You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऑनलाईन शॉपिंग करताना अशी टाळता येते स्वतःची फसवणूक
- Author, भूमिका राय
- Role, बीबीसी प्रतिनिधी
काही लोक वेळ वाचवण्यासाठी ऑनलाईन शॉपिंग करतात तर काही जण वेळ घालवण्यासाठी. कुणासाठी ऑनलाईन शॉपिंग मजेशीर बाब आहे तर काही जणांना या शॉपिंगचा त्रासही झालेला आहे.
जितके लोक तितके अनुभव.
बदलत्या काळानुसार ऑनलाईन शॉपिंग ही गरज बनली असली तरी एका मोठ्या वर्गाला यापासून भीती वाटते. काही लोकांना वाटतं की त्यांच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स लीक होतील, तर काहींना वाटतं की ऑर्डर केलेलं सामान न मिळता दुसरंच काहीतरी घरी पोहोचेल.
बऱ्याच लोकांसोबत असं झालं आहे. याचं ताजं उदाहरण म्हणजे अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यासोबत घडलेला प्रसंग.
सोनाक्षीनं अमेझॉनवरून 18 हजार रुपयांचा बोस या कंपनीचा एक हेडफोन ऑर्डर केला होता. पण ज्यावेळेस तिला ऑर्डर मिळाली तेव्हा त्यात लोखंडाचा एक तुकडा निघाला.
तो तुकडा एखाद्या नळाचा भाग आहे असं पाहिल्याक्षणी वाटत होतं. या प्रकारानंतर सोनाक्षीनं एक फोटो ट्वीटर अकाउंटवर शेयर करत घडलेल्या प्रसंगाची माहिती सांगितली.
पण एखाद्या व्यक्तीनं 18 हजारांचा हेडफोन ऑर्डर केला असेल तर तिला लोखंडाचा तुकडा कसा काय मिळाला? हा प्रश्न अनेकांना पडला असेल.
हे प्रकरण आम्ही निकाली काढलं आहे, असं अमेझॉननं यानंतर स्पष्ट केलं आहे.
"आम्ही ग्राहकांची काळजी करणारी कंपनी आहोत. त्यामुळे ग्राहकांच्या वस्तू त्यांच्यापर्यंत सुरक्षितरित्या पोहोचवण्याची जबाबदारी आमची आहे. आम्ही या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करत आहोत.
आम्ही ग्राहकाशी यासंबंधी बोललो आहोत आणि त्यांना झालेल्या त्रासाबद्दल क्षमाही मागितली आहे," असं अमेझॉननं म्हटलं आहे.
सामानाची डिलिव्हरी कशी होते?
जगातल्या सर्वाधिक मोठ्या ऑनलाईन रिटेलरपैकी एक असलेलं अमेझॉन दररोज लाखो वस्तू जगातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये पोहोचवतं.
ज्यावेळी आपण एखादी वस्तू ऑर्डर करतो तेव्हा ती कुठे ठेवण्यात आली आहे, याचा शोध सॉफ्टवेअर घेतं. वस्तूच्या ठिकाणाबद्दल हे सॉफ्टवेअर कर्मचाऱ्याला माहिती देतं.
मग तो कर्माचारी वेअर हाऊसमधील वस्तूच्या कपाटापर्यंत पोहोचतो, ती वस्तू उचलतो आणि हातातल्या स्कॅनरनं तिला स्कॅन करतो. संबंधित पाकिट बरोबर आहे की नाही, त्यावर योग्य पत्ता आहे की नाही हे स्कॅनर ठरवतं. नंतर त्यावर ग्राहकाचं नाव आणि पत्त्याची माहिती चिकटवली जाते.
त्यानंतर हे सामान डिलिव्हरीसाठी तयार केलं जातं.
पण ऑर्डर केलेली वस्तू एक आणि डिलिव्हरी मात्र दुसऱ्या वस्तूची का?
यावर ई-कॉमर्स आणि सायबर तत्ज्ञ विनीत कुमार सांगतात की, "चांगल्या ई-कॉमर्स वेबसाईटरून तुम्ही सामान ऑर्डर केलं असेल तर चुकीची शक्यता खूपच कमी असते.
पण बहुतेकदा लोक विक्रेत्यांच्या रेटिंग्सकडे लक्ष देत नाहीत. विक्रेत्यांची रेटिंग्स याप्रकारच्या गडबडींसाठी जबाबदार असते. कधीकधी डिलिव्हरी बॉयसुद्धा ऑर्डर केलेली वस्तू काढून त्या जागी दुसरंच काहीतरी भरून ठेवतात."
यापासून स्वत:ला कसं वाचवाल?
विनीत सांगतात, "सर्वांत आधी रेटिंग चेक करावी. डिलिव्हरी ब्वॉय सामान घेऊन आल्यानंतर त्याला थांबवावं आणि त्याच्या देखत पार्सलचं पाकिट उघडावं. पाकिट उघडताना व्हीडिओही बनवावा जेणेकरून तुम्हाला चुकीची वस्तू मिळाल्याचा तो पुरावा राहिल.
बऱ्याच वेळा चुकीचं सामान येतं. पण असंही होतं की लोक मुद्दामहून चुकीचं सामान आल्याची तक्रार करतात. यामुळे व्हीडिओ बनवणं चांगला पर्याय आहे. ज्या वेबसाईटवरून तुम्ही सामान खरेदी करत आहात ती प्रसिद्ध असावी आणि तिचं रेटिंग चांगलं असावं."
ऑनलाईन शॉपिंग करताना काय लक्षात ठेवावं?
ऑनलाईन शॉपिंग सुरू करण्यापूर्वी कॉम्प्युटरवर अॅन्टी-व्हायरस असणं गरजेचं असतं. बाकी वरच्या बाबींची काळजी घ्यावी.
डिस्काउंटपासून सावधान
ज्या साईटवरून तुम्ही शॉपिंग करत आहात तिच्या नावात http नाही तर https असावं, हे सर्वांत आधी लक्षात घ्यावं.
S लागल्यानंतर सुरक्षिततेची हमी मिळते आणि मग ती साईट फेक नाही, हे स्पष्ट होतं. कधीकधी ऑनलाईन पेमेंटची वेळ आल्यानंतर वेबसाईटच्या नावात S अॅड होतं.
जिथून सामान खरेदी करण्यात येत आहे तिथला पत्ता, फोन नंबर आणि ई-मेल संबंधित वेबसाईटवर लिहिलेला आहे की नाही, हेही तपासून पाहावं. धोकादायक वेबसाईट ही माहिती देत नाहीत.
एखाद्या प्रसिद्ध वेबसाईटवर चांगलं डिस्काउंट मिळत असेल तर तीसुद्धा तपासून पाहा. पण फक्त एखाद्याच वेबसाईटवर ही सवलत असेल तर थोडी जागरुकता बाळगायला हवी.
पेमेंट सिस्टम
पेमेंट करताना अधिक काळजी बाळगायला हवी. ज्या वेबसाईटवर तुम्ही पेमेंट करत आहात तिच्यावर व्हेरिफाईड मास्टरकार्ड सिक्योरकोडच्या माध्यमातून पेमेंट करता येतं की नाही, हे तपासून पाहा.
असं असेल तर त्या माध्यमातून पेमेंट करा. यामुळे तुम्ही संभाव्य दुष्परिणामांपासून वाचू शकता.
डिलिव्हरीसाठी किती वेळ लागेल, ही बाबही लक्षात असू द्या. पेमेंट संबंधित माहिती वेबसाईटवर दिलेली असायला हवी.
या सर्व बाबींची पुर्तता झाल्यानंतर तुम्ही खरेदीचं पाऊल उचलू शकता. कधीच क्रडिट कार्ड अथवा क्रेडिट कार्डचा पासवर्ड शेयर करू नका.
कधीकधी हॅकर्स क्रेडिट कार्डचे डिटेल्स चोरतात. तुमचा क्रेडिट कार्डचा कोड सायबर चोर ऑनलाईन साईटवर टाकत असतात, असं डच डेव्हलपर विलियम डी ग्रूट सांगतात.
सर्वाधिक वापरात असलेल्या साईट्स हॅकर्सच्या निशाण्यावर असतात, असं त्यांनी ब्लॉगस्पॉटमध्ये म्हटलं आहे.
एकदा की वेबसाईटमध्ये प्रवेश मिळवला की ते तुमच्या कार्डाची माहिती चोरतात, असं ते सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)