रफाल वादातले विश्वजीत राणे पर्रिकरांनंतर गोव्याचे मुख्यमंत्री होणार होते?

फोटो स्रोत, Getty / Twitter / Twitter
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
रफाल लष्करी विमानांच्या करारावरील वादाने आज पुन्हा संसेदत उड्डाण घेतलं.
गोव्याचे भाजपचे मंत्री विश्वजीत राणे आणि दुसऱ्या एका व्यक्तीच्या फोनवरच्या संभाषणाची एक ऑडियो क्लिप काँग्रेसने लीक केली. "रफाल करारासंबंधीच्या फाईल माझ्या बेडरूममध्ये ठेवल्या आहेत," असं पर्रिकरांनी कॅबिनेट मीटिंगमध्ये स्वत: सांगितल्याचं राणे दुसऱ्या व्यक्तीला या क्लिपमध्ये सांगत आहेत.
पण या क्लिपची सत्यता अद्याप पडताळण्यात आलेली नाही. दरम्यान, भाजपने ही ऑडियो क्लिप खोटी असून याद्वारे "चुकीची गोष्ट पसरवण्याचा प्रयत्न" असल्याचं म्हटलं आहे.
आज लोकसभेतही काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी हीच क्लिप चालवण्याची परवानगी मगितली आणि त्यानंतर वाद सुरू झाला. काँग्रेसच्या या आरोपांवर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी प्रत्युत्तर दिलं.
क्लिपमध्ये नेमकं काय?
या टेपमध्ये गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांचं एका अज्ञात व्यक्तीशी फोनवरील संभाषण असल्याचा दावा आहे.
"मुख्यमंत्र्यांनी रफालबाबत एक वक्तव्य केलं आहे. रफाल खरेदीची संपूर्ण माहिती माझ्या बेडरूममध्ये ठेवली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तुम्ही यावर बातमी करायला हवी. तसंच मंत्रिमंडळातील जवळच्या व्यक्तीला विचारून याबाबत खुलासा करायला हवा," असं राणे या टेपमध्ये म्हणत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
"ही गोष्ट कुणीतरी जाऊन दिल्लीला कळवावी, असं पर्रिकरांना वाटत होतं की दुसरं काही यामागे होतं, याबाबत मला काही समजलं नाही. ही बाब मी फक्त तुम्हाला सांगत आहे," असंही राणे त्यात पुढे म्हटल्याचा दावा आहे.

फोटो स्रोत, Getty Images
विधानसभा अध्यक्ष अचानकपणे सत्रात रस का घेत आहेत, असा प्रश्न समोरच्या व्यक्तीनं विचारल्यावर त्या कथित संभाषणात राणे म्हणतात की, "त्यांना (प्रमोद सावंत) वाटतं की संघ त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत करेल."
"आपण एकदा भेटायला हवं, कारण दिल्लीपर्यंत या गोष्टी पोहोचायला हव्यात," असंही राणे यांनी म्हटल्याचं सांगण्यात आलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
'त्या' कॅबिनेट बैठकीत काय झालं?
क्लिपमध्ये ज्या कॅबिनेट बैठकीचा उल्लेख आहे, त्या बैठकीत नेमकं काय झालं होतं, याबद्दल गोव्यातील प्रुडंट मीडिया या वृत्तवाहिनीचे संपादक प्रमोद आचार्य सांगतात की कॅबिनेट बैठकीच्या अधिकृत पत्रकात असा काही उल्लेख नाही. "विश्वजीत राणेंचं संभाषण ऐकल्यास त्यांचा दावा आहे की, मंत्रिमंडळ बैठकीत बोलताना पर्रिकर यांनी सांगितलं की 'मला कुणीही हात लावू शकत नाही कारण रफाल संबंधीच्या सगळ्या फाईल माझ्या बेडरूममध्ये आहेत'. पायउतार व्हावं, यासाठी गोवा आणि दिल्लीतूनही पर्रिकरांवर दबाव होता. या दृष्टीनं ती कॅबिनेट बैठक महत्त्वाची होती."

फोटो स्रोत, DASSAULT RAFALE
"दुसरं म्हणजे पर्रिकरांना पर्याय म्हणून ज्या दोन नेत्यांची नावं चर्चेत होती त्यातील एक नाव म्हणजे विश्वजीत राणे. या बैठकीसंबंधीचे सर्व तपशील यापूर्वी जाहीर झालेले आहेत. आज काँग्रेसनं जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपमधील रफालचा मुद्दा मात्र नवीन आहे," असं आचार्य सांगतात.
काँग्रेसच्या या आरोपांनंतर राणे यांनी एक पत्रक जारी केलं आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना उद्देशून हे पत्रक लिहिण्यात आलं आहे.
"रफाल प्रकरणी एका ऑडिओ टेपचा उल्लेख करण्यात येत आहे. त्या टेपमध्ये मी आणि दुसऱ्या एका व्यक्तीचं संभाषण असल्याचं म्हटलं जात आहे. या टेपच्या माध्यमातून कुणीतरी चुकीची गोष्ट पसरवत आहे आणि या प्रकरणाची कसून चौकशी व्हायला हवी, अशी मी मुख्यमंत्र्यांना विनंती करत आहे."
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनीही याप्रकरणी ट्वीट करून स्पष्टीकरण दिलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"रफावरील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे काँग्रेसचा खोटेपणा समोर आला आहे. या ऑडियो क्लिपच्या माध्यमातून काँग्रेस तथ्यांपासून लक्ष भटकावण्याचा प्रयत्न करत आहे. या टेपमध्ये ज्या संभाषणाचा उल्लेख आहे ते कधीच घडून आलेलं नाही," असं पर्रिकर यांनी म्हटलं आहे.
विश्वजीत राणे कोण?
गोव्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले प्रतापसिंह राणे हे विश्वजीत राणे यांचे वडील. काँग्रेसचे मुख्यमंत्री म्हणून प्रतापसिंह राणे यांनी काम पाहिलं आहे. सध्या प्रतापसिंह गोव्यातील काँग्रेसचे आमदार आहेत तर त्यांचा मुलगा अर्थातच विश्वजीत भाजपचे आमदार आहेत.

फोटो स्रोत, TWITTER/@VISRANE
दिगंबर कामत गोव्याचे मुख्यमंत्री असताना विश्वजीत राणे यांनी आरोग्यमंत्रिपद सांभाळलं होतं.
2012मध्ये पर्रिकर सत्तेत आल्यानंतर ते 5 वर्षं विरोधात होते. 2017ची निवडणूक त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर लढवली. "त्यानंतर विधानसभेत जेव्हा आमदारकीची शपथ घेण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी शपथ घेतली आणि अवघ्या 5 मिनिटांत आमदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला," असं आचार्य यांनी सांगितलं.
गोव्याच्या राजकीय वर्तुळात काय चर्चा?
आचार्य सांगतात की, "गोव्यातील राजकीय वर्तुळात रफाल ऑडिओ क्लिप प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. विश्वजीत राणे आणि सध्याचे सभापती प्रमोद सावंत यांच्याकडे पर्रिकरांनंतर मुख्यमंत्रिपदाचे दावेदार म्हणून पाहिलं जात होतं आणि भाजपचीही त्या दिशेनं वाटचाल सुरू होती. त्यामुळे या वादाला महत्त्व प्राप्त झालं आहे.
"पर्रिकरांना पर्याय ठरू शकला असता, अशा मंत्र्यानं ऑडिओ क्लिपमध्ये खुलासा केल्याचा आरोप असल्यामुळे गोव्यात यावर जोरात चर्चा सुरू झाली आहे. कारण दिल्ली भाजप पर्रिकरांना पर्याय म्हणून विश्वजीत राणे आणि प्रमोद सावंत यांच्याकडेच बघत होतं," असं आचार्य सांगतात.
पत्रकार राजू नायक सांगतात की, गोव्यात मागच्या काही दिवसांमध्ये भाजपची परिस्थिती खूपच खालावली आहे, "कारण मुख्यमंत्री आजारी आहेत. सरकार जवजवळ ठप्प आहे. महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड यांच्यामध्ये चलबिचल आहे."
दुसरीकडे, काँग्रेसचीही संघटना ढेपाळलेली असल्याचे ते सांगतात. "इतकं की अनुभव नसणाऱ्या व्यक्तीकडे प्रदेशाध्यक्षपद आलं आहे. नाहीतर एव्हाना त्यांना सरकार पाडणं शक्य झालं असतं. शिवाय गोव्यात प्रत्यक्षात काय सुरू आहे, याचा राहुल गांधींना सुगावा लागत नाही. राहुल गांधींच्याच चुकांमुळे मागच्या निवडणुकीत गोव्यात काँग्रेस सत्तेत येऊ शकली नाही, कारण कुणाशी युती करावी, हेच त्यांना समजू शकलं नाही."
वादाचा फायदा कुणाला?
या प्रकरणाचा कुणाला फायदा होईल, यावर आचार्य सांगतात की, "गोव्याची राजकीय परिस्थिती अशी आहे की काँग्रेसला कुठल्याही परिस्थितीत फायदाच होईल. पर्रिकरांना पर्याय म्हणून जे दोन प्रमुख दावेदार होते त्यांच्याकडे भाजप पर्याय म्हणून पाहत होतं, त्यातील एका उमेदवाराचं अध:पतन झालेलं आहे. त्यामुळे काँग्रेसला बळकटी मिळेल.
"तसंच विश्वजीत राणे यांनी विश्वासघात केला आहे, असं काँग्रेसला वाटत आलेलं आहे. त्यादृष्टीनं हा बदला घेतल्यासारखी परिस्थिती काँग्रेससाठी आहे."

फोटो स्रोत, GETTY / EPA
"लोकसभा निवडणुका जवळ आहेत. कॅथलिक समाज आक्रमक झालेला आहे. त्यामुळे भाजपचा पडता काळ आहे. गोव्यात काँग्रेसची संघटना ढेपाळलेली असली तरी त्यांचा मतदार जागरूक आहे. मतदारांना सत्ताबदल हवाय. तीन राज्यांत काँग्रेसचा विजय झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही चैतन्याचं वातावरण आहे. शिवाय, आता या क्लिपमुळे गोव्याच्या राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे," असं नायक सांगतात.
एकंदरच रफाल प्रकरणी आरोपांच्या विमानांनी दिल्लीतून टेकऑफ केलं असलं तरी त्यांचं लँडिंग गोव्यात होऊ शकतं, असं चित्र जाणकारांच्या निरीक्षणातून स्पष्ट होतंय.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








