सोनिया गांधी 'काँग्रेसची विधवा': जेव्हा मोदींसारखे नेते करतात महिलांवर टीकाटिप्पणी

सोनिया गांधी

फोटो स्रोत, SANJAY KANOJIA/ GETTY IMAGES

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी यांचा उल्लेख 'काँग्रेस की विधवा' असा केल्याने वादाला तोंड फुटलं आहे. पण महिला नेत्यांवर पुरुष नेत्यांनी अशा प्रकारे टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अशा टीका करणारे नेते हे कोणत्याही एका पक्षाचे नाहीत, कोणातच पक्ष याला अपवाद नाही, असं चित्र आहे.

जयपूर येथील प्रचारसभेमध्ये बोलताना पंतप्रधान मोदी यांनी हे वक्तव्य केले होते. मोदी म्हणाले होते, "आपल्या देशात काँग्रेसने असे सरकार चालवले, जेथे जन्म न झालेली मुलगी विधवाही झाली आणि तिला विधवा पेन्शनही सुरू झाली. हे रुपये कोणती विधवा घेत होती? काँग्रेसची अशी कोणती विधवा होती जिच्या खात्यामध्ये हे रुपये जात होते?''

पंतप्रधानांचा बोलण्याचा रोख सोनिया गांधी यांच्याकडे होता, अशी टीका काँग्रेससह सोशल मीडियावर अनेकांनी केली.

पण महिलांवर अशा पद्धतीने वक्तव्य होण्याचा हा पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही अशा प्रकारची वक्तव्य झालेली आहेत.

'वसुंधरा राजे जाड झाल्या आहेत'

राजस्थानात निवडणुकीत प्रचारसभेत बोलताना माजी केंद्रीय मंत्री आणि लोकतांत्रिक जनता दलाचे नेते शरद यादव यांनी राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यावर टिप्पणी केली होती. "वसुंधराना आराम द्या, त्या खूप थकल्या आहेत. खूप जाड झाल्या आहेत. आधी बारीक होत्या," असं ते म्हणाले होते.

हा केवळ विनोद होता, असा खुलासा शरद यादव यांनी केला. पण वसुंधरा राजे यांनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. "या विधानामुळे आपण अपमानित झालो आहोत," असं त्या म्हणाल्या होत्या. अशी वक्तव्यं करण्याची शरद यादव यांची पहिलीच वेळ नाही.

वसुंधरा राजे

फोटो स्रोत, PRAKASH SINGH

फोटो कॅप्शन, वसुंधरा राजे

1997साली संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयकावर झालेल्या चर्चेत बोलताना त्यांनी शहरी महिलांचा उल्लेख परकटी (केस कापलेल्या) महिला असा केला होता. "परकटी शहरी महिला ग्रामीण महिलांचे कसे प्रतिनिधित्व करतील," असे विधान यादव यांनी केले होते.

2017मध्येही त्यांनी असेच वक्तव्य केले होते. "मताची अब्रू तुमच्या मुलीच्या अब्रूपेक्षा अधिक असते. जर तुमच्या मुलीची अब्रू गेली तर फक्त गाव आणि गल्लीची अब्रू जाईल. मात्र एकदा मत विकले गेले तर देश आणि प्रांताची अब्रू जाईल," असं ते म्हणाले.

50 कोटींची गर्लफ्रेंड

2012 साली नरेंद्र मोदी यांनी राजकीय प्रचारसभेला संबोधित करताना शशी थरूर यांच्या दिवंगत पत्नी सुनंदा यांच्याबाबत, 'वाह! काय गर्लफ्रेंड आहे? तुम्ही कधी पन्नास कोटींची गर्लफ्रेंड पाहिली आहे का?' असे वक्तव्य केले होते.

त्यावर शशी थरूर यांनी ट्वीटरवर उत्तरही दिले होते. "मोदीजी, माझी पत्नी 50 कोटींची नाही तर अनमोल आहे. पण तुम्हाला हे समजणार नाही कारण तुम्ही कोणाच्या प्रेमास लायक नाही," असं उत्तर थरूर यांनी दिलं होतं.

डेंटेड-पेंटेड महिला

2012 साली डिसेंबर महिन्यात दिल्लीमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन निषेध व्यक्त केला होता. मात्र त्यावरही टीकाटिप्पणी झाल्या होत्या. पश्चिम बंगालमधील जांगीपूर येथील काँग्रेसचे खासदार असणाऱ्या अभिजीत मुखर्जी यांनी, "दिल्लीमधील 23 वर्षीय युवतीवर झालेल्या बलात्काराविरोधात निषेध मोर्चात सहभागी होणाऱ्या 'सजूनधजून' येणाऱ्या महिलांना प्रत्यक्ष स्थितीची काहीच कल्पना नाही. हातात मेणबत्ती घेऊन रस्त्यावर येणे फॅशन झाले आहे. या सजूनधजून आलेल्या महिला आधी डिस्कोथेकमध्ये गेल्या आणि त्यानंतर सामूहिक बलात्काराला विरोध करण्यासाठी इंडिया गेटवर पोहोचल्या," असं वक्तव्य त्यांनी केलं होतं. मुखर्जी यांनी नंतर माफी मागितली होती.

रेणुका चौधरी यांचे हसू आणि शूर्पणखा

2018 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत 'आधार'बद्दल बोलत होते. त्यावेळी खासदार रेणुका चौधरी जोरजोरात हसू लागल्या. त्यावेळेस चौधरींना अडवणाऱ्या सभापतींना उद्देशून मोदी म्हणाले होते, "सभापतीजी रेणुकाजींना आपण काहीही म्हणू नका. रामायण मालिकेनंतर अशा प्रकारचे हसू ऐकण्याचे सौभाग्य आज मिळाले आहे."

रेणूका चौधरी

फोटो स्रोत, Getty Images

त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी फेसबुकवर एक व्हीडिओ शेअर करून रेणुका चौधरी यांच्या हास्याची तुलना रामायणातील शूर्पणखेशी केली. तसेच भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी रामायणातील शूर्पणखेचे नाक कापण्याचे दृश्यही ट्विटरवर शेअर केले होते.

'सिनेमात नाचणारी...'

भाजपाचे नेते नरेश अग्रवाल यांनी अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन यांच्याबद्दल 'सिनेमात नाचणारी' असे शब्द वापरले होते.

रेखा के साथ जया बच्चन

फोटो स्रोत, Screen

या टिप्पणीच्यावेळी अग्रवाल यांच्या सदस्यत्वाचा कार्यकाळ समाप्त होताना आणि समाजवादी पक्षाने जया बच्चन यांना पुन्हा एकदा राज्यसभेसाठी उमेदवारी दिली होती.

'टीव्हीपे ठुमके लगाती थी'

2012साली गुजरात निवडणुकांच्या निकालावेळी टीव्हीवर चाललेल्या चर्चेमध्ये काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी स्मृती इराणी यांच्याबाबत अशीच टिप्पणी केली होती. "कालपर्यंत तुम्ही पैशांसाठी ठुमके लावत होत्या आणि आज तुम्ही राजकारण शिकवत आहात," असे वक्तव्य त्यांनी केले होते.

जेव्हा आक्षेपार्ह विधानांमुळे झाली शिक्षा

महिलांबाबत अशी विधाने दुसऱ्या देशांमध्ये केली जात नाहीत असे नाही. 2017मध्ये ब्रिटनमधील राजकीय नेत्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. एका गरोदर राजकीय नेत्याबाबत बोलताना या नेत्याने आक्षेपार्ह विधान केले होते. ती गरोदर आहे, तिचा सगळा वेळ नॅपी बदलण्यातच जाईल, ती सामान्य माणसाचे प्रश्न कसे सोडवेल? असे ते वक्तव्य होते. त्यानंतर त्या राजकीय नेत्यास माफी मागावी लागली होती.

ब्रिटनसारख्या अनेक देशांमध्ये अशा विधानांवर संबधित व्यक्तींवर कारवाई झाल्याची उदाहरण आहेत. संसदेतील एका सदस्याने महिला कमजोर, लहान आणि कमी बुद्धिमान असतात त्यामुळे त्यांना कमी पैसे दिले पाहिजेत असे विधान केले होते. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले आणि त्याचा भत्ताही बंद करण्यात आला.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)