बिहारमध्ये मोदी-नीतिश जोडीविरोधात महाआघाडीचा शड्डू

उपेंद्र कुशवाहा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाआघाडीच्या नेत्यांसोबत उपेंद्र कुशवाहा

2019 च्या लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूला विरोधकांची महाआघाडी टक्कर देणार आहे. आज नवी दिल्लीत मोदी सरकारमधील माजी मंत्री आणि राष्ट्रीय लोकसमता दलाचे अध्यक्ष उपेंद्र कुशवाहा यांनी एनडीए सोडून महाआघाडीत सामील होत असल्याचं घोषित केलं.

यावेळी बिहारचे काँग्रेस प्रभारी शक्तीसिंग गोहिल, अहमद पटेल, शरद यादव राजदचे नेते तेजस्वी यादव, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपेंद्र कुशवाहा यांनी मोदी आणि नीतिश यांच्यावर निशाणा साधला "नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीआधी शिक्षण, नोकरी आणि आरोग्य योजना राबवण्यासाठी मोठी आश्वासनं दिली होती. मात्र त्यांच्या कथनी आणि करनीमध्ये प्रचंड अंतर आहे. भाजपनं आमचा पक्ष फोडण्याचा, कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी नीतिशकुमार यांनी मदत केली. उपेंद्र कुशवाहांना संपवण्याची शपथ नीतिश यांनी घेतल्याचं दिसतंय" असा आरोप कुशवाहा यांनी केला आहे.

इतकंच नव्हे तर महाआघाडीच्या वतीनं 2 फेब्रुवारीला बिहारमध्ये आक्रोश मार्च काढण्याची घोषणाही त्यांनी केली.

महाआघाडी

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, बिहारमध्ये विरोधकांच्या फळीत आता उपेंद्र कुशवाहासुद्धा

यावेळी मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी "ये दलों का नहीं, जनता के दिलों का गठबंधन है, असं म्हटलंय. देशाचं संविधान आणि देश वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही अहंकार बाजूला ठेवला आहे. सीबीआय, आरबीआयसारख्या संस्था संपवण्याचं काम सुरु आहे. शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे. ही सगळी लढाई त्याविरोधातील आहे. शिवाय बिहारला मोदी आणि नीतिश या जोडीनं फसवलं आहे, त्याविरोधात ही महाआघाडी लढा देईल" असं तेजस्वी यांनी म्हटलंय.

नीतिश कुमार

फोटो स्रोत, Getty Images

काँग्रेसचे बिहार प्रभारी शक्तीसिंग गोहिल यांनी उपेंद्र कुशवाहांचं महाआघाडीत स्वागत केलं.

"खुर्ची किंवा सत्तेसाठी नव्हे तर विचारधारेवर एकमत झाल्याने आम्ही एकत्र आलो आहोत. जागावाटपाचा निर्णय योग्य वेळी होईल. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आम्ही विरोधी पक्षांची मोट बांधून निवडणुकांना सामोरं जाऊ" असं गोहिल म्हणाले.

उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे लोकसभेत 3 खासदार आहेत. तर बिहार विधानसभेत त्यांचे दोन आणि विधानपरिषदेत 1 आमदार आहे.

गेल्या निवडणुकीत कुशवाहा यांनी एनडीएशी हातमिळवणी केली होती.

एनडीएला कुणाकुणाचा रामराम?

उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोकसमता पक्षाआधी आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडूंच्या तेलगू देसम पक्षानं एनडीएची साथ सोडली. त्यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली आहे. तर महाराष्ट्रात शिवसेनेनं आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)