मोदींच्या पराभवावर न्यूयॉर्क टाइम्समधील लेखाचं सत्य काय?

फोटो स्रोत, Getty Images
सोमवारी जेव्हा काँग्रेसचे तीन मुख्यमंत्री राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशमध्ये शपथ घेत होते, तेव्हा उजव्या विचारधारेच्या काही फेसबुक पेजेस आणि ग्रुपवर एक लेख शेअर केला जात होता.
पाच राज्यांतील निवडणूक निकालांचे विश्लेषण करणारा हा लेख अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्समधला असल्याचं म्हटलं होतं. भाजप आणि मोदींना स्वीकाराव्या लागलेल्या कारणांची एक यादीच या पोस्टमध्ये दिली होती.
सोशल मीडियावर जो लेख शेअर केला जात आहे, त्यामध्ये न्यूयॉर्क टाइम्सने भारतीय मतदारांचा कल समजून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले आहे. मोदी सरकारने या निकालातून धडा घेणे गरजेचे असल्याचाही सल्ला या पोस्टमधून दिला आहे.
फेसबुकवर न्यूयॉर्क टाइम्सच्या या 'लेखा'चा फोटो आणि त्यातील मजकूरही इंग्रजी आणि हिन्दीमधून पोस्ट केला आहे. व्हॉट्स अपवरही हा मेसेज मोठ्या प्रमाणावर शेअर होत आहे.
या लेखाचा सारांश लिहिताना म्हटलं आहे, की भारतीय मतदारांची मानसिकता गुंतागुंतीची आहे. ते नेहमी तक्रारच करत असतात. त्यांना आपल्या समस्यांवर तातडीने तोडगा हवा असतो. दीर्घकालीन योजनांवर भारतीय मतदारांचा विश्वास नाहीए.
न्यूयॉर्क टाइम्सच्या कथित लेखात मांडलेले काही अन्य मुद्देः
•प्रत्येक काम हे सरकारनंच करावं, अशी भारतीयांची अपेक्षा असते. त्यांना आपल्या कोणत्याच समस्येवर दीर्घकालीन उत्तर नको असतं.
•भारतीयांची स्मरणशक्ती कमी आहे आणि त्यांचा दृष्टिकोनही संकुचित असतो.
•ते जुन्या गोष्टी चटकन विसरतात आणि नेत्यांच्या आधीच्या चुकाही माफ करुन टाकतात.
•भारतीय मतदार बिनदिक्कतपणे जातीच्या आधारे मतदान करतात. जातीवाद ही इथली प्रमुख समस्या आहे, ज्यामुळे युवकांची प्रगती होत नाही.
•लोकांना स्वस्त डिझेल हवंय, कर्जमाफी पाहिजे मात्र 'सबका साथ, सबका विकास' हे त्यांच्या लक्षातही येत नाही.
•ते केवळ आपल्या खिशात किती पैसा येतोय यावर नजर ठेवून असतात.
•भारतात निवडणुका जिंकण्यासाठी मोदींना सुशासनाचा हट्ट सोडून राजकारणी बनावं लागेल.
नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून खूप काम केलं आहे, मात्र भारतातील लोकांना त्यांच्या कामाची किंमत नसल्याचं या लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.
या लेखाची सत्यता

फोटो स्रोत, Getty Images
या पोस्टची तथ्यता तपासल्यावर लक्षात आलं, की न्यूयॉर्क टाइम्सचा म्हणून सांगण्यात येणारा हा लेख त्यांचा नाहीए. 11 डिसेंबरनंतर न्यूयॉर्क टाइम्सचा लेख म्हणून ही पोस्ट शेअर केली जात आहे.
न्यूयॉर्क टाइम्सनं विधानसभा निवडणुकीचं विश्लेषण करणारा कोणताही लेख लिहिलेला नाही. नरेंद्र मोदी आणि विधानसभा निवडणूक 2018 हे की-वर्ड्स टाकून सर्च केल्यानंतर हे स्पष्ट झालं आहे. भारतीयांविषयी अशी अपमानास्पद भाषा वापरुन कोणत्याही अमेरिकन वृत्तपत्रात किंवा साइटवर लेख लिहिला गेला नाहीए.
अधिक तपशीलात जाऊन जर या पोस्टमधील लेखाची भाषा पाहिली तर स्पेलिंग आणि व्याकरणाच्याही अनेक चुका आढळतात. "caste" आणि "promote" सारखे शब्दही चुकीचे लिहिण्यात आले आहेत. अमेरिकन वर्तमानपत्रांच्या लेखनशैलीशीही या पोस्टमधल्या लेखाची भाषा जुळत नाही.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हा 'कथित' लेख भाजपच्या पराभवासाठी थेट जनतेलाच दोषी ठरवतो. भाजपच्या नेत्यांनी मात्र कोणतीही तक्रार न करता मतदारांचा कौल स्वीकारला आहे. त्यामुळेच न्यूयॉर्क टाइम्सच्या या कथित विश्लेषणात कोणतेही तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)








