ठाकरेंची भूमिका शेवटी मुस्लीम अभिनेत्यालाच करावी लागली-सिद्धार्थ

ठाकरे सिनेमाचा ट्रेलर लाँच होऊन 24 तास उलटण्याच्या आत त्यावरुन वाद सुरु झाला आहे. रंग दे बसंतीफेम अभिनेता आणि निर्माता सिद्धार्थनं बाळासाहेबांवरील चित्रपटातील संवाद आणि त्यातील भाषेवरुन जोरदार टीका केली आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर सिद्धार्थनं लिहिलंय की,"ठाकरे फिल्ममध्ये नवाजुद्दीनच्या तोंडी वारंवार 'उठाव लुंगी बजाव पुंगी' हा डायलॉग आहे. हा दाक्षिणात्य लोकांचा तिरस्कार आहे, हे स्पष्ट दिसतंय. आणि ज्या माणसानं हा तिरस्कार पसरवला त्याचं गुणगाण सुरु आहे. असला गाजावाजा करुन तुम्ही पैसे कमावण्याचं प्लॅनिंग आहे का? तिरस्कार विकणं बंद करा. हे खूप भीतीदायक आहे."

बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनप्रवासावरील 'ठाकरे' या सिनेमाची निर्मिती सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजेच 23 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे 2019 च्या निवडणुकीआधी हा चित्रपट प्रदर्शित करुन राजकीय फायदा उचलण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचं राजकीय विश्लेषकांना वाटतं.

बुधवारी दुपारी 4 वाजता मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत 'ठाकरे' सिनेमाचा ट्रेलर लाँच केला होता. 24 तासाच्या आत 'ठाकरे' सिनेमाचा 2 मिनिटं आणि 54 सेकंदाचा ट्रेलर यूट्यूबवर 70 लाख लोकांनी पाहिला आहे.

ट्रेलरमध्ये 1960 च्या दशकातला संघर्ष दाखवण्यात आला आहे. ज्यात परप्रांतिय विरुद्ध भूमीपुत्र असा वाद चित्रित करण्यात आलाय. ज्यात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणाऱ्या नवाजुद्दीनच्या तोंडी काही संवाद आहेत. ज्यात चित्रपटगृहावर मराठी सिनेमाचं पोस्टर लावताना "अब यह सब यहाँ नहीं चलेगा, पहला हक यहाँ के मराठी लोगों का है" असा संवाद आहे.

याशिवाय सध्या देशभर वादात आणि चर्चेत असलेल्या राम मंदिराचा आणि बाबरी मशिद पाडण्याचा घटनाक्रमही चित्रपटात आहे. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेबांना कोर्टातही हजेरी लावावी लागली होती. त्याच्या सुनावणीचा सीनही चित्रपटात आहे. ज्यात 'रामाचा जन्म 'तिथेच' (अयोध्येच्या वादग्रस्त ठिकाणी) झाला, याचा पुरावा काय?' असा प्रश्न बाळासाहेबांना (अर्थातच नवाजला) विचारला जातो. त्यावर "नाहीतर काय पाकिस्तानात झाला होता?" असं उत्तर बाळासाहेब देतात.

सिद्धार्थने नवाझुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारत असण्याबाबतही भाष्य केलं आहे.

यावरुनही सिद्धार्थनं निशाणा साधत " एका मराठी धर्मांध नेत्याच्या प्रचारासाठीच्या फिल्ममध्ये उत्तर प्रदेशातील मुस्लिम अभिनेता मुख्य भूमिका साकारतो, तेव्हा तो काव्यगत न्याय असतो" असं सिद्धार्थनं म्हटलं आहे.

अर्थात शिवसेना किंवा 'ठाकरे' चित्रपटाच्या निर्मात्यांकडून याविषयी कुणीही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र ट्वीटरवर महाराष्ट्रातील लोकांनी सिद्धार्थचा समाचार घेतला आहे. ज्यात डाटा अॅनालिस्ट असलेले अक्षय पेडणेकर लिहितात " तुम्ही करुणानिधींना देशभक्त म्हणता. पण त्याच करुणानिधींनी प्रभाकरन आपला मित्र असल्याचं जाहीरपणे म्हटलं होतं. हा तोच प्रभाकरन आहे, ज्यानं भारताच्या पंतप्रधानांची हत्या घडवून आणली. मला यात कुठलाही ढोंगीपण दिसत नाही" अशी उपरोधिक प्रतिक्रिया अक्षयनं दिली आहे.

तर वृतांत मेहता या तरुणाच्या मते "माझे दक्षिण भारतात खूप मित्र आहेत, पण या ट्रेलरमुळे कुणीही दुखावलेलं नाही. तुमच्यासारखी माणसं फक्त तिरस्कार पसरवण्यासाठी काही गोष्टी आधोरेखित करत असतात. आपण फक्त चित्रपटाचा आनंद घेऊ शकत नाही का? एकाच इंडस्ट्रीतले लोक अशा लहान गोष्टींनी दुखावतात, हे खूप वेदनादायी आहे"

शशांक यांनी सिद्धार्थच्या ट्वीटवर टीका केली आहे.

'ठाकरे' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मुंबईत येणाऱ्या परप्रांतियांच्या लोंढ्यावरही भाष्य करण्यात आलं आहे. ज्यामुळे स्थानिक भूमीपुत्रांचे अधिकार हिरावले जात असल्याचं आधोरेखित केलंय. ज्यावर सिद्धार्थनं आक्षेप घेतला आहे.

"अतिशय हुशारीनं इंग्रजीतले सबटायटल न देता 'ठाकरे' ट्रेलर लाँच करण्यात आला. सुंदर प्रणयकथा असावी अशा पद्धतीनं तिरस्कार पसरवला जात आहे. ज्याला उत्तम संगीत, वाघाची डरकाळी आणि टाळ्यांची साथ आहे. मात्र त्याचवेळी मुंबईला ग्रेट बनवणाऱ्या दक्षिण भारतीयांबद्दल थोडीही कणव दाखवलेली नाही. #हॅपी इलेक्शन" असं म्हणत सिद्धार्थनं निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी हा प्रयत्न असल्याचं म्हटलंय.

सिद्धार्थच्या आक्षेपाचाही ट्वीटरकरांनी प्रतिवाद केला आहे.

मराठी रोजगार नावानं ट्वीटर चालवणाऱ्या तरुणानं सिद्धार्थच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

" तू चरित्रपटांचा अर्थ समजून घ्यायला हवास. जे ट्रेलरमध्ये दिसत आहे, ते त्या काळातलं सत्य आहे. चरित्रपट म्हणजे इतिहासात घडलेला घटनाक्रम आताच्या काळातील स्क्रीनवर दाखवणं हेच असतं"

तर निषाद देशपांडेनं लिहिलंय "सर, कुठलाही स्थलांतरीत मुंबईला ग्रेट करण्यासाठी शहरात येत नाही. ते संधी आणि पैशासाठी इथं येतात. त्यामुळे मुंबईच त्यांना ग्रेट बनवते. आणि तुमच्या माहितीसाठी मुंबई स्थलांतरितांशिवायसुद्धा ग्रेटच आहे."

अर्थात सिद्धार्थच्या ट्वीटनंतर ट्वीटरवर वादंग माजलंय. दोन्ही बाजूंनी वाद-प्रतिवाद सुरु आहेत. मात्र या सगळ्यावर बोलण्यास चित्रपटाचे निर्माते संजय राऊत यांनी नकार दिला आहे. तसंच आपण सिद्धार्थ नावाच्या अभिनेत्याला ओळखत नाही. त्यामुळे यावर माझी कुठलीही प्रतिक्रिया नाही. असं त्यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं आहे.

पण ट्रेलर लाँचनंतरच्या वादाचा ट्रेलर हा चित्रपटाच्या रीलीजपर्यंत कुठे जातो, हे पाहणं औत्सुक्याचं असेल.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)