेवर विश्वास ठेवावा लागेल.

(उत्तर भारतात राहणाऱ्या एका महिलेची ही सत्यकथा असून बीबीसी प्रतिनिधी इंद्रजित कौर यांनी शब्दांकन केलं आहे तर निर्मिती दिव्या आर्या यांनी केली आहे.)

तुम्ही हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)