'झिरो' नाही, असे हिरो ज्यांची मूर्ती लहान पण किर्ती महान

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

'ज़िंदगी काटनी किसे थी? हमे तो जिनी थी...' (आयुष्य रेटायचं कुणालाय? मला तर जगायचंय.)

'झिरो' या चित्रपटात शाहरुख खाननं साकारलेल्या बउआ सिंगचं हे वाक्य लक्ष वेधून घेतं.

शाहरुखनं या चित्रपटात कमी उंचीच्या, पण मोठी स्वप्नं पाहणाऱ्या एका व्यक्तीची भूमिका साकारली आहे. पण खऱ्या आयुष्यात हे वाक्य किती खरं ठरतं?

आपल्या dwarfism म्हणजे ठेंगणेपणाचा बाऊ न करता, उंचीनं कमी असूनही वेगवेगळ्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणाऱ्या काही व्यक्तींशी आम्ही संवाद साधला.

महेश जाधव, अभिनेता

मनोरंजन जगतात एरवी कमी उंचीच्या व्यक्तींच्या वाट्याला हास्यअभिनेता किंवा जोकर म्हणून दुय्यम दर्जाच्या भूमिकाच जास्त येताना दिसतात. त्यांच्या उंचीवरून सर्रास शेरेबाजीही होते. पण महेश जाधवच्या वाट्याला एक वेगळी भूमिका आली आहे.

महेश म्हणजे झी मराठी या टीव्ही वाहिनीवरील 'लागिरं झालं जी' या मालिकेतला 'टॅलेण्ट'. मालिकेतल्या खलनायकाचा साथीदार म्हणून महेश महत्त्वाची भूमिका साकारतोय.

पडद्यावर दिसणारं ठेंगण्या व्यक्तींचं चित्रण बदललं की लोकांचा अशा व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलू शकेल, अशं महेशला वाटतं.

"माझ्या घरात मीच पहिला असा छोटा जन्मलो. माझ्या जन्मानंतर आठ महिन्यांतच बाबा वारले. आईला लक्षात आलं की माझी उंची फार वाढत नाही. तिनं डॉक्टरांकडे नेलं, तेव्हा त्यांनी सांगितलं की याची उंची काही उपाय केले तरी वाढणार नाही. तो बाकी नॉर्मल आहे," महेश सांगतो.

"मी पाचवी-सहावीत गेलो, तेव्हा लक्षात यायला लागलं आपले पाय बाकीच्यांपेक्षा खूप छोटे आहेत. तेव्हा मनातून खूप राग यायचा स्वतःचा. बाकीची मुलं पाहिली की वाटायचं, यांची उंची तर मोठी आहे. मला छोटं का बनवलं देवानं? कुठे कार्यक्रम, लग्न, समारंभ असला की बाहेर जायचोच नाही, कारण लोक चिडवायचे, हसायचे.

"ते पाहून मला कसंतरी व्हायचं. किळसवाणंही वाटायचं. पण मी बोलायचो नाही. नको वाटायचं सगळं. माझी उंची कमी आहे या विचारातच असायचो. माझा आत्मविश्वासही हरवला होता. बालपण असं दुःखात गेलं.

"बारावी झाल्यावर फलटणला कॉलेजात बी. कॉमसाठी अॅडमिशन घेतली. तिथं मी सांस्कृतिक कार्यक्रमांकडे वळलो - नाटकात कामं करू लागलो. तिथं मला आत्मविश्वास मिळाला की मी काहीतरी करू शकतो. 2014 साली शेवटच्या वर्षात कॉलेजचा सांस्कृतिक प्रतिनिधी झालो. मग अभिनयाची वाट मला टीव्हीपर्यंत घेऊन आली.

"आधी लोक हिडीसफिडीस करायचे. आता तेच आवर्जून सांगतात, हा माझ्या गावचा आहे, ओळखीचा आहे, किंवा नातेवाईक आहे."

"मला बुटका तर सोडाच, 'बुटक्या' म्हणायचे आधी. त्याचा तिटकारा यायचा. पण कॉलेजमध्ये मला जाणीव झाली, की मला देवानं बुटकेपण म्हणजे हे वेगळं काहीतरी दिलं आहे. याच विषयावर मी 'क्वार्टर' नावाची शॉर्टफिल्मही तयार केली आहे.

"आमच्याकडे लोक आतापर्यंत कॉमेडियन, जोकर म्हणूनच पाहायचे. मीही आजवर कॉमेडी रोल्स करत आलो आहे. पण आमच्या तेजपाल सरांनी वेगळा दृष्टिकोन ठेवूनच 'टॅलेण्ट'चं कॅरेक्टर उभं केलंय. म्हणजे 'गेम ऑफ थ्रोन्स'मधला टिरियन लॅनिस्टर आहे, तशीच एक गंभीर आणि नेहमीपेक्षा वेगळी भूमिका आहे ही.

"मलाही असे आणखी रोल्स करायला आवडतील, कारण आम्ही फक्त कॉमेडी करू शकतो, हे मत मला बदलायचं आहे."

रूही शिंगाडे, पॅरा-अॅथलीट

उंचीनं कमी असूनही नालासोपाऱ्याच्या रूही शिंगाडेनं खेळात यश मिळवलं आहे. पॅरास्पोर्ट्समध्ये आधी पॉवरलिफ्टिंग मग अॅथलेटिक्स आणि बॅडमिंटनमध्येही ती सहभागी होते.

वर्ल्ड ड्वार्फ गेम्स या कमी उंचीच्या लोकांसाठीच्या जागतिक क्रीडा स्पर्धेत रूहीनं 2013 साली पॉवरलिफ्टिंगचं सुवर्णपदक आणि 2017 साली थाळीफेकीचं कांस्यपदक जिंकलं होतं. आजवर चार आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये तिनं पदकं मिळवली आहेत. खेळाबरोबरच ती कमी उंचीच्या व्यक्तींना मार्गदर्शनही करत असते. टीव्हीवर पॅरालिम्पिक दाखवू लागल्यापासून लोकही बदलतायत असं रूहीला वाटतं.

"आधी मी कुठे गेले की लोक त्रास द्यायचे, चिडवायचे. 'ही पाहा कॉमिक आली', 'बघा ही मुलगी कशी दिसते, कशी चालते', असं बोलायचे. मला खूप वाईट वाटायचं की हे असं का बोलतात आणि मी अशी का आहे.

"पण मी खेळाच्या मैदानात उतरले, तेव्हा हे बदललं. मी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय पदक जिंकून परत आले, तेव्हा शहरातल्या लोकांनी माझी मिरवणूकही काढली. आता लोक कौतुक करतात, जिथे जाते तिथे खूप आदर मिळतो. तेव्हा मला बरं वाटतं- मी आणखी खूप काही करू शकते असा विश्वास वाटतो.

"एरवी कुणाला कुठलीही शारीरिक कमतरता असली तर लोक त्यांना चिडवतात. एखादी उंचावरची वस्तू काढण्याचा प्रयत्न केला तर लोक हसतात. धक्के देऊन पुढे जातात. आमच्याकडे पात्रता असली तरी नोकरी नाकारल्याचा प्रसंगही ओढवतो. पण जे सर्वसामान्य उंचीचे लोक करू शकतात, ते आम्हीही करू शकतो. फक्त आमची उंची कमी आहे.

"शाहरूखसारखा फिल्म इंडस्ट्रीतला मोठा स्टार आमच्यासारख्या लोकांची भूमिका करतो आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याचं कॅरेक्टर हास्यास्पद दाखवलं असेल तर वाईट वाटेल. पण जर शाहरूखनं सकारात्मक भूमिका केली असेल, आम्हीही सगळं काही करू शकतो, आमच्यातही वेगळे गुण असतात असं दाखवलं असेल तर चांगलं आहे," असं रूहीला वाटतं.

घनश्याम दरवडे, वक्ता

दोन वर्षांपूर्वी घनश्याम दरवडेनं केलेल्या भाषणाची एक व्हीडिओ क्लिप व्हायरल झाली होती. तेव्हापासून तो 'छोटा पुढारी' म्हणून प्रसिद्ध झाला. नगरच्या श्रीगोंद्याचा घनश्याम अवघ्या 15 वर्षांचा आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांना त्याला भाषणासाठीही बोलवलं जाऊ लागलं.

कमी उंचीमुळं काही अडत नाही, असं घनश्याम सांगतो. त्याला भविष्यात कलेक्टर बनून समाजसेवा करायची आहे.

"कोणी गावातलं मला बोललं, ए बारक्या काय करतोस काय? त्याने मी कधीच निराश नाही झालो. कारण मी बारीक आहे म्हणूनच मला बोलतायत. आणि त्यांच्याकडे मी कधीच लक्ष नाही दिलं. मी आहे ते माझं करिअर चालू ठेवलं. आज माझ्याकडे बघतात ते म्हणतात तुम्ही एवढेसे पण तुमच्याकडे एवढं जनरल नॉलेज, तुम्ही एवढं बोलता कसं काय?

"माझी उंची कमी असल्यामुळं सगळे लोक माझ्याकडे आकर्षित झाले. कुणीही म्हणायचं की हा बघा ना.. एवढासाच आहे पण बोलतो खूप छान. उंची कमी आहे, हे तर मला कधी वाटतंच नाही. आणि मी म्हणतो उंचीचं करायचंय काय?"

निनाद हळदणकर, नर्तक

मुंबईचा निनाद हळदणकर वयाच्या बाराव्या वर्षापासून म्हणजे गेली 24 वर्षं इव्हेंट्स आणि शोजमध्ये डान्स करतो आहे. कमी उंचीच्या निनादला एकेकाळी लोक चिडवायचे, पण त्यानं तो नाउमेद झाला नाही.

कल्याणजी आनंदजी, जॉनी लिव्हर यांच्यासह मराठी आणि हिंदीमधल्या अनेक सेलिब्रिटीजसोबत त्यानं स्टेज शोजमध्येही काम केलं आहे. त्यासाठी पंधराहून अधिक परदेश दौरेही केले आहेत. भारत सरकारनं आयोजित केलेल्या एका कार्यक्रमासाठी पाकिस्तानात कराचीला जायची संधी मिळाली होती. निनादचं लग्न झालं असून त्याला एक मुलगीही आहे.

"मी स्टेजवर येतो तेव्हा सुरुवातीला काही जणांना वाटतं हा काय करणार? पण माझा परफॉर्मन्स पाहून लोक दाद देतात. कधीकधी तर माझ्या प्रवेशाची वाट पाहात असतात. लोकांचा प्रतिसाद पाहून खूप छान वाटतं.

"आधी मी एकटा कुठे जायचो नाही. शोसाठीही बाबांना घेऊनच जायचो. पण आता मी एकटा बिनधास्त प्रवास करतो. स्वतःच्या हिमतीनं आपण पुढे जायला हवं. एअरपोर्ट आणि बसमध्येही, प्रत्येक ठिकाणी आम्हाला मदतही मिळते. पण आपणच घरातून बाहेर बसलो तर काही होणार नाही. तुमच्यात कोणतीही कला असेल ती जोपासा... मग ती कॉमेडीही का असो ना! काम करत राहायला हवं," असं निनाद आवर्जून सांगतो.

"मी कुठे जात असेन तर आजही लोक जमा होतात, चिडवतात. पण आपण घाबरून घरी बसणं, काही करायचं नाही असं वाटणं बरोबर नाही. मला वाटतं 'झिरो'मध्ये शाहरूखचं कॅरेक्टर असंच आहे. तो नॉर्मल जगू शकतो, असं दाखवलं आहे," असं निनाद सांगतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)